>> वैश्विक [email protected])
हो ना करता करता बराच लांबलेला ‘क्रू-9’ यानाचा प्रवास प्रत्यक्षात आला आणि चार अंतराळयात्रींची सोय असलेलं हे स्पेसेक्स या इलॉन मस्कच्या स्पेस कंपनीचं यान व्यवस्थितपणे पृथ्वीपासून अंतराळात 402 किलोमीटरवर असलेल्या ‘स्पेस स्टेशन’शी जुळणी (डॉकिंग) करण्यात यशस्वी झालं. ताशी 17,500 किलोमीटर वेगाने पृथ्वीभोवती 90 मिनिटांत फेरी पूर्ण करणारं ‘इंटरनॅशनल स्पेस स्टेशन’ ही अंतराळात प्रयोग करणाऱया वैज्ञानिक अंतराळयात्रींची छोटीशी ‘वसाहत’च आहे. साधारण फुटबॉलच्या मैदानाच्या आकाराची ही वसाहत वेळोवेळी अनेक अंतराळयात्रींना आसरा देते. तिथे आजवर बावीस देशांच्या 279 पेक्षा अधिक अंतराळयात्रींनी निवास केला आहे. त्याची वर्गवारी करायची तर अमेरिकेचे 158, रशिया- 54, जपान-11, कॅनडा-9, इटली-5, फ्रान्स-4, जर्मनी-4, यूएई-2 आणि सौदी अरेबियाचे 2 अशा अनेक आणि इतरही अंतराळयात्रींनी या स्पेस स्टेशनचा अनुभव घेतलाय. सध्या तिथे 7 जण कार्यरत आहेत.
20 नोव्हेंबर 1998 रोजी अंतराळात गेलेल्या या ‘स्थानका’ला आता पाव शतक उलटून गेलंय. या काळात त्याने अनेक अंतराळयात्रींना वैज्ञानिक प्रयोगांची संधी दिली. तिथे कोणी केवळ हौस म्हणून जात नाही, बोटॅनिकल (वनस्पतीसंबंधी), बायॉलॉजिकल (जैविक) तसंच मेटलर्जिकल (धातुशास्त्र्ााशी संबंधित) असे अनेक प्रयोग तिथे होतात. रासायनिक प्रक्रियांचा अभ्यास केला जातो. ‘वजना’मुळे पृथ्वीवर जे प्रयोग अशक्य ठरतात ते शून्यवत (मायक्रोग्रॅव्हिटी) वजनाच्या अंतराळात कसे करता येतील आणि त्यांचा अंतराळातील आगामी प्रकल्पांसाठी तसंच, पृथ्वीवरही काही गोष्टींसाठी उपयोग करता येईल का, याची सतत पडताळणी केली जाते. उद्या चंद्र किंवा मंगळावर राहायची वेळ आली तर खाण्यापिण्याचं आणि ऑक्सिजनचं काय, हा प्रश्न यायला नको. तिथे पाणी सापडलं तर त्यातून इंधनासाठी हायड्रोजन आणि श्वसनासाठी ऑक्सिजन (प्राणवायू) तयार करता येईल, पण भाजीपाला, फळे, धान्य तिथेच उगवावं लागेल.
अमेरिकेतील हय़ुस्टनमध्येच कृत्रिम ‘मंगळ’ तयार करून तिथल्या संभाव्य जीवनाचा परिणाम माणसांवर काय होईल याची चाचणी वर्षभराच्या ‘डय़ुन अल्का’ प्रयोगातून यशस्वीरीत्या घेण्यात आली. हे प्रयोग जसे पृथ्वीवर होतात तसेच त्याला पुरक प्रयोग अंतराळयात्री स्पेस स्टेशनवर करत असतात. त्यामध्ये ‘थ्री.डी. प्रिंटिंगद्वारा यंत्रनिर्मितीचाही समावेश असू शकतो.
… असेच काही प्रयोग करण्यासाठी म्हणून बोइंग कंपनीच्या स्टारलायनर या स्पेस-शटलमधून सुनीता विल्यम्स आणि बूच विल्मोर हे दोन अंतराळवीर आठवडाभरासाठी म्हणून स्पेस स्टेशनवर ‘कसेबसे’ पोचले आणि तिथेच अडकले. कारण जातानाच या स्टारलायनरचं लक्षण काही खरं दिसत नव्हतं. त्याने स्पेस स्टेशनशी यशस्वी ‘डॉकिंग’ केलं हेच मोठं काम ठरलं. त्यामुळे गेल्या 5 जूनपासून अनुभवी सुनीता आणि पहिल्यांदाच गेलेला ‘बूच’ आजही तिथेच आहेत. ते आता फेब्रुवारीत ज्या ‘क्रू-9’ यानातून परतणार आहेत त्यातलेही दोन अंतराळयात्री तोपर्यंत विविध अंतराळी प्रयोगात सामील होतील.
स्टारलायनरच्या अपयशामुळे ही जबाबदारी क्रू-9 स्पेस शटलकडे आली. त्यातून चार अंतराळयात्री जाणार होते, पण दोन ‘सीट’ सुनीता विल्यम्स आणि बूच विल्मोर यांच्यासाठी रिकाम्या ठेवून केवळ निक हेग आणि अलेक्झँडर गॉर्बनॉल या दोघांनीच स्पेस स्टेशनवर जावं असा निर्णय घेतला. आता ही सर्व मंडळी 2025च्या फेब्रुवारीत पृथ्वीवर परततील.
दरम्यानच्या काळात सुनीता विल्यम्स यांची प्रकृती बिघडल्याची, त्यांच्या देहबोलीत फरक पडल्याची वृत्तं येऊ लागली. सध्याच्या जगभरच्या मीडियाचा एकच ‘गुण’ आहे तो म्हणजे कोणतंही वृत्त ‘सनसनाटी’ करणे. त्यालाच अनुरूप, सुनीताची जरा जास्तच काळजी असल्यागत वृत्त येऊ लागल्यावर स्वतः सुनीतानेच खुलासा केला की, ‘अंतराळातील शून्यवत् गुरुत्वाकर्षणामुळे शरीरावर परिणार होतोच. तसा तो माझ्याही झाला, पण माझं वजन कमी झालंय, ‘हेल्थ’ खराब आहे या वावडय़ांमध्ये तथ्य नाही.’
आता साठीला आलेल्या सुनीताला 2012 पासूनचा अंतराळ प्रवास आणि निवासाचा एवढेच नव्हे तर अधांतरी स्पेसवॉकचाही अनुभव आहे. आणि तिथे (खरं तर त्यांनीच म्हटलं पाहिजे) आजवर 490 दिवसांपेक्षा अधिक काळ ‘स्पेस’मध्ये घालवला आहे. हा लेख आल्यानंतर सुनीता यांच्या परतीचा काळ लक्षात घेतला तर आणखी सुमारे 100 दिवस त्यात वाढतील तेव्हा स्टारलायनरच्या अपयशाने अजिबात नर्व्हस न होता आपण अंतराळयात्री आहोत म्हणजे नेमकं कोणतं साहस करत आहोत याची जाणीव त्यांना आहे. तिथे प्रकृती सुदृढ राहाण्यासाठीचे व्यायाम, आहार याबरोबरच शून्यवत् ग्रॅव्हिटीमुळे हाडांवर होणारे परिणामही त्यांना ठाऊक आहेत. एखाद्या सैनिकाच्या निष्टेने त्या या साहसमोहिमेत अनेकदा सहभागी झाल्या असल्याने त्यांच्या घरची मंडळी, विशेषतः वृद्ध आईसुद्धा निश्चिंत आहेत. रशियन कॉस्मॉनॉट ऑलेग कोकोनेन्को यांनी तर एकूण 878 आणि रशियाचेच वेलेरी पॉल्थॅन्कॉन यांनी सलग 437 दिवस अंतराळात राहाण्याचा विक्रम केलाय. त्यांच्याविषयी पुढच्या लेखात.