दिल्ली डायरी – ‘आप’ का क्या होगा?

>> नीलेश कुलकर्णी

दिल्लीत 27 वर्षांनंतर ‘कमळ’ फुलल्याने आता ‘आप’ का क्या होगा? असा सवाल आम आदमी पक्षाबद्दल विचारला जात आहे. पराभव पचवून केजरीवालांना पुन्हा उभे राहावे लागेल. स्वतः विविध चौकशांच्या फेऱयात अडकलेले केजरीवाल पुन्हा उभारतात का? यावरच ‘आप’ का क्या होगा? या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे. केजरीवाल लढवय्ये आहेत. त्यांनी फारशी ताकद नसताना भाजपेष्ठीच्या नाकात दम आणला होता हे विसरून चालणार नाही.

दिल्लीत भाजपचा विजयी जल्लोष सुरू असतानाच, पंजाबचे आपचे मुख्यमंत्री भगवंत मान हे भाजपचे ‘फोडाफोडाडीत पीएच.डी.’ असलेले चाणक्य अमित शहा यांच्या संपर्कात असल्याच्या बातम्यांनी जोर पकडला आहे. महाराष्ट्राप्रमाणे पंजाबातही ‘खोके पॅटर्न’ राबवून सरकार विकत घेण्याचा दिल्लीकरांचा मनसुबा दिसतो. त्यातच सत्तेतून बाहेर पडल्यामुळे नाही म्हटले तरी आपच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. अनेकांच्या चौकशा सुरू आहेत. अनेकजण विंगेत आहेत. अशा स्थितीत सत्ता नसताना पक्ष सांभाळणे हे अरविंद केजरीवाल यांच्यापुढचे सर्वात मोठे आव्हान असेल. त्यामुळे पंजाबातले सरकार टिकवणे, पक्षाचे कार्यकर्ते सांभाळणे आणि पुन्हा नवा विश्वास जागवणे या तीन पातळय़ांवर केजरीवालांना झटून काम करावे लागणार आहे. दिल्ली विधानसभेत ‘आप’चा पराभव जरूर झाला, मात्र ‘आप’ची कामगिरी सुमार वगैरे झालेली नाही. मध्यमवर्गाने आणि मुस्लिमांनी केजरीवालांकडे साफ पाठ फिरवल्याने तसेच काँगेसचा व्होटशेअर वाढविण्याची भाजपची रणनीती यशस्वी ठरल्याने आपचा ‘झाडू’न सफाया झाला.

‘आप’ आणि केजरीवाल यांचे काय होईल, हा प्रश्न जो तो एकमेकाला विचारतो आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे त्या पक्षाची राजकीय रचना ही परंपरागत राजकीय पक्षासारखी नाही. एनजीओ पॅटर्नप्रमाणे चालणारा हा पक्ष अण्णा हजारे यांच्या लोकपाल आंदोलनातून जन्माला आला. केजरीवालांनी तेव्हापासून देशातली सिस्टीम बदलण्याची भाषा केली होती. ती प्रत्यक्षात काही आली नाही. दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून 10 वर्षांच्या सत्ताकाळात केजरीवालांनी जरूर काही चांगले बदल केले, मात्र त्यांचा पक्ष देशातील ‘भ्रष्ट सिस्टीम’चाच एक भाग कधी बनला हे त्यांनाही समजले नाही. भाजपच्या महाशक्तीने केजरीवालांना येनकेनप्रकारेण नेस्तनाबूत करून टाकण्याचा प्रयत्न करूनही केजरीवालांनी दिल्लीचा किल्ला मजबुतीने राखला होता. यावेळी मात्र हा किल्ला पडला. केजरीवालांनी स्वच्छ राजकारणाची भाषा केली, मात्र त्यांच्या पक्षातही अनेक हौशे-गवशे-नवशे आले. आता यापैकी अनेकजण त्यांची साथ सोडतील. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग नावापुरते आपचे आहेत. पंजाबात मान यांच्याविरोधात प्रचंड असंतोष आहे. त्यात तिकडेही पक्षफूट झाली किंवा सरकार गडगडले तर केजरीवालांना पक्ष सांभाळणे कठीण होणार आहे. पंजाब ही भाजपची कायमच ‘दुखरी नस’ राहिलेली आहे. अनेक प्रयत्न करूनही पंजाब आजतागायत भाजपला पादाक्रांत करता आलेला नाही. शूरवीरांचा पंजाब खोके पॅटर्न राबवून सरकारसकट ताब्यात घेण्याचा महाशक्तीचा डाव आहे.

मोदींचे कुंभस्नान अन् केजरीवालांचे ‘टायमिंग’

पंतप्रधान नरेंद्र मोदी जिथे जातील ती बातमी बनते. सध्याच्या मीडियाची ही खासियत आहे. त्यामुळेच या मीडियाला ‘गोदी मीडिया’ असे उपहासाने संबोधले जाते. मोदी हे धार्मिक वृत्तीचे गृहस्थ आहेत. ते त्यांच्या पक्षाच्या ‘कट्टर हिंदुत्वाचे पोस्टरबॉय’देखील आहेत. प्रत्येकाची आपली श्रद्धा असते. पवित्र महाकुंभात स्नान करण्यासारखा दुसरा योग नाही. मात्र, त्याचे किती मार्पेटिंग करावे? असा सवाल पंतप्रधानांचे कुंभस्नान पाहिल्यावर उपस्थित होतो. मोदीसाहेबांचे पुंभस्नान दाखविण्यासाठी मीडिया अगदी गंगामातेच्या तळाला जाऊन बसला होता. पंतप्रधानांचा एक प्रोटोकाॅल असतो. नाहीतर मीडियातल्या काहीजणांनी पाण्यात उडय़ादेखील मारल्या असत्या, मात्र मोदींच्या या यथासांग पुंभस्नानाने दिल्लीत केजरीवालांची पंचाईत झाली. ती कशी, असा प्रश्न तुम्हाला पडू शकतोच. तर झाले असे की, मोदी कुंभस्नानाला गेले त्या दिवशी दिल्ली विधानसभेचे मतदान होते. सुरुवातीला केजरीवाल सहकुटुंब सकाळी अकरा वाजता मतदानाला जातील, असा निरोप मीडियाला देण्यात आला. मात्र, अकरा वाजले, बारा झाले, दुपार होत आली तरी केजरीवाल त्यांच्या फिरोजशाह रोडवरच्या बंगल्यातून काही बाहेर पडेनात. त्यामुळे सकाळपासून त्यांच्या दारापुढे ताटकळत असलेल्या मीडियाची अस्वस्थता अधिकच वाढली. मात्र, तिकडे प्रयागराजमध्ये मोदीसाहेबांचे कुंभस्नान आटोपले की केजरीवालांनी पायात चपला सरकवून मतदानासाठी पूच केले. केजरीवालांनी असे केले त्याचे एक गमतीशीर कारण नंतर कळाले. मोदींचे स्नान चालू असताना आपण मतदान केले, हे कोणीही दाखवणार नाही, हे उमगल्यानंतर केजरीवालांनी नाइलाजाने टीव्हीवर ‘मोदींचा स्नान सोहळा’ पाहिला आणि मग ‘मीडियाचा झोत’ आपल्याकडे ठेवत मतदानासाठी प्रयाण केले. आता बोला!

नेताजी के बेटे ‘सेट’ हुए

भाजपात घराणेशाहीला वाव नाही, असा आव नेहमीच आणला जातो. काँगेस आणि इतर राजकीय पक्ष घराणेशाहीचे बटिक असल्याची टीका भाजपकडून होते, मात्र प्रत्यक्षात गेल्या दहा वर्षांत भाजपनेच सर्वाधिक घराणेशाहीला बळ दिले आहे, हे अनेक उदाहरणांवरून सांगता येईल. दिल्लीच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपने तीन माजी मुख्यमंत्र्यांच्या अपत्यांना सेट केले. भाजपचे सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री राहिलेल्या मदनलाल खुराणा यांचे चिरंजीव हरीश खुराणा यावेळी पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून आले. सुषमा स्वराज यांच्या कन्या बांसुरी याअगोदरच लोकसभेवर निवडून आलेल्या आहेत. लोकसभेला तिकीट कापलेले माजी मुख्यमंत्री साहबसिंग वर्मा यांचे चिरंजीव प्रवेश वर्मा तर अरविंद केजरीवालांना धोबीपछाड देऊन देशभरात लोकप्रिय झाले आहेत. हरीश, बांसुरी व प्रवेश यांचे निवडून येण्यामागे त्यांचे काही कर्तत्व आहे काय, असा सवाल कोणी केलाच तर त्याचे उत्तर हो, असे आहे. हरीश खुराणा गेल्या अनेक वर्षांपासून भाजपच्या संघटनेत झोपून देऊन काम करतात. प्रवेश दोनवेळा खासदार होते तर बांसुरी यांनीही पक्ष संघटनेत काम केलेले आहे. दिल्लीत भाजपने तीन माजी मुख्यमंत्र्यांची मुले सेट केली म्हणून कोणी बोटे मोडणार नाही, मात्र हाच प्रकार इतर पक्षांत झाला असता तर भाजपने एव्हाना आकाश-पाताळ एक केले असते. गेल्या दहा वर्षांत भाजपने काय आनंदाने स्वीकारले असेल तर, ते म्हणजे ‘सोयिस्कर घराणेशाही’. ‘आपला तो बाब्या दुसऱयांचं ते कार्ट’ हा प्रकार आता तरी थांबायला हवा.