लेख – वाढत्या चक्रीवादळांचे दुष्टचक्र

>> रंगनाथ कोकणे

अलीकडेच पुद्दुचेरी, तामीळनाडूला फेंगलचक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला. यामुळे शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा, विमानतळ सर्व बंद ठेवावे लागले. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत गोव्यापासून कर्नाटकपर्यंत जोरदार पाऊस झाला. चक्रीवादळे ही नैसर्गिक आपत्ती नाही. जागतिक तापमानवाढीमुळे होणाऱ्या हवामान बदलांमुळे अशा वादळांची संख्या वाढली आहे. महाराष्ट्रातही आपण या वादळांमुळे झालेली हानी पाहिली आहे. निसर्गाशी होणारी छेडछाड माणसाने आटोक्यात आणली नाही तर चक्रीवादळांमुळे किनारपट्टीवरील शहरांतील सर्वसामान्यांचे जगणे कठीण होईल.

गेल्या महिन्यामध्ये अमेरिकेमध्ये ‘बॉम्ब’ चक्रीवादळाने हाहाकार उडाला. अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर आलेल्या या वादळामुळे जवळपास सहा लाख घरांमधील वीज गेली, तर काही भागांत 20 ते 30 सेंटिमीटर पाऊस झाला. तसेच 12 ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या. या चक्रीवादळामुळे सात दिवसांत या भागात आठ ट्रिलियन गॅलन पर्जन्यवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यापूर्वी भारतात ऑक्टोबर महिन्यात ओडिशा राज्याच्या किनारपट्टीवर दाना चक्रीवादळामुळे आलेल्या मुसळधार पावसाने सुमारे 1.75 लाख एकर जमिनीवरील उभ्या पिकांचे नुकसान झाले. तसेच 2.80 लाख एकर जमिनीवरील पिके बुडिताखाली गेली. यंदाच्या वर्षी उन्हाळ्यातच आपल्या देशात चक्रीवादळ सुरू झाले. मे महिन्यात आलेले रामल चक्रीवादळ हे वर्षातील सर्वात भीषण चक्रीवादळ ठरले. ज्याचा वेग ताशी 110 किलोमीटर होता. त्यानंतर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये ‘आसना’ वादळाने बंगालच्या उपसागरात खळबळ उडवून दिली. दानाने ऑक्टोबरमध्ये कहर केला. या वर्षी 11 वेळा डिप्रेशन, तर सात वेळा डीप डिप्रेशन तयार झाले. वाऱ्याचा वेग ताशी 31-50 किमी असतो तेव्हा भारतीय हवामानशास्त्र विभाग त्याला ‘डिप्रेशन’ म्हणतो आणि जेव्हा वाऱ्याचा वेग ताशी 51-62 किमी असतो तेव्हा त्याला ‘डीप डिप्रेशन’ म्हणतात.

चक्रीवादळांमुळे होणारे नुकसान हे प्रचंड मोठे असण्याची भीती असते. या वर्षीचेच उदाहरण पाहिल्यास देशात गेल्या 11 महिन्यांमध्ये आलेल्या विविध चक्रीवादळांमुळे 278 लोकांचा मृत्यू झाला असून सुमारे 5,334 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याची नोंद झाली आहे. जीवित व वित्तहानीचा हा आकडा प्रत्यक्षात अधिक असू शकतो. आभाळ एकदम भरून येणे, सोबत विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट होऊन पाऊस सुरू होणे ही या वादळाची लक्षणे होत. ही वादळे समुद्रात निर्माण होत असल्याने वाऱ्याचा तडाखा समुद्रकिनाऱ्याजवळच्या प्रदेशाला प्रामुख्याने बसतो. अचानकपणे मुसळधार पाऊस पडू लागल्याने नद्यांना पूर येतात. झाडे उन्मळून पडणे, वाहतूक बंद पडणे आणि वीज पुरवठा बंद होणे हे या वादळांचे परिणाम असतात. आभाळ भरून आल्याने हवाई वाहतूक आणि समुद्रात लाटा उसळल्याने जलवाहतूक बंद पडते. काही वेळा जहाजे उलटतात, बुडतात. वादळ आणि पूर ही संकटे कमी झाल्यावर पुनर्वसनाचे प्रश्न निर्माण होतात. अशुद्ध पाण्यामुळे रोगराई पसरते.

इंटरगव्हर्नमेंटल ग्रुप ऑन क्लायमेट चेंजच्या 2019 मध्ये प्रसिद्ध झालेल्या विशेष अहवालानुसार, 1970 पासून हरितगृह वायू उत्सर्जनामुळे निर्माण होणारी 90 टक्के अतिरिक्त उष्णता जगातील महासागरांनी शोषून घेतली आहे. त्यामुळे महासागरांचे तापमान कमालीचे वाढत आहे. याचाच परिणाम म्हणजे गेल्या तीन-चार दशकांमध्ये चक्रीवादळे अधिकाधिक धोकादायक बनत चालली आहेत. समुद्राचे तापमान 0.1 अंशाने वाढले म्हणजे चक्रीवादळाला अतिरिक्त ऊर्जा मिळते. मोठ्या प्रमाणात हवा वेगाने फिरते तेव्हा तयार होणाऱ्या वादळाला उष्णकटिबंधीय चक्रीवादळ म्हणतात.

भारतीय उपखंडात प्रत्येक वेळी वारंवार येणाऱ्या आणि प्राणघातक वादळांचे खरे कारण म्हणजे मानवाकडून निसर्गाच्या अंदाधुंद शोषणामुळे होणारे हवामान बदल होय. या वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने इशारा दिला होता की, वाढत्या हवामान बदलांमुळे चक्रीवादळे अधिक धोकादायक बनतील. हवामान बदलामुळे उष्णकटिबंधीय महासागरांच्या तापमानात वाढ झाल्यामुळे चालू शतकाच्या अखेरीस तीव्र पाऊस आणि वादळांचे प्रमाण वाढू शकते.

नासाने केलेल्या अभ्यासात  असे आढळून आले आहे की, समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान अंदाजे 28 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होते तेव्हा तीव्र वादळे येतात. ‘जिओफिजिकल रिसर्च लेटर्स’ (फेब्रुवारी 2019) मध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात असे म्हटले आहे की, समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानात प्रत्येक एक अंश सेल्सिअस वाढीमुळे चक्रीवादळांची संख्या 21 टक्क्यांनी वाढते. मुसळधार पावसासह वादळे सहसा वर्षाच्या सर्वात उष्ण हंगामात येतात, पण या वर्षी पावसाळ्यात आणि थंडीच्या काळात भारतात ज्या प्रकारे वादळाचे हल्ले वाढले आहेत, तो आपल्यासाठी गंभीर इशारा आहे.

विकासाच्या नावाखाली निसर्गाचे शोषण करून आपण जे पर्यावरणीय असंतुलन निर्माण केले आहे ते माणसाला आणखी संकटात टाकू शकते. हवामानात होणारे बदल लक्षात घेऊन पृथ्वीचा बचाव करण्याच्या उद्देशाने 1994 मध्ये पहिले जागतिक राष्ट्रीय संमेलनही झाले होते, पण आपापले औद्योगिक हित लक्षात घेऊन कोणताही विकसित देश कार्बनमध्ये कपात करण्यास तयार झाला नव्हता. 1994 नंतर कार्बन उत्सर्जनात आणखी वाढ झाली. त्याचे परिणाम काय होतात ते आता आपल्या सर्वांच्या डोळय़ांसमोर आहेत. असे असूनही कॉप-29 परिषद तापमानवाढ व हवामानबदलांबाबत करावयाच्या उपाययोजनांबाबत कोणत्याही ठोस निर्णयांविना पार पडते यावरून विकसित देशांचा या प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन लक्षात येतो.

आपल्यालाही आता सातत्याने घडणाऱ्या अशा नैसर्गिक आपत्तींमध्ये काही वेगळे वाटत नाही इतक्या त्या आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनल्या आहेत. अशा प्रकारच्या आपत्ती आल्या की, त्यामागे निसर्गाचे शोषण कारणीभूत आहे असे आपण म्हणू लागतो आणि यापुढे निसर्गाचे संरक्षण करण्याचे संकल्पही केले जातात. पण पुन्हा पहिले पाढे पंचावन्नच सुरू होतात. भविष्यात अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींना आळा घालण्यासाठी निसर्गाची सातत्याने होणारी लूट थांबवावी लागेल. जंगलांची संख्या वाढवावी लागेल. बेसुमार वृक्षतोड थांबवून वनीकरण करावे लागेल. सबंध पृथ्वी गिळंकृत करू पाहणारा प्रदूषणाचा महाराक्षस नियंत्रणात आणावा लागेल. अन्यथा भविष्यात निसर्गाचा प्रकोप आणखीनच वाढत जाईल आणि त्याच्याशी सामना करणे माणसाला अशक्य होऊन जाईल.

(लेखक ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ आहेत.)