>> सुधाकर वसईकर
खानदेशातल्या नव्वदोत्तरी पिढीतील कवींनी मराठी वाङ्मयात स्वतची ओळख निर्माण करीत, महत्वाची कामगिरी बजावली आहे. त्यातील एक अग्रगण्य नाव म्हणजे अशोक कोतवाल! त्यांचा पहिला बाल कवितासंग्रह ‘घेऊ या गिरकी’ 2014 साली प्रकाशित झाला. त्यानंतर तब्बल दहा वर्षांनी आता त्यांचा ‘गाऊ आनंदाचे गाणे’ बालकुमार कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे. यात अशोक कोतवाल यांनी 30 कवितांमधून खानदेशातील ग्राम्य संस्कृती, शहरी संस्कृती त्याच बरोबर कृषी संस्कृतीचे विलोभनीय दर्शन घडवले आहे. कौटुंबिक नातेसंबंधावर मर्मभेदक भाष्य करणाऱया कविता लिहिल्या आहेत.
‘आनंदाचे गाणे’ ही कविता लहानग्यांमध्ये ऊर्जा, उत्साह भरणारी आहे. जर न थकता सूर्य, चंद्र नित्यानेमाने उगवून आपल्याला दिनचर्या प्रदान करत असतील; तर न रडता, न कुढता जीवन मनमुराद जगून घेतले पाहिजे. कवितेच्या समारोपात कवी म्हणतो,
सूर्य न थकतो चंद्र न थकतो
रोज रात्र नि दिवस उगवतो
सुंदर आहे जीवन आपुले, कशास रडणे कुढणे
सातपुडय़ाच्या पायथ्याशी वसलेल्या सधन,पवित्र, मंगल अशा अवघ्या खानदेशातील नद्या, तेथे घेतली जाणारी पिके, त्यानुसार बनविले जाणारे खमंग पदार्थ, देवीदेवता, साजरे होणारे सण, बहिणाबाईंची गीते, निसर्गाची नवलाई याचे रसभरीत वर्णन तसेच मनमुराद जगण्याचा आनंद घेणारा, स्वभावाने गोड आणि प्रेमळ असणाऱया खानदेशी माणसाची ओळख कवीने ‘अमुचा खानदेश’ कवितेत छान करून दिलीय.
बोली बोलतो जरी अहिराणी
माय आमुची असे मराठी
गोड गुळापरी आम्ही माणसे
प्रेम, आलोखी अमुच्यासाठी
खरेतर खानदेश अवर्षणग्रस्त प्रदेश. पाण्याची भीषण टंचाई. असे असले तरी या ओसाड प्रदेशातल्या सातपुडा पर्वतराजीने कवीचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याचे सुंदर वर्णन ‘सातपुडा पर्वत’ कवितेत केले आहे. पर्यावरणीय जगण्याचे महत्व कवीने पुढील ओळीत सांगितले…
पर्वतावर झाडं आहेत, म्हणून पाऊस पडतो
तोडू नये झाडं कधी, जो तो सांगत असतो
झाडांची उपयोगिता आणि त्यांचे महत्व लक्षात घेऊन वृक्ष संगोपन करणे किती गरजेचे आहे. हे ‘वृक्ष आपले सखे सोयरे’ कवितेत कवी सहज सांगून जातो.
‘अजिंठा’ ही प्रस्तुत संग्रहातली उल्लेखनीय कविता आहे. बौद्ध धर्माचा वारसा जपणाऱया अजिंठा लेण्यातील बौद्ध शिल्पाने कवीला लुब्ध केले असून, त्याचे अप्रतिम वर्णन या कवितेत केले आहे. बुध्दाचे अहिंसा तत्व त्यात उजागार केले आहे.
काळ्या पहाडावरती नांदते
प्रेम, करुणा आणि अहिंसा
बुद्धदर्शने गळून पडते
चित्तामधली कडवी हिंसा
बालमनावर संस्कार करणाऱया अशा संस्कारमय कवितांबरोबरच आजूबाजूचा परिसर, निसर्ग आणि त्यात वावरणारी माणसे, मग जळगावचा केळीवाला असो वा कुल्फीवाला चाचा, गोलावाला, खोडकर टिंग्या असो वा चंगू मंगू, आणि टिंगू, या सगळ्यांचे मनोरंजक चित्रण कवितेत ताकदीने रेखाटले आहे. जे बालमनावर ठसा उमटवणारे आहे. शिवाय आजी-आजोबा, आई-बाबा, नातू यांच्यात उडणारे प्रेमळ खटके आणि रुसव्याफुगव्या बरोबरच निखळ नात्याचे मनोरंजक चित्रण बालसुलभ मनाला लुभावणारे आहे. त्याचप्रमाणे सामाजिक आशयाच्या कविता पानोपानी वाचायला मिळतात.
सर्वच कविता अतिशय सुंदर आहेत. कवितांना लय आहे. नादमाधुर्य आहे. गेयता असल्याने लहान मुलांच्या ओठांवर त्या सहज रुळणाऱयाही आहेत. सरदार जाधव यांनी रेखाटलेले कलात्मक मुखपृष्ठ, आणि आशयाला साजेशी, सुंदर, समर्पक, आकर्षक रेखाटने पुस्तकाच्या सौंदर्यात भर घालतात. उच्च निर्मिती मूल्य असलेला अष्टगंधचा कवितासंग्रह देखणा झाला आहे.
दीर्घ प्रतीक्षेनंतर आलेल्या अशोक कोतवाल यांच्या संस्कारमय, प्रतिभासंपन्न, आशयघन कवितांचे बालवाचक निश्चित स्वागत करतील याची खात्री आहे.
गाऊ आनंदाचे गाणे
कवी ः अशोक कोतवाल
प्रकाशक ः अष्टगंध प्रकाशन
पृष्ठ ः 47 मूल्य ः 200/-