आरोग्य संपदा- खारट, गोडाचा अतिरेक टाळा

>> डॉ. चेतन वेदपाठक

आजच्या `सोशल मीडिया’च्या जमान्यात विविध प्रदेशांतील, देशांतील पाककलेवरच्या अगणित `रिल्स’ उपलब्ध आहेत. या परप्रांतीय व परदेशी खाण्याचे आपल्या शरीरावर निष्टअनिष्ट परिणाम होऊ शकतात. मध्यंतरी महापालिकेने नागरिकांना त्यांनी गोड आणि खारट पदार्थांचे अतिसेवन टाळण्याचे आवाहन केले आहे. परंतु बाजारात मिळणाऱया चकचकीत वेष्टनातल्या खाद्यपदार्थांकडे पाहिले तर प्रामुख्याने गोड, तिखट, आंबट आणि खारट या चवींचा भडीमार सर्व बाजूंनी होताना दिसतो.

भूतलावरील सर्व सजीव प्राणीमात्रांना प्राणवायूनंतर सगळ्यात जास्त कशाची गरज असेल तर ती अन्नाची! सर्व पशु त्यांच्या गरजेनुसार व सभोवतालच्या परिस्थितीनुसार शाकाहार किंवा मांसाहार अन्नाचे सेवन करतात. मानव हा पशुजगतातील उन्नत प्रजाती आहे. हात, वाणी आणि रसना म्हणजेच चव यावर त्याने स्वतची प्रगती साधली आहे. मानवास जगण्यासाठी सकस, पौष्टिक आणि चवदार अन्नाची गरज असते आणि जेथे चवीचा उल्लेख होतो तेथे जिव्हा, जीभ किंवा रसनेंद्रिय ह्याबद्दल बोलणे ाढमप्राप्तच ठरते.

आपल्या मुखातील 32 दातांच्या पिंजऱयात बंदिस्त असलेली ही जिव्हा आपल्या वाणीसाठी किंवा चवीच्या संवेदनेसाठी ओळखली जाते.

लालसर गुलाबी, कुठलाही पांढुरका थर अथवा चट्टे नसलेली लालास्रावाने ओली जीभ ही उत्तम आरोग्याचे लक्षण मानली जाते. अनेकदा जुनेजाणते लोकही पांढरी जीभ ही वाईट पचनसंस्थेचे द्योतक आहे असं म्हणताना दिसतात. पोटात जाणाऱया अन्नाला असलेली चव आपल्याला जिभेमुळेच समजते. फक्त चवच नाही तर खाणाऱया पदार्थाचे तापमान, घनता, मऊ किंवा कडकपणा याचे ज्ञानही जिभेमुळेच होते.

आयुर्वेदात अन्नपदार्थांच्या मूळ `सहा’ चवी सांगितल्या आहेत.

`रसाः स्वाद्वम्ललवणतिक्तोषणकषक।।’

गोड, आंबट, खारट, कडू , तिखट आणि तुरट असे सहा रस वा चवी आचार्यांनी ग्रंथात नमूद केल्या आहेत. आपण खाणाऱया सर्व पदार्थांचे वर्गीकरण या सहा चवींमध्ये केले आहे. या सर्व रसांचे गुणधर्म, त्याचा मानवी शरीरावर होणारा परिणाम आणि त्यांचा आपल्या शरीरातील त्रिदोषांवर होणारा परिणाम वेगवेगळा असतो. जसे मधुर (गोड) रस बलवर्धक आणि वातदोषाचे शमन करणारा असतो. तर कडू रस वातवर्धन करणारा आहे. मधुर (गोड) रस हा पित्तशामक आहे तर उष्ण (तिखट) रस पित्तवर्धक आहे. म्हणूनच आयुर्वेदाने षडरसात्मक अन्नाचे सेवन करावे असे प्रतिपादित केले आहे. जेव्हा व्यक्ती षडरसात्मक अन्न सेवन करते तेव्हा त्रिदोष साम्यावस्थेत राहून शरीर निरोगी राहते असे सांगितले आहे.

आपला भारत देश हा खंडप्राय देश आहे. भौगोलिकदृष्टय़ा भारतात वैविध्य आहे. परिणामत प्रत्येक प्रदेशातील लोकांचे राहणीमान, खानपानाच्या सवयी वेगळ्या असणार हे ओघाने आलेच. शतकांपासून व्यापाराच्या निमित्ताने, राजाश्रयामुळे एका प्रांतातील लोकांनी दुसऱया प्रांतात स्थलांतर केले. तेव्हापासून चालू असलेली ही प्रािढया आजही अव्याहतपणे सुरू आहे. स्थलांतरित झालेल्या समाजाने त्यांच्या चालीरितींसह खानपानाच्या सवयीही आणल्या. परिणामत मूलनिवासी लोकांच्या खानपानात बदल झाले.

जागतिकीकरणाच्या या युगात इतर देशातील खाण्यापिण्याचे पदार्थ सर्रास आपल्या रोजच्या आहारात समाविष्ट झाले आहेत.

यांत्रिकीकरण, औद्योगिकीकरण यामुळे एका विशिष्ट काळात तयार होणारे पदार्थ वर्षभर मिळू लागले आहेत. ठराविक ऋतूत मिळणाऱया भाज्या, फळेही आता वर्षभर मिळू लागली आहेत. आजच्या `सोशल मीडिया’च्या जमान्यात तेथे विविध प्रदेशांतील, देशांतील पाककलेवरच्या अगणित `रिल्स’ उपलब्ध आहेत. अशा या परप्रांतीय व परदेशीय खाण्याचा आपल्या शरीरावर निष्टअनिष्ट परिणाम तर होणारच.

मध्यंतरी महापालिकेने नागरिकांना केलेल्या आवाहनाने माझे लक्ष वेधले. त्यांनी गोड आणि खारट पदार्थांचे अतिसेवन टाळण्याचे आवाहन केले आहे. हे ऐकून माझ्या मनात विचारपा सुरू झाले. डोळे उघडे ठेवून आपण बाजारात मिळणाऱया चकचकीत वेष्टनातल्या खाद्यपदार्थांकडे पाहिले तर प्रामुख्याने दोन ते तीन चवींचे प्राधान्य आढळते. गोड, तिखट, आंबट आणि खारट चवींचा भडीमार आपणांवर सर्व बाजूंनी होताना दिसतो.

आयुर्वेदानुसार कुठल्याही रसाचा अतिरेक झाला म्हणजेच `अतियोग’ झाला की त्रिदोषांची साम्यावस्था डळमळणार. मग त्याचा परिणाम शरीरातील सप्तधातूंवर होणार आणि ह्या सगळ्याची परिणीती रोगात होणार. आज आपण सर्वजण हे पाहू व अनुभवू शकतो की लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयद्रोग, केशविकार, अकाली वार्धक्य यासारखे अनेक रोग आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये अगदी आपल्या परिवारातही शिरताना दिसत आहेत.

भारत आर्थिक महासत्तेसोबतच उच्च रक्तदाब, मधुमेह, हृद्रोग या रोगांची राजधानी होऊ पाहतोय. बाल, तरुण, वृध्द सर्व वयातील रुग्णांना या सर्व आधुनिक जीवनशैलीजन्य रोगांमुळे डाक्टर, रुग्णालये येथे जावे लागत आहे. या सगळ्याचे मूळ आपल्या बदललेल्या जीवनशैली व खाण्यापिण्याच्या सवयीत दडलेले आहे. आयुर्वेदाने नेहमीच लाक्षणिक चिकित्सेपेक्षा रोगाच्या उत्पत्तीचे मूळ कारण, त्याचे अचूक निदान, त्यांचे निर्हरण व तो पुनश्च उद्भवणार नाही म्हणून देण्यात येणारी अपुनर्भव चिकित्सा ह्यावर भर दिला आहे.

असो… आजच्या या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण काळात आपल्याला निरोगी, निकोप जीवन जगायचे असेल तर जिभेवर ठेवण्यात येणाऱया प्रत्येक पदार्थाला काळजीपूर्वक व विचारपूर्वक निवडले पाहिजे. भडक आणि बटबटीत जाहिराती व सोशल मीडियावरच्या जबरदस्ती लादलेल्या पदार्थांचा मोह टाळणे श्रेयस्कर ठरेल.

[email protected] 

(लेखक आयुर्वेद तज्ञ व चिकित्सक आहेत.)