मागोवा- रुग्णांच्या हक्कांचे काय?

>> आशा कबरेमटाले

पुण्यातील तनीषा भिसे या गर्भवतीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर आरोग्य क्षेत्रातील गैरप्रकारांविषयी सर्वसामान्यांच्या मनात प्रदीर्घ काळ साचलेला रोष समाजमाध्यमांवर बाहेर पडतो आहे. या तक्रारींचा मागोवा.

डाक्टर अगदी देवासारखे मदतीला आले असे वाटण्याची वेळ आपल्यापैकी अनेकांवर कधी ना कधी येते. अमूल्य वेळ वाया जाऊ न देता तातडीने मिळालेली मोलाची वैद्यकीय मदत, डॉक्टरांचे नेमकेपणाने निदान व उपचार करणे आणि आरोग्यासंबंधी संकटातून आपल्याला वा आपल्या एखाद्या निकटवर्तीयाला सुखरूप बाहेर काढणे आपल्या मनात त्यांच्याविषयी अपार आदर निर्माण करते. असे अनुभवी आणि उच्च कोटीची तज्ञता असलेले डॉक्टर दिसतात. तसेच आजच्या आरोग्य क्षेत्रातील बुजबुजाटातही अतिशय नैतिकतेने प्रॅक्टीस करणारे तज्ञ डॉक्टरही त्यांच्या वेगळेपणाने अधिकच लक्षात राहतात. हे असे डॉक्टर वाटय़ाला येणे हे भाग्याचे वाटावे असे नकारात्मक अनुभवही आज अनेकांना येत असतात.

 पुण्यात अलीकडेच तनीषा भिसे या दुर्दैवी गर्भवतीचा जुळ्या मुलींना जन्म दिल्यानंतर मृत्यू झाला. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दहा लाख रुपयांच्या अनामत रकमेवर अडून राहिल्याने वेळेत उपचार न मिळून ही गर्भवती आपल्या प्राणांना मुकल्याचे समोर आले आहे. रुग्णालयाने वा डॉक्टरांनी दाखल करून घेण्यास नकार दिल्याने वेळेत उपचार न मिळून रुग्णाचा मृत्यू झाला हे दर्शवणारी ही काही पहिली घटना नव्हे. परंतु ही दुर्दैवी घटना चर्चेत आल्यापासून जणू काही प्रदीर्घ काळापासून साचलेला आरोग्य क्षेत्रातील गैरप्रकारांविषयीचा राग अनावर व्हावा तसे सर्वसामान्य या प्रकारांविरोधात समाजमाध्यमांवर व्यक्त होत आहेत. या टीकाटिप्पणीमध्ये काही वेळा संबंधित रुग्णालय, तेथील डॉक्टर व रुग्णालयाशी जोडलेले नामवंत यांच्याविषयी टोकाचा अनादराचा सूरही लागला आहे. हे चुकीचे उल्लेख बाजूला ठेवून, हे मात्र मान्य करावे लागेल की सर्वसामान्य जनता खरोखरीच आरोग्य क्षेत्रातील अनेक स्वरूपाच्या गैरप्रकारांना, आर्थिक लुबाडणुकीला आणि मुजोरीला तोंड देत आली आहे. त्याचाच आता भडका उडाला आहे.

 सरकारी रुग्णालयांवर आपल्या अफाट लोकसंख्येमुळे पराकोटीचा ताण असतो. तेथील डॉक्टर अतिशय अनुभवी तज्ञ असतात. परंतु तिथल्या व्यवस्थेतील सगळ्या ताणाचा भार सरतेशेवटी गरजू, हतबल रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांवर पडत असतो. सरकारी रुग्णालयांतून फेरफटका मारला तरी तेथील दुरवस्था दिसते. तशाही परिस्थितीत काही ज्येष्ठ व अनुभवी डॉक्टर रुग्णांशी मायेममतेने वागतात. पण व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. कधी कुणा डॉक्टरांकडून वा अन्य वैद्यकीय कर्मचाऱयांकडून बेदरकारी वा हलगर्जीपणा यांचा अनुभव आला तरी रुग्णांना वा त्यांच्या नातेवाईकांना तक्रार करण्याची भीती वाटते. योग्य उपचार हवे असल्याने मुजोरी सहन करावी लागते. कधी कधी मात्र त्यांच्या सहनशीलतेचा अंत होतो. अनपेक्षितपणे रुग्ण दगावतो. नातेवाईक दुःखाने बेभान होतात व संतापाने डॉक्टरांविरोधात व रुग्णालयाविरोधात आक्रमकतेने वागतात. अशा आक्रमकतेविरोधात मात्र तातडीने कारवाई होते. डॉक्टर लागलीच निषेधाचे, आंदोलनाचे हत्यार उगारतात. ते संघटित आहेत तर गरजू रुग्ण असंघटित. तक्रार तर दूरच, पण साधे ‘सेकंड ओपिनियन‘ (दुसरे मत) घेऊन आपल्यावर केले जाणारे उपचार हाच सुयोग्य मार्ग आहे का, याची खातरजमा करून घेण्याइतकी जागरुकतादेखील सर्वसामान्य रुग्णांमध्ये नसते. सांगितलेल्या खर्चिक चाचण्या, उपचार, औषधे, शस्त्रक्रिया निमूट करवून घ्यायच्या हाच शिरस्ता आहे. क्वचित कधी सुरू असलेल्या
अॅलोपथीच्या उपचारांना जोड म्हणून रुग्ण आयुर्वेद किंवा अन्य पॅथीच्या तज्ञांकडे गेला की तिथे अॅलोपथी कशी चुकीची आहे, कसे साइड इफेक्ट्स असलेले उपचार सुरू आहेत यांचा पाढा वाचला जातो. रुग्ण भांबावतो. करायचे तरी काय? अॅलोपथीच्या खर्चिक उपचारांची, यंत्रांची, शस्त्रक्रियेची गरजच नाही. तुम्ही त्यांच्या कचाटय़ात सापडले आहात. आता ते तुम्हाला पिळून काढणार, असे सांगितले जाते.

 बरेचदा रुग्णाला ती दुसरी उपचार पद्धती ‘जोड’ म्हणून हवी असते. पर्यायी म्हणून नव्हे. पण या भेटीत आपल्या त्या मूळ उपचारांत काही ‘चुकीचे’ असू शकते हे मात्र त्याला कळते. जागरूक रुग्ण त्यातल्या त्यात कमी लुबाडणूक होईल अशा डॉक्टरांचा शोध घेतात. कधी कुणाला परदेशात गेल्यावर तुमच्याकडचे (भारतातले) सगळेच निकष चुकीचे आहेत. फेकून द्या तुमची ती औषधे, असे फर्मावले जाते. एकाच आजारासंबंधीचे भारतातले आणि अन्य देशांतले ‘निकष’ वेगळे असतात याचा साक्षात्कार होतो. आपल्याकडे औषधांचा भलताच मारा होतो की काय, असा प्रश्न पडतो. भारतातील अफाट लोकसंख्येमुळे बहुराष्ट्रीय औषध कंपन्यांसाठी आपण एक मोठी बाजारपेठ आहोत. डॉक्टरांना हाताशी धरले की औषधांचा अफाट खप शक्य असतो.

 या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कायदा हवा याची चर्चाही सुरू आहे. पण सारेच कधीमधी होणाऱया चर्चेपुरतेच सीमित दिसते. पुण्यातील गर्भवतीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर वैद्यकीय क्षेत्रातील अशा अनेक गैरप्रकारांविषयी लोक आता समाजमाध्यमांवर संताप व्यक्त करीत आहेत. पण प्रत्यक्षात या गैरप्रकारांना अटकाव करण्यासाठी काही होईल का? नामांकित खासगी रुग्णालयांमध्ये अतिशय अनुभवी तज्ञ डॉक्टर असतात. एखाद्या गुंतागुंतीच्या आरोग्यविषयक समस्येसाठी परवडत नसले तरी मध्यमवर्गीयांनाही अशा रुग्णालयात जाणे भाग पडते. तेथील फीचे आकडे सतत वाढत असतात. नफेखोरीवर भर असणाऱया या रुग्णालयांच्या फी आकारणीवर कुणाचेच नियंत्रण नसते का?

  भरमसाट फी आकारणाऱया या रुग्णालयांमध्ये बरेचदा तज्ञ डॉक्टरांआधी त्यांचे मदतनीस शिकाऊ डॉक्टर रुग्णाचे सारे रिपोर्ट तपासतात. तज्ञ डॉक्टर सांगतील ती औषधेही कधी कधी तेच लिहून देतात. यात कधी एखादी चूकही होते. औषधांच्या दुकानातील विक्रेता ती लक्षात आणून देतो. तज्ञ डॉक्टरसाठीची भलीमोठी फी दिल्यानंतर त्यांनी किमान रुग्णाची तपासणी व्यक्तिशः करायला नको का? रुग्णाला काय लिहून दिले जाते आहे हे तपासायला नको का? परंतु काही डॉक्टर इतके व्यस्त असतात की त्यांच्याकडे रुग्णांसाठी वेळच नसतो. या अवघ्या व्यवस्थेतील चुकांचे बळी रुग्णच ठरतात. रुग्णांनी तासन्तास रांगांमध्ये तिष्ठायचे. महागडी औषधे विकत घ्यायची. कधी कधी अनावश्यक, महागडय़ा शस्त्रक्रियेलाही सामोरे जायचे. परंतु कुठल्याच गैरप्रकारांविरोधात ‘ब्र’ उच्चारलेला या क्षेत्रातील काहींना चालत नाही.

 तनीषा भिसे मृत्यू प्रकरणाने किमान या गैरप्रकारांची चर्चा सुरू झाली आहे. लुबाडणुकीचे, मुजोरीचे बळी ठरलेल्या हतबल, गरजू रुग्णांना अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी एखादा प्रभावी मंच यानिमित्ताने निर्माण झाला तरी कदाचित परिस्थितीत थोडेफार काही बदलू शकेल का?

[email protected]