लेख – चिनी विस्तारवादाला ‘नवे इंधन’

>> व्ही. के. कौर

‘डेटा’ हे नव्या जगाचे ‘इंधन’ बनले असले तरी तेल आणि नैसर्गिक वायू या पारंपरिक इंधनाचे महत्त्व कमी झालेले नाही. त्यामुळेच जगभरात इंधनसाठे असणाऱया क्षेत्रावर कब्जा मिळवण्यासाठीचे प्रयत्न आजही सुरू आहेत. यामध्ये चीनची दादागिरी सर्वश्रुत आहे. अलीकडेच चीनच्या नॅशनल ऑफशोअर ऑइल कॉर्पोरेशनने दक्षिण चीन समुद्राच्या पूर्व भागात मोठय़ा तेल क्षेत्राचा शोध लावल्याची घोषणा केली आहे, पण या भागावर फिलीपाइन्स, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि ब्रुनेई यांचादेखील हक्क आहे. त्यामुळे या तेलशोधाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

दक्षिण चीन समुद्र हा आशिया खंडातील एक महत्त्वाचा जलमार्ग आहे, जो व्यापार, सामरिक महत्त्व आणि नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध आहे. या समुद्राखालील तेल आणि नैसर्गिक वायूच्या साठय़ांमुळे अनेक देशांच्या हितसंबंधांचा केंद्रबिंदू बनला आहे. अलीकडेच चीनच्या नॅशनल ऑफशोअर ऑइल कॉर्पोरेशनने या समुद्राच्या पूर्व भागात मोठय़ा तेल क्षेत्राचा शोध लावल्याची घोषणा केली आहे. या तेल क्षेत्रात 10 कोटी टनांहून अधिक प्रमाणात सिद्ध साठे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. हुयझोऊ 19-6 तेल क्षेत्र हे दक्षिण चीनच्या ग्वांगडोंग प्रांतातील शेन्झेनपासून सुमारे 170 किमी (100 मैल) अंतरावर आहे, असे बीजिंगच्या शिन्हुआ वृत्तसंस्थेने म्हटले आहे. या ठिकाणी झालेल्या चाचणी उत्खननातून दररोज 413 बॅरल कच्चे तेल आणि 68,000 घनमीटर नैसर्गिक वायू मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा शोध मोठी उपलब्धी मानला जात आहे.

चीनसाठी हा शोध कितीही महत्त्वाचा असला तरी इथे मुख्य प्रश्न आहे तो संपूर्ण दक्षिण चीन समुद्रावरील त्याच्या दाव्याचा. कारण या भागावर फिलीपाइन्स, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि ब्रुनेई यांचादेखील हक्क आहे. त्यामुळे या तेलशोधाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. याचे कारण व्हिएतनाम आणि मलेशिया यांनी आपली ऊर्जा गरजा भागवण्यासाठी दक्षिण चीन समुद्रात ऑफशोअर ड्रिलिंग प्रकल्पांमध्ये गुंतवणूक वाढवली आहे. फिलीपाइन्स आणि इंडोनेशियादेखील या क्षेत्रातील तेल आणि वायू शोध मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत, पण चीनला दक्षिण चीन समुद्रावर एकहाती अमल हवा आहे.

चीनची विस्तारवादी मानसिकता नवीन नाही. 2000 वर्षांपूर्वीच्या हान साम्राज्याच्या ऐतिहासिक दस्तऐवजांचा आधार घेत, चीन संपूर्ण दक्षिण चीन समुद्रावर हक्क सांगत आहे. या समुद्राची भौगोलिक परिस्थिती पाहता, तो चीनच्या दक्षिणेस, व्हिएतनामच्या पूर्व व दक्षिणेस, फिलीपाइन्सच्या पश्चिमेस आणि बोर्नियो बेटाच्या उत्तरेस पसरलेला आहे. याच्या आसपास चीन, तैवान, फिलीपाइन्स, मलेशिया, ब्रुनेई, इंडोनेशिया, व्हिएतनाम आणि सिंगापूर हे देश आहेत आणि चीनचा या सर्वांशी समुद्री सीमांवरून वाद सुरू आहे. चीन या देशांना धमकवण्यासाठी सातत्याने आपल्या नौदल सामर्थ्याचे प्रदर्शन घडवत असतो.

चीन जगातील सर्वात मोठय़ा अर्थव्यवस्थांपैकी एक असून, त्याला सातत्याने ऊर्जा पुरवठय़ाची गरज आहे. चीन हा जगातील सर्वात मोठा कच्च्या तेल व नैसर्गिक वायूचा आयातदार आहे. दक्षिण चीन समुद्रात प्रचंड तेल आणि वायू साठे असल्याचे अमेरिकेच्या ऊर्जा माहिती प्रशासनाने म्हटले आहे. त्यांच्या अंदाजानुसार, या समुद्रात 190 ट्रिलियन क्यूबिक फूट नैसर्गिक वायू आणि 11 अब्ज बॅरल कच्चे तेल आहे. अमेरिकी भूगर्भ सर्वेक्षणाच्या अहवालानुसार, इथे 160 ट्रिलियन क्यूबिक फूट नैसर्गिक वायू आणि 12 अब्ज बॅरल तेल लपलेले असू शकते. चीनच्या अंदाजानुसार, हा साठा याहून अधिक मोठा आहे. त्यामुळे चीन इतर कोणत्याही देशाला हा साठा वापरण्याची संधी देऊ इच्छित नाही.

1947 पासून चीनने दक्षिण चीन समुद्रावर वर्चस्व गाजवण्याचे प्रयत्न सुरू केले. त्याने प्रथम ‘11 डॅश लाईन’ आखली आणि नंतर 1952 मध्ये व्हिएतनामसोबतच्या करारानंतर तिला ‘9 डॅश लाईन’ मध्ये रूपांतरित केले. 1956 मध्ये दक्षिण चीन समुद्रातील समुद्री अन्वेषणाची सुरुवात झाली. तेव्हापासून, या क्षेत्रातील तेल आणि वायू संसाधनांच्या शोधासाठी विविध टप्प्यांत काम केले गेले आहे. सुरुवातीच्या काळात स्थानिक पातळीवर संशोधन झाले, त्यानंतर 1970 च्या दशकात परदेशी कंपन्यांच्या सहकार्याने व्यापक अन्वेषण झाले. 1990 च्या दशकापासून, चीनने आपल्या राष्ट्रीय पंपन्यांच्या माध्यमातून स्वतंत्रपणे अन्वेषण आणि उत्पादनावर भर दिला, पण यामुळे चीनचा फिलीपाइन्स, मलेशिया आणि इंडोनेशियाशी संघर्ष वाढला आहे. विशेषतः, चीन या देशांच्या ‘विशेष आर्थिक क्षेत्रां’मध्ये घुसखोरी करत आहे. ताजे उदाहरण 25 जानेवारीचे आहे, जेव्हा चीनने फिलीपाइन्सच्या वैज्ञानिक संशोधन करणाऱया जहाजाला अडवले. हा प्रकार फिलीपाइन्सच्या तटरक्षक दलाने नोंदवला आणि त्याचे पुरावे सोशल मीडियावर शेअर केले. याशिवाय, मलेशिया आणि इंडोनेशियाच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून, चीनने त्यांना तेल व वायू उत्पादन थांबवण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही देशांच्या नौदलांनी चीनच्या तटरक्षक जहाजांना हद्दीत प्रवेश करू दिला नाही.

चीनच्या ऊर्जेची मागणी गेल्या चार दशकांत तीन पट वाढली आहे. 1980 साली चीनची तेलाची मागणी दररोज 11.9 लाख बॅरल इतकी होती, तर 2019 पर्यंत ती वाढून 31.92 लाख बॅरल झाली. 2023 मध्ये ही मागणी दुप्पट म्हणजेच 7.89 दशलक्ष बॅरल प्रतिदिन झाली. पेंटागॉनच्या अहवालानुसार, चीनने 2023 मध्ये जवळपास 11.3 दशलक्ष बॅरल प्रतिदिन कच्च्या तेलाची आयात केली, जी त्याच्या एकूण खपाच्या 70 टक्के इतकी होती. चीनच्या रणनीतिक आणि व्यावसायिक तेलसाठय़ांची क्षमता 700 दशलक्ष बॅरलपर्यंत वाढली असून, हा साठा 62 दिवस पुरेल इतका आहे. चीनचा पुढील उद्देश 90 दिवस पुरेल एवढा तेलसाठा निर्माण करणे आहे.

तैवान आणि दक्षिण चीन समुद्रातील तणावाचे मुख्य कारण तेल आणि नैसर्गिक वायूचा साठा आहे. चीन या दोन्ही भागांवर संपूर्ण हक्क सांगत आहे. मात्र तैवान आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने चीनच्या या दाव्यांना मान्यता दिलेली नाही. त्यामुळे चीन आणि अमेरिका यांच्यातही तणाव निर्माण झाला आहे. सध्या दक्षिण चीन समुद्रातील संघर्ष भविष्यात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. कारण, चीनचा सागरी प्रभाव वाढवण्याचा उद्देश स्पष्ट असून, तो तेल आणि वायूसाठय़ावर संपूर्ण नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात आहे.

दक्षिण चीन समुद्र हा केवळ तेल आणि वायू संसाधनांसाठी महत्त्वाचा नसून, जागतिक राजकारण आणि सुरक्षा धोरणांचे केंद्रबिंदू आहे. या क्षेत्रातील संघर्ष आणि लष्करी स्पर्धा वाढल्यास, जागतिक व्यापार आणि ऊर्जा सुरक्षतेवर दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता आहे.