किस्से आणि बरंच काही – दिवाळीचा गोडवा आणि आठवणी…

>> धनंजय साठे

अभ्यंगस्नान, भाऊबीज, पाडवा आणि इतर सण येणाऱया पिढीसाठी जणू पारंपरिक शिक्षणाचे वर्गच आहेत. आपली नाती आपण कशी टिकवावी याचे सण-उत्सव हे उत्तम उदाहरण आहेत. अशा आठवणींनी दिवाळीचा हा गोडवा अधिकच मुरत जातो.

दिवाळी म्हटलं की, आठवते ती आईच्या प्रेमळ आवाजातली हाक ‘उठा उठा दिवाळी आली!’ पहाटेच्या थंडीत आई अंगाला उटणं व तेल चोळून द्यायची. मग गरम पाण्याने आंघोळ अर्थात अभ्यंगस्नान व्हायचे. त्यात थोडेसे सुगंधी अत्तर मिसळल्याने जो सुगंधी घमघमाट सुटायचा ती ऊर्जा निराळीच असायची. मग अर्धी आंघोळ झाली की, आई ओवाळायची. आंघोळ करून बाहेर आलो की, भावंडे व मित्रमंडळींबरोबर फराळ व्हायचा. गप्पा, धमाल-मस्ती करत फराळ तोंडात कोंबत बाहेर फिरताना मज्जा यायची. आजकाल दिवाळीच्या काळात प्रत्येक जण आपापले वेगळेच प्लॅन आखतो. कुटुंबासोबत एकत्र सण साजरा होण्याचे चित्र जरा दुर्मिळच झाले आहे. दिवाळी सणाचे स्वरूप काळानुसार आणि सामाजिक बदलानुसार खूप बदलले आहे. पारंपरिक दिवाळी सण धार्मिक व सांस्कृतिक महत्त्वावर आधारित होता, परंतु आजच्या आधुनिक काळात त्यावर सामाजिक, आर्थिक आणि तंत्रज्ञानाचा अधिक प्रभाव दिसून येतो.

जेव्हा आई पहाटे उठवायची, तेव्हा आळस झटकून आम्ही पटकन उठत असू. कारण त्याकाळात आमच्या आजोबांनी सांगून ठेवले होते की, दिवाळीत सूर्योदयाच्या आधी आंघोळ झालीच पाहिजे अन्यथा नरकात जावे लागते. त्यामुळे ती सूर्योदयाची वेळ गाठणे हे जणू आपले परमकर्तव्य असल्याप्रमाणे आम्ही शहाण्यासारखे अभ्यंगस्नान उरकून घेत असू. आजही नरकात जावे लागेल हे आजोबांचे शब्द कानात घुमतात. किती निर्मळ जीवनशैली होती तेव्हा. आजच्या मुलांना सांगून बघा. ते लगेच गुगल करून आपल्यालाच शिकवतील की, असे काही नसते.

दिवाळीमध्ये कुटुंब, समाज आणि काही धार्मिक विधींना प्राथमिकता दिली गेली आहे. घरातली स्वच्छता, सरस्वती पूजन, लक्ष्मीपूजन, रांगोळ्या काढणे, दिवे लावणे आणि फटाके फोडणे हे सर्व कार्यक्रम एकत्रित साजरे केले जातात. दिवाळी सणात आध्यात्मिक आणि धार्मिक मूल्ये अधिक जपली जात असत असे आज मागे वळून पाहताना वाटते. आधुनिक काळातले तंत्रज्ञान, एकूण जीवनशैली आणि महत्त्वाचे म्हणजे पर्यावरणाचा खास विचार करणारी जागृत लोक आज बऱयापैकी पाहायला fिमळतात. फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण असो वा चार फटाके कमी वाजवण्याने आयुष्यात फारसा फरक पडत नाही अशी मानसिकताही पाहायला मिळते.

आमच्या लहानपणी बाजारात जाऊन खास दिवाळीचे शॉपिंग करणे हा एक सोहळाच असायचा. विकत घेतलेले शर्ट पीस व पॅन्ट पीस शिंप्याकडे आपल्या आवडत्या स्टाईलमध्ये शिवायला टाकणे आणि मग ते कपडे तयार होऊन कधी एकदा हातात येतात याची वाट पाहण्यात एक वेगळीच मज्जा असायची. पण एक गोष्ट मान्य करायला हवी की, हल्ली तंत्रज्ञानामुळे शॉपिंग अॅप्सच्या मदतीने घरबसल्या हवे ते आणि हवे तसे कपडे घेणं शक्य झाले आहे. पण सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे पूर्वी जसे काका, काकू, मामा,आत्या आणि सगळी चुलत-मामे भावंडे घरी जमा होऊन एकत्र फराळाचा आस्वाद घ्यायचे आणि जी धम्माल, मस्ती करायचे ते आता कमी झाले आहे. आता
व्हॉट्सअॅपवरून शुभेच्छा संदेश लिहिण्याचे कष्टही न घेता ते फॉर्वर्ड केले जातात. त्यातला मायेचा ओलावा कायमचा हरवला आहे.

परंतु तंत्रज्ञानाचा एक फायदा मात्र नक्कीच मानावा लागेल. परदेशात राहणारे आपले नातेवाईक आज सहजपणे व्हिडीओ कॉलद्वारे िबनापासपोर्ट आपल्या घरी पोहोचू शकतात. व्यापाऱयांसाठी तर दिवाळी ही जणू लॉटरीच असते. विविध ऑफर्स आणि सवलतीच्या भडिमारामुळे ग्राहक खूश असतात. एकूण काय तर प्रत्येक व्यक्ती शक्य तितके दिवाळीचे हे चार दिवस आपली सगळी टेन्शन्स, दुःख बाजूला ठेवून निव्वळ आनंद घ्यायच्या प्रयत्नात असतो.

अभ्यंगस्नान, भाऊबीज, पाडवा आणि इतर सण येणाऱया पिढीसाठी जणू पारंपरिक शिक्षणाचे वर्गच आहेत. आपली नाती आपण कशी टिकवावी याचे ते उत्तम उदाहरण असल्याने सण-उत्सव साजरे करण्याची परंपरा आपल्या देशात आहे. सध्याच्या पिढीला या सगळय़ाची माहिती असणे महत्त्वाचे वाटते. लहानपणी माझ्या दोन धाकटय़ा बहिणी मी त्यांना भाऊबीजेसाठी काय भेटवस्तू देणार याकडे बारीक लक्ष ठेवून असायच्या. तसे असले तरी आम्ही तिन्ही भावंडे एकत्र बसून आकाश कंदील बनवायचो. तेव्हा आमची कल्पकता ओसंडून वाहायची. आज या सगळय़ा गोष्टी खूप सोप्या झाल्या आहेत. कारण वेगवेगळ्या आकारांचे आणि डिझाइन्सचे विविध प्रकारचे कंदील बाजारात मिळतात. एखादा अगदीच आळशी असेल तर त्याच्यासाठी ऑन लाइन बाजार पण आहेच की…!

अजून एक गोड आठवण म्हणजे बारीक टिकल्मयांची डबी घेऊन आम्ही मित्र अंगणात बसत असू आणि एकेक टिकली जमिनीवर घासून फोडत असू. ती छोटी टिकली फोडताना आम्हाला मोठा आनंद मिळायचा. या वर्षी काही कौतुकाच्या गोष्टी आमच्या सोसायटीत पाहायला मिळाल्या. आमच्या सोसायटीमधल्या महिला वर्गाने रांगोळी स्पर्धेत अतिशय कल्पकतेने आणि कौशल्य पणाला लावून अतिशय सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या. त्यांना बक्षिसेही देण्यात आली. बालवीरांनी किल्ला बनवण्याची संस्कृती जपत अतिशय उमदे किल्ले बनवले होते. त्यामुळे आनंद या गोष्टीचा होतो की, आजही त्यांना परंपरेचा विसर पडलेला नाही. सांगायचे असे की, जोपर्यंत लोकांमध्ये हुरूप आहे व जोश आहे, तोपर्यंत दिवाळी बदलत्या स्वरूपात का होईना, साजरी होत राहणार.

[email protected]