आभाळमाया – चिनी स्पेस स्टेशन

>> वैश्विक

गेल्या महिन्यात आठ तारखेच्या संध्याकाळी ‘आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन’ अवकाशात ठिपक्यासारखे सरकताना दिसले. असा ‘सोहळा’ पाहण्यासाठी किंवा रोजच एखादा तरी कृत्रिम उपग्रह आकाशात इकडून तिकडे जाताना बघण्यासाठी, प्रकाश-प्रदूषण नसलेल्या शहरी भागापासून दूर असलेल्या जागी जावे लागते. मध्यंतरी बदलापूरजवळच्या उंबरोली येथे गेलो असताना खूप दिवसांनी ही मानवनिर्मित अवकाशयानं दिसली. अर्थात, अगदी बारीक ठिपक्यासारख्या दिसणाऱया ‘सॅटेलाईटचं दर्शन घ्यायला आधी लांबचा प्रवास करून निरभ्र, प्रदूषणविरहित अवकाशाखाली जायची तयारी पाहिजे.

या स्पेस स्टेशन ‘दर्शना’वरून आठवलं ते चिन्यांचे स्पेस स्टेशन. ते फारसं चर्चेत नसतं. कारण चिन्यांचं राजकारण, संशोधन या गोष्टी जगासाठी तशा गूढच असतात. त्यातच हा देश जगाशी फटकून वागत असल्याने बांबूच्या पडद्याआड काय चालतं याची फारशी कल्पना जगाला येत नाही किंवा नव्हती. आता मात्र उपग्रहांपासून ड्रोनपर्यंत विविध उपकरणांद्वारे पृथ्वी आणि अवकाशाचाही वेध घेता येतो.

शिवाय ‘स्पेस स्टेशन’ तर अवकाशातच असणार. त्यामुळे ते जगाला समजणारच. रशिया-अमेरिका यांच्यातलं ‘शीतयुद्ध’ 1990 च्या दशकात संपल्यावर या दोन्ही देशांनी संयुक्तपणे एक अवकाश मोहीम हाती घेतली ती आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाची. साधारण फुटबॉल मैदानाच्या आकाराचं 450 टन वजनाचं अंतराळस्थानक 1998 मध्ये अस्तित्वात आलं. त्याला पूर्वीच सोय केल्यानुसार इतर अनेक देशांच्या भागांची जोडणी (डॉपिंग) करत त्याचा विस्तार वाढला. सध्या त्यावर 9 अंतराळयात्री असून त्यात सुनिता विल्यम्सही आहे.

सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे जगाशी फटकून वागणाऱया चीनची एक तऱहा तर अमेरिकेची आपण ‘ग्रेट’ असल्याची भावना. या पार्श्वभूमीवर रशियाशी वैचारिक किंवा वैज्ञानिक ‘डॉपिंग’ करून आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन अस्तित्वात आलं हीच एक आश्चर्याची गोष्ट. चीनचा मात्र ‘एकला चलो रे’चा मार्ग कायम असल्याने त्यांनी 19 एप्रिल 2021 या दिवशी आपलं स्वतःचं ‘तियानगॉन्ग’ (स्वर्गीय प्रासाद) नावाचं अंतराळ स्थानक अवकाशात धाडलं. डाव्या चीनने त्याला ‘स्वर्गीय’ प्रासाद वगैरे म्हणावं हेही एक आश्चर्यच. पण ते जाऊ द्या.

तीन भाग वेगवेगळय़ा वेळी अवकाशात पाठवून चीनने त्यांची जोडणी करीत 340 घनमीटर आकाराचं ‘तियानगॉन्ग’ अवकाशात स्थिर केलं. पुढचे दोन भाग 24 जुलै आणि 31 ऑगस्ट 2021 रोजी पाठविण्यात आले. अवकाशात ते 340 ते 450 किलोमीटर उंचीवरच्या लंबवर्तुळाकार कक्षेत ते फिरते. सर्वसाधारणपणे कोणतेही निकटकक्षीय उपग्रह, स्पेस स्टेशन अशा कृत्रिम वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे अवघ्या 90 मिनिटांत पृथ्वीची परिक्रमा करतात. त्यांची दिवस-रात्र प्रत्येकी 45 मिनिटांची असते. असं असल्याने चिनी स्पेस स्टेशनही केव्हातरी सायंकाळी दिसू शकतं. आम्ही ते पाहिलेलं नाही. कारण आपल्या देशावरून जाण्याची त्याची वेळ संध्याकाळनंतरची असावी लागते. गणिती पद्धतीने आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनच्या ‘दर्शना’च्या तारखा आपल्या ठाऊक असतात तशा तियानगॉन्गच्याही असतील.

याची संकल्पना चीनने 2011 मध्येच मांडली. ‘चायना मॅन्ड स्पेस एजन्सी’ पिंवा ‘सीएमसीए’ या त्यांच्या अंतराळ संशोधन संस्थेतर्फे हा 100 टन वजनाचा ‘स्वर्गीय प्रासाद’ (हेवन पॅलेस) बांधण्याचं ठरलं. 55 मीटर लांबीचं आणि 39 मीटर व्यासाचं हे स्पेस स्टेशन अंतराळात सुमारे 1400 दिवस कार्यरत आहे. त्यासाठी आधी  क्रांतीच्या इतिहासातली नावं द्यायचं ठरत होतं. पण नंतर युरोप, अमेरिकेप्रमाणेच पारंपरिक नावं देण्यात आली. चीनचं ‘चॅन्गे’ हे चांद्रयानाचं नावही ‘चंद्रदेवते’वरून देण्यात आलेलं आहे.

नाव काही का असेना, कार्य महत्त्वाचं आणि त्यात त्यांना यश आलंय. आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनच्या एक-तृतीयांश आकार असलेल्या या तियानगॉन्ग’ ऊर्फ स्वर्गीय प्रासादात एका वेळी जास्तीत जास्त सहा अंतराळयात्री राहू शकतात. ये गुआनफू, तॅन्ग हॉन्गबो, ली कॉन्ग आणि काई झूत्शे अशा अंतराळयात्रींनी त्यावर निवास केलाय. एका वेळी तीन आणि दर सहा महिन्यांनी बदलते अंतराळ संशोधक अशी त्यांची पद्धत आहे.

या यशानंतर 2030 पर्यंत चीन चंद्रावर माणूस पाठवण्याचा विचार करतोय. अमेरिकेचे नवे अध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांचा मित्र उद्योजक इलॉन मस्क याच्या भरवशावर लवकरच मंगळावर माणूस पाठवण्याची घोषणाही करून टाकली. अंतराळातल्या या ‘स्पर्धे’ला आता सीमा नसेल. हिंदुस्थानही चंद्रावर माणूस पाठवण्याच्या तयारीला लागला असून ‘गगनयान’ हे आपलंही स्वतंत्र स्पेस स्टेशन काही वर्षांत अंतराळात आपल्या अंतराळयात्रींसह दिसेल.

अवकाशापर्यंत काही करणे ही एकेकाळी कल्पनेची भरारी होती; परंतु ‘स्काय इज द लिमिट’ची ‘मर्यादा’ माणसाने ओलांडली. आता त्याची झेप अनेक ग्रहांचा परस्थ ग्रहांचा शोध घेण्यापर्यंत जात आहे. आपणही त्याला अपवाद राहून चालणार नाही. आज चीन पाश्चात्य जगताला आव्हान देतोय. उद्या आपणही देऊ. मात्र ही सर्व आव्हानं रचनात्मक आणि मानव तसेच सजीव कल्याणकारी असावीत एवढीच अपेक्षा. अन्यथा पृथ्वीवरची ‘रॅट रेस’ अंतराळापर्यंत पोहोचलेली तेवढी दिसेल. चीनने हे ‘थर्ड जनरेशन’ स्पेस स्टेशन अवकाशात पाठवलं त्याचा विस्तार हे 2027 पर्यंत करतील. तोवर आपलं ‘गगनयान’ही तयार असेल. कदाचित 2026 पर्यंत ते अवकाशातही जाईल.