वेब न्युज – जगातील धोकादायक स्थळे

सर्वांना हव्याहव्याशा वाटणाऱ्या सुट्ट्या लवकरच येत आहेत. यंदा दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये प्रत्येकाने काही ना काही बेत ठरवलेले असणार हे नक्की. कोणी एखादा छंद जोपासण्याचा, कोणी फक्त आराम अन् आराम करायचा, तर कोणी मित्र-मंडळींच्यात वेळ घालवण्याचा. मात्र पर्यटन अथवा प्रवासाचा बेत आखणाऱ्यांची संख्या निश्चित जास्त असणार आहे. सुट्टय़ा म्हटलं की एखाद्या छानशा पर्यटनस्थळी, देवदर्शनासाठी जाणे हे ओघाने आलेच. सोशल मीडियावर सध्या अशा आकर्षक पर्यटन स्थळांची जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र या चर्चेत लक्ष वेधून घेत आहेत अशी काही ठिकाणे, ज्यांना जगभरच्या लोकांनी सर्वात असुरक्षित आणि धोकादायक अशी विशेषणे दिली आहेत.

अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे असलेल्या डेथ व्हॅलीचे नाव धोकादायक स्थळांमध्ये वरच्या क्रमांकावर आहे. ही जगातील सर्वात उष्ण जागा असून, इथले तापमान कधी कधी 56.7 डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचते. जोडीला इथे कायम येणारी रेतीची भयानक वादळे आणि भूकंप या जागेला जास्त धोकादायक बनवतात. ब्राझील इथे असलेले स्नेक आयलंड सर्वात विषारी बेट म्हणून ओळखले जाणारे ठिकाण आहे. इथे सापांची संख्या इतकी प्रचंड आहे की, तुम्हाला पावला पावलावर साप दिसतील असे म्हणायला हरकत नाही. जगातील सर्वात विषारी सापांपैकी एक असलेला गोल्डन लेन्सहेड वायपर हा साप याच बेटावर आढळतो.

गिर्यारोहणाची आवड सध्या तरुणाईमध्ये प्रचंड प्रमाणात वाढली आहे. अशा काही हौशी गिर्यारोहकांनी नेपाळमध्ये असलेल्या माऊंट एव्हरेस्टला धोकादायक स्थळ असे म्हटले आहे. जगातील सर्वात उंच असलेल्या या शिखरावर चढाई करणे हे काही येऱ्यागबाळ्याचे काम नाही. ऑक्सिजनची कमी, जोरदार वारे आणि सतत होणारी बर्फवृष्टी इथल्या गिर्यारोहणाला अधिक जिकरीचे बनवते. इथे जाण्यापूर्वी गिर्यारोहकाला अनेक वैद्यकीय चाचण्यांना सामोरे जावे लागते आणि तंदुरुस्ती सिद्ध करावी लागते. जगातील सर्वात थंड प्रदेश असलेल्या रशियामधील सायबेरिया या स्थळाचादेखील या यादीत अनेकांनी समावेश केला आहे. थंडीत इथले तापमान उणे 50 डिग्री सेल्सियस इतके खाली उतरते.

स्पायडरमॅन