
>> श्रीकांत आंब्रे
भारतात आयटी क्षेत्रात घडलेल्या अभूतपूर्व क्रांतीचे पडसाद आज जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत उमटलेले दिसतात. मोबाइल, इंटरनेट, कॉम्प्युटर आणि याद्वारे अगदी सुलभ रीतीने केले जाणारे जीवनव्यवहार ही या संपर्क साधनांमुळे मिळालेली मोठी देणगी आहे. 1970 ते 80-90 च्या दशकात याची कुणी कल्पनाही केली नसेल. पण असा काय चमत्कार झाला व तो कुणी आणि कसा घडवून आणला याचा वेध घेतला तर त्याचे श्रेय हरीश मेहता या धडाकेबाज भारतीय उद्योजकाला आणि त्यांनी स्थापन केलेल्या ‘नॅसकॉम’ या सॉफ्टवेअर उद्योगालाच द्यावे लागेल. भारतीय युवाशक्तीच्या गुणवत्तेवर आधारलेल्या डिजिटल क्रांतीचे नेतृत्व या दोघांनी केले आणि त्यामुळे देशाच्या उद्योग व आर्थिक क्षेत्रात प्रचंड मोठी सकारात्मक स्थित्यंतरे घडून आली. दुर्दम्य इच्छाशक्ती व देशप्रेमाच्या बळावर या उद्योगाने ही जादू करून दाखवली. हरीश मेहता हे स्वतः उद्योजक असूनही आपली अमेरिकेतील यशस्वी कारकीर्द बाजूला ठेवून आपल्या आवडत्या तंत्रज्ञान क्षेत्राद्वारे भारतातील विकासासाठी ते भारतात परतले. देशात डिजिटल क्रांतीचा पाया गेली तीन दशके त्यांच्या भारतातील संगणक उद्योगाने घातला.
आज अमेरिकेतच नव्हे तर जगभरात या क्षेत्रात काम करणारे बुद्धिमान भारतीय तरुण भारताचे नाव उज्ज्वल करीत आहेत. त्यामागे हरीश मेहता आणि त्यांच्या ‘नॅसकॉम’ने केलेल्या अफाट कष्टाची पार्श्वभूमी आहे. त्यांची ही संपूर्ण वाटचाल त्यांनी त्यांच्या ‘मेवेरिक इफेक्ट’ या मूळ इंग्रजी पुस्तकात विस्ताराने सांगितली आहे. याच पुस्तकाचा सुरेख मराठी अनुवाद ‘अतुलनीय’ या सार्थ नावाने माधवी ग. रा. कामत यांनी केला आहे. भारताच्या आयटी उद्योगाला मेहतांच्या ‘नॅसकॉम’ने कसे जगभरात नेले याची ही रोमांचक कहाणी या उद्योगक्षेत्रातील तरुणांच्या स्वप्नांना बळ देणारी, तशीच देशात त्यांनी घडवलेल्या आश्चर्यकारक बदलाची, धैर्याची आणि क्रांतीची आहे. त्यामुळेच भारतीयांच्या कमरेला लटकलेला पेजर कधी कालबाह्य झाला आणि बहुसंख्य घरात पोचलेला मोबाइल, कॉम्प्युटर भारतीयांच्या जीवनाचा अविभाज्य भाग कसा झाला हे कळलेसुद्धा नाही.
इतका प्रभावी बदल देशात घडवण्यासाठी हरीश मेहता आणि त्यांच्या नॅसकॉम टीमने किती विचारपूर्वक महत्त्वाची कामगिरी केली हे मेहतांच्या शब्दात अनुभवणे हीच एक मोठी पर्वणी ठरेल. या कामासाठी मुंबईच्या सॉफ्टवेअर सेवा उद्योगातील सर्वात प्रभावी बुद्धिमान पंधरा व्यक्तींना एकत्र आणून त्यांनी नॅसकॉमला जन्म दिला. अचूक पारख केलेल्या या सहकाऱयांमुळेच ते देशातील सॉफ्टवेअर क्षेत्राची भरभराट करू शकले. या काळात त्यांच्या चार वर्षांच्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला तर त्यांची पत्नी शैला कॅन्सरने दगावली. एवढे आघात सहन करूनही ते खचले नाहीत. तर केवळ देशाच्या भल्याचा विचार करून त्यांनी हाती घेतलेले काम पूर्णत्वाला नेले. त्यात येणाऱया अडथळ्यांची कारणे शोधून ते अडथळे दूर केले. त्या वेळेच्या केंद्र सरकारांनी त्यांना हवे तसे सहकार्य दिले नाही. गुजरात हे एकमेव राज्य असे होते की त्याने सॉफ्टवेअर उद्योगाला तिथे अजिबात थारा दिला नाही. असे किती तरी अपमानाचे तसेच सन्मानाचे प्रसंगही मेहता रंगवून सांगतात. आपल्या भारतीय संस्कृतीविषयी अभिमान बाळगणारे, तिची महती जगाला पटवून देणारे, अतिशय निगर्वी, नम्र आणि डिजिटल क्रांतीचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वस्व झोकून देणारे मेहता यांनी अथक परिश्रमातून केलेली ही वाटचाल या पुस्तकातून पाहताना आपण एक विलोभनीय कादंबरीच वाचत असल्याचा भास झाल्याशिवाय राहणार नाही.
एकटे असणे म्हणजे एकाकी असणे नव्हे. तुम्ही तुमच्यासोबत आहात एवढाच त्याचा अर्थ. या पुस्तकातून तुम्ही तुमच्या एकटेपणाचे रूपांतर ‘एकांतात’ कसे करायचे ते शिकाल. तसेच, एकटे राहण्याच्या कलेत कसे पारंगत व्हायचे ते शिकाल आणि तुमचे सध्याचे आयुष्य तुमच्या स्वप्नातील आयुष्यामध्ये रूपांतरित कसे करायचे तेही शिकाल.