>> श्रीरंग काटेकर
औषधनिर्माण शास्त्र शाखेतील पदविका (डी. फार्मसी) प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया (पीसीआय) या शिखर संस्थेने एक्झिट एक्झाम देणे बंधनकारक केले आहे. त्यानंतरच या विद्यार्थ्यांना फार्मासिस्ट म्हणून आपापल्या राज्यातील फार्मसी कौन्सिलकडे नोंदणीसाठी अर्ज करता येतो. अधिकृत नोंदणी झाल्यावर प्रमाणपत्र मिळते. या प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी अथवा व्यवसाय सुरू करता येतो. मात्र, मागील पाच महिन्यांपासून एक्झिट एक्झाम झालेली नाही. परिणामी डी. फार्मसी पदविकाधारक विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.
औषधनिर्माण क्षेत्रातील शिखर संस्था फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया (पीसीआय, नवी दिल्ली) व त्यास अनुसरून इतर संस्थांमधील समन्वयाच्या अभावामुळे देशातील औषधनिर्माण शास्त्र शाखेत शिक्षण घेणारे विद्यार्थी भरडले जात आहेत. शैक्षणिक वर्ष 2024 – 25 मधील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमातील (बी. फार्मसी, एम. फार्मसी) प्रवेश प्रक्रियेला झालेला विलंब त्याचप्रमाणे शैक्षणिक वर्ष 2023 -24 मध्ये डी. फार्मसी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक केलेल्या एक्झिट परीक्षेस झालेला विलंब विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणारा आहे.
औषधनिर्माण शास्त्र शाखेतील पदविका (ङी. फार्मसी) अभ्यासक्रमावर आधारित एक्झिट एक्झाम ही प्रक्रिया राष्ट्रीय स्तरावर राबविण्यात येते. शैक्षणिक वर्ष 2023 – 24 पासून देशातील सर्व औषधनिर्माण शास्त्र पदविकाप्राप्त विद्यार्थ्यांना फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया (पीसीआय) या शिखर संस्थेने एक्झिट एक्झाम देणे बंधनकारक केले आहे. औषधनिर्माण शास्त्र शाखेतील दर्जात्मक व गुणात्मक शिक्षणातून तज्ञ व कुशल फार्मासिस्ट घडविणे, त्याचबरोबर बदलत्या काळानुसार सक्षम रुग्णसेवा देऊन औषधनिर्माण शाखेचा दर्जा उंचावणे या हेतूने डी. फार्मसी एक्झिट एक्झाम घेण्याचा धोरणात्मक निर्णय पीसीआयने घेतला आहे. ही परीक्षा नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस, नवी दिल्ली) यांच्यामार्फत घेण्यात येणार आहे.
नोंदणीस अडथळा
वर्षातून दोनवेळा घेण्यात येणारी ही परीक्षा 3, 4 व 5 ऑक्टोबर रोजी तीन दिवस तीन पेपर अशा वेळापत्रकानुसार घेण्यात येणार होती. यासाठी देशभरातील सर्व महाविद्यालयांतील डी. फार्मसी द्वितीय वर्ष उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या परीक्षेला बसण्यासाठी इच्छुक होते, परंतु 20 ऑक्टोबरच्या एनबीईएमएस यांच्या आदेशानुसार ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे विद्यार्थ्यांना संकेतस्थळावरून कळविण्यात आले. वास्तविक ही परीक्षा नियमाच्या अधीन राहून वेळेत पूर्ण होणे गरजेचे होते, परंतु संबंधित यंत्रणेच्या गलथान कारभाराचा नाहक त्रास विद्यार्थ्यांना सोसावा लागत आहे.
या परीक्षेला विलंब होत असल्याने डी. फार्मसी परीक्षा उत्तीर्ण होऊनही विद्यार्थ्यांना फार्मासिस्ट म्हणून फार्मसी ऑफ इंडियाकडे अधिकृत नोंदणी करता येत नाही. परिणामी औषधनिर्माण शास्त्र शाखेची पदवी असूनही नोकरी अथवा व्यवसाय सुरू करता येत नाही अशा काsंडीत हा युवक वर्ग सापडला आहे. या विद्यार्थ्यांची ही मोठी शोकांतिका आहे. अशी स्थिती सर्व देशभरातील औषधनिर्माण शास्त्र शाखेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची झाली आहे. याबाबत संबंधित यंत्रणेचे झालेले दुर्लक्ष विद्यार्थ्यांच्या करीअरसाठी घातक ठरत आहे याकडे गांभीर्याने पाहणे व निर्णय घेणे अपेक्षित आहे.
देशातील जवळपास 2892 फार्मसी महाविद्यालयांतून 1 लाख 72 हजार 920 दरवर्षी प्रवेश घेतात. यामधील सरासरी एक लाख विद्यार्थी उत्तीर्ण होतात. त्या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या एक्झिट एक्झाम वेळेत न झाल्याने विविध समस्या विद्यार्थ्यांपुढे व त्यांच्या पालकांपुढे निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. एक्झिट एक्झाम ही परीक्षा कधी व कशी होणार, याबाबत अद्याप कोणताही निर्णय अथवा आदेश संबंधित यंत्रणेकडून महाविद्यालयांना प्राप्त न झाल्याने देशभरातील डी. फार्मसी उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शैक्षणिक वर्ष 2023 – 24 मध्ये फार्मसी उत्तीर्ण झालेल्या देशभरातील असंख्य विद्यार्थ्यांनी भविष्यातील उज्ज्वल करीअरचे स्वप्न उराशी ठेवून तीन महिन्यांचे ट्रेनिंग पूर्ण केलेले असते. यानंतरच त्यांना फार्मासिस्ट म्हणून आपापल्या राज्यातील फार्मसी कौन्सिलकडे नोंदणीसाठी अर्ज करता येतो. उदा. महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिल, मुंबई (एमएसपीसी) यांच्याकडे राज्यातील उत्तीर्ण झालेले फार्मासिस्ट नोंदणी करतात. अधिकृत नोंदणी झाल्यावरच त्या प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी अथवा व्यवसाय सुरू करता येतो. देशातील असंख्य विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण झाल्यावर नोंदणी होईल या आशेवर मेडिकल शॉप, तेथील फर्निचर व अंतर्गत सजावट यासाठी लाखो रुपयांची गुंतवणूक केलेली असताना केवळ एक्झिट एक्झामच्या विलंबामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. याची नोंद संबंधित यंत्रणेने त्वरित घ्यावी हीच देशभरातील डी. फार्मसी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे.
(लेखक लिंब, सातारा येथील गौरीशंकर नॉलेज सिटीचे जनसंपर्क अधिकारी आहेत.)