‘नवलाख तळपती दीप विजेचे येथ; उतरली जणू तारकादळे नगरात’ असं महानगरातल्या नित्याच्या रोषणाईचं वर्णन कविवर्य कुसुमाग्रजांनी एका कवितेत केलंय ते सार्थ आहे. लक्षलक्ष दिव्यांना ‘तारकादळां’ची उपमा तर अत्यंत योग्य. पूर्वीसुद्धा ‘प्रभात’च्या ‘शेजारी’ चित्रपटात असलेलं गाणं आजही नव्यानं गाजतंय ते आकाशज्योतींचंच आहे. ‘लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया; झळाळती कोटी ज्योती या हा, हा, हा!’ अशा गाण्यावरचं मशाल नृत्यही प्रसिद्ध आहे.
आज नरकचतुर्दशी दिवाळीचा आरंभ. कोजागरी पौर्णिमेनंतरची ही वद्य किंवा कृष्ण त्रयोदशी चतुर्दशी, अमावास्या म्हणजे रात्रीच्या आकाशातला चंद्राचा वावर कमी आणि केवळ ताऱ्यांचीच आरास! ‘झळाळती कोटी ज्योती’ हे शब्दशः खरं. आपल्या प्राचीन खगोलशास्त्रात आकाशीच्या या दौलतीला अनेक नावं आहेत. तारे किंवा उडुगण किंवा ‘द्यु’ म्हणजे तेजस्वी वस्तू आणि ज्योती. खरं म्हणजे ‘ज्योतिःशास्त्र’चा मूळ अर्थच खगोलशास्त्र. रात्रीच्या आकाशातील चमचमणाऱ्या ‘ज्योती’ म्हणजे ताऱ्यांचा अभ्यास करणारे विज्ञान ते ‘ज्योतिःशास्त्र’ मग ‘भविष्य’ सांगणारे काय? तर ते फलज्योतिष.
थोडक्यात, सुरुवातीला विविधलक्ष्यी कुतूहलाने आणि हळूहळू गणिती मांडणीने अवकाशातील ताऱ्यांचा अभ्यास होऊ लागला. ग्रह तसे मर्यादित. म्हणजे आपल्या सूर्यमालेपुरता विचार केला तर आठच ग्रह. पूर्वीप्रमाणे सूर्य, चंद्र, राहू, केतू आणि अगदी 1922 मध्ये शोध लागल्यावर ‘ग्रहपद’ प्राप्त झालेल्या ‘प्लुटो’लासुद्धा आधुनिक ग्रह निष्कर्षांनुसार ग्रह मानलं जात नाही. यामध्ये सूर्य हा तर स्वयंप्रकाशी तारा. चंद्र पृथ्वीचा उपग्रह. राहू, केतू हे पृथ्वी-चंद्र कक्षांचे (5 अंशाने येणारे) छेदनबिंदू आणि ‘प्लुटो’चा सहचर शेरॉन हा तुल्यबळ असल्याने त्या दोघातलं गुरुत्वीय केंद्र दोघांच्या कक्षेबाहेर जात असल्याने तोही ग्रह नाही, असं 2004 मध्ये ‘प्राग’ येथे झालेल्या खगोलीय चर्चासत्रात ठरलं.
मुख्य म्हणजे ग्रह चमचमत नाहीत. ते पृथ्वीसारखेच परप्रकाशित. सूर्य आणि विश्वातील अब्जावधी तारे मात्र स्वयंप्रकाशित. कारण त्यांच्या गाभ्यात सतत धुमसणारी नैसर्गिक अणुप्रक्रिया, प्रचंड ऊर्जा आणि प्रकाश निर्माण करते म्हणून असे किती तारे अवघ्या विश्वात असतील? लाख, कोटी, अब्ज की त्याहून अधिक? आणि उत्तर आहे त्याहून कितीतरी जास्त. ‘लखलख चंदेरी तेजाची’ ताऱ्यांमध्ये मोजदाद करायची तर ‘वन सेप्टिलियन’ असं उत्तर येतं. एक बिलियन म्हणजे एकावर 9 शून्य, तर एक सेप्टिलियन म्हणजे एकावर 24 शून्य. यांच्या मधला आकडा आहे ट्रिलियन. तो अर्थशास्त्राबाबत बऱ्याचदा कानावर किंवा वाचनात येतो. एक ट्रिलियन म्हणजे एकावर 12 शून्य! असे किमान 200 बिलियन ट्रिलियन तारे संपूर्ण विश्वात असल्याचा सध्याचा अंदाज आहे. म्हणजे ‘तारकादळां’ची स्वयंप्रकाशी दिवाळी रोजचीच!
या अवकाशस्थ ‘सेप्टिलियन’ ‘ज्योती’ म्हणजे ताऱ्यांपैकी पृथ्वीचा जनक असलेला सूर्य हा सामान्य तारा. तरीही त्याचं प्रखर तेज दिवसा पृथ्वीचं अवकाश व्यापतं आणि काळोख दूर होतो. सूर्य मावळला की, बाकीचे ‘सेप्टिलियन’ तारे चमचम करू लागतात. एका रात्रीत नुसत्या नजरेने म्हणजे दुर्बिण वगैरे नसली तरी किमान सहा हजार अवकाशस्थ ‘ज्योतीं’ची किमया मन मोहून टाकते. मात्र हे सर्व तारे विश्वात परस्परांपासून प्रचंड अंतरावर असल्याने रात्र एवढय़ा ताऱ्यांच्या ‘प्रकाशात’ तप्त होत नाही किंवा पृथ्वी दिवसासारखी उजळून निघत नाही.
आणखी एक विस्मयकारी गोष्ट म्हणजे एवढय़ा सगळय़ा सेप्टिलियन ताऱ्यांचं आपलं ‘दृश्य’ विश्व हा संपूर्ण विश्वाचा फक्त चार टक्केच भाग आहे! बाकी 23 टक्के कृष्णद्रव्याचा आणि 76 टक्के कृष्णऊर्जेचा! हे सगळं जाणून घेतलं तर आपल्याला विराट ‘तमा’तील ‘सूक्ष्मतम’ अस्तित्वाची कल्पना येईल.
आपला दिवाळीचा सण फारच कल्पकतेचा. तसे प्रत्येक तिथीचे काही ना काही सण-उत्सव आपल्याकडे आहेतच. चैत्र प्रतिपदा, बलिप्रतिपदा, यमद्वितीया (भाऊबीज), अक्षय तृतीया, गणेश चतुर्थी, नागपंचमी, कपिलाषष्ठाr, शिळासप्तमी, गोकुळ अष्टमी, रामनवमी, विजया दशमी, आषाढी कार्तिकी एकादशी, परवाची धनत्रयोदशी आणि आजची नरक चतुर्दशी व दिव्यांची किंवा दिवाळीतली अमावास्या (लक्ष्मीपूजन) असे काही तिथीविशेष सहज आठवले.
…दिवाळी हा मुख्यत्वे प्रकाशाचा क्षण. विसाव्या शतकापर्यंत जगभरची रात्र ‘लखलख चंदेरी’च असायची. अमावास्येला तर चंद्रही नसल्याने सहा हजार ताऱ्यांसह आकाशगंगेचा शुभ्रधवल पट्टा सहज नजरेत भरायचा. मग आनंदाचे दीप उजळायचे ते मातीचे. या ‘मिणमिणत्या शत पणत्यांची’ रांगोळीच सर्वत्र दिसायची. वरच्या आकाशी ‘ज्योतीं’शी त्यांची स्पर्धा असायची. सारा आसमंत मंद, स्निग्ध ज्योतींनी बहरून जायचा. आता आरास विजेच्या दिव्यांची. त्यांच्या स्पर्धेत अवकाश ज्योतींचं तेज दिवसेंदिवस लुप्त होत चाललंय तरीही दिवाळीच्या ‘पणती’चा मान त्यांना नाही. कारण तो प्रकाश उग्र नाही. या शांत, स्निग्ध प्रकाशात ‘अंतरीचा दीप’ स्नेहाने उजळू द्या. अवकाशींच्या कोटी ज्योतींचं प्रतिबिंब मनात पडू द्या आणि मन आनंदाने उजळू द्या.
वैश्विक