>> विनायक श्रीधर अभ्यंकर, निवृत्त नौसेना अधिकारी
सतराव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराचे युद्धकालीन महत्त्व ओळखून योजनाबद्ध आरमार बांधणी केली आणि तत्कालीन सागरी सीमेचे संरक्षण करण्याची तजवीज केली. शिवरायांचे हे भारतीय इतिहासातील आगळेवेगळे कर्तृत्व आहे. म्हणूनच छत्रपती शिवरायांना ‘भारतीय नौसेने’चे आद्य प्रवर्तक मानतात. आरमाराचा तंत्रशुद्ध अभ्यास करून रणगाजी सागरी काफिला उभा करणाऱ्या छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा! आजच्या भारतीय नौदल दिनानिमित्त…
आधुनिक तंत्रज्ञानामुळे युद्धाचे तंत्र व मंत्र झपाट्याने बदलत असून आरमाराची सामर्थ्य संपन्नता याला फार महत्त्व प्राप्त झाले आहे. तागडी घेऊन आलेला गोरा सोजीर तलवारीचा धनी झाला ते आरमाराच्या जोरावर. भारतात राजा समुद्रगुप्त, केरळातील कुंजाली, झामोरियन या राजांनी आरमार उभे करण्याचे प्रयत्न केले, पण त्यात सातत्य नव्हते. सतराव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराचे युद्धकालीन महत्त्व ओळखून योजनाबद्ध आरमार बांधणी करून तत्कालीन सागरी सीमेचे संरक्षण करण्याची तजवीज केली. शिवरायांचे हे भारतीय इतिहासातील आगळेवेगळे कर्तृत्व आहे. म्हणूनच छत्रपती शिवरायांना ‘भारतीय नौसेने’चे आद्य प्रवर्तक मानतात. 16 वर्षांचे असताना शिवाजी महाराज स्वतः महाडच्या समुद्रकिनारी रपेट मारून सागरी युद्धतंत्राच्या बारकाव्याचा अभ्यास करीत. महाराजांनी भुईकोट किल्ल्यांप्रमाणे जलदुर्गालाही अग्रक्रम देत सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, रत्नदुर्ग, अंजनवेल, खंदेरी असे लहान मोठे दुर्ग बांधून सागरी संरक्षणावर विशेष लक्ष केंद्रित केले.
शिवकालीन भौगोलिक, वैज्ञानिक, राजकीय, सामाजिक व आर्थिक परिस्थिती लक्षात घेतल्यास समजते की, छत्रपती शिवराय हे सागरी युद्ध शस्त्रसज्जतेबाबत काळाच्या फार पुढे होते. सागरी मोहीम चालू असताना एखादे गलबत जायबंदी झाले तर तत्काळ त्याची डागडुजी करता यावी म्हणून ‘गोऱ्या खलाशां’च्या मार्गदर्शनाखाली मराठय़ांनी प्रत्येक जलदुर्गाच्या सागरी भागालगत तरते तराफे (Floting Docks) बांधून जहाजबांधणी उद्योगास चालना दिली. मालवण ही शिवरायांची आरमार राजधानी (Naval Headqurter) होती. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा त्यांच्या आरमारात 74 जंगी बेडे (War Ships) होते. अंदाजे 300 मचवे होते. या आरमारात तीन ते साडेतीन हजार खलाशी/सारंग तैनात होते. हे मराठ्यांचे आरमार दोन विभागांत कार्यरत होते. या आरमारावर तेव्हा सालाना खर्च दशलक्ष मोहरा इतका होता. हे मल्हारबाबा बारगीर यांचे दस्तऐवज व चिटणीसांच्या बखरीवरून समजते. कोकणी (भंडारी, वारली, कातकरी) या जमातीबरोबरच मराठ्यांच्या आरमारात रोहिला, चाऊस, हबशी हे परधर्मीयसुद्धा होते. या आरमाराचा मुख्य गोलंदाज होता चाऊस इब्राहिम तर सरखेल दर्यासारंग होते तुकोजीराव आंग्रे. कान्होजी आंग्रे यांचे वंशज.
मराठ्यांच्या आरमारात विविध प्रकारची जहाजे होती. नाव किंवा मचवा ही लहान जहाजे मालाची ने-आण करत. रसद सतत पुरवून शिबंदीचा व्यवहार चोख पाळत असत. गलबत ही तीन तीन शिडे असणारी मध्यम पल्ल्याची जहाजे होती. या गलबतांवर एका दर्यासारंगाच्या हाताखाली 30 ते 40 खलाशी कार्यरत असत. पाल/शिरब ही जहाजे 30 ते 40 टन वजनाची असत. या जहाजांच्या मध्यभागी तीन-तीन संकेत ध्वजदंड असत. या जहाजांच्या लाकडी भिंतींना गोलाकार भोके पाडून यात उखळी तोफा बसवत असत. किनारपट्टीचे संरक्षण करून व्यापारी नौका व मच्छीमारांचे रक्षण या नौका करत असत. जंगी बेडा या संज्ञेस पात्र असणारे जहाज म्हणजे धुराब होय. या नौकेवर स्वतः स्वार होऊन सरखेल दर्यासारंग युद्धाची मोहीम आखून नेतृत्व करत. पाणसुरुंग किंवा सागरी अडसर दूर करत क्षिरसागराच्या अंतरंगात घुसून शत्रूवर हल्ला करीत असत. पाणी साठवण्यासाठी या जहाजांच्या भिंतीवर मोठमोठ्या पखाली व डेकवर लाकडी ड्रम ठेवलेले असत. धुराब ही तेव्हाची ध्वजनौका होती. या जहाजांवर दारूगोळा ठेवण्यास भांडारे पण होती. या प्रकारच्या जहाजांवर 100/120 तांडेल कार्यरत असत. ही जहाजे सागवानी लाकडांनी बांधल्यामुळे भक्कम, मजबूत व टिकाऊ असत. या जहाज बांधणीचा खर्च 20 हजार होन मुद्रा इतका असे. 1659 ते 1674 पर्यंत शिवरायांच्या आरमाराने बरीच मोठी मजल मारली होती.
जंजिऱ्याच्या सिद्दीविरुद्ध सतत लढा देत डच, फिरंगी, गोरा सोजीर त्यांच्यावरही शिवरायांच्या आरमाराने जरब बसविली होती. 1674 साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी कंपनी सरकारने हेन्री ऑक्सिडन हा प्रतिनिधी नजराणा देऊन पाठवला होता. तो धूर्त व चतूर ब्रिटिश महाराजांना नजराणा पेश करत सवलती मागत होता. कंपनी सरकारचे अंतस्य कुटील हेतू ओळखत शिवराय त्याला खडसावत तंबी देत गरजले. ‘स्वराज्याच्या किनारपट्टीच्या सीमेपासून 30 सागरी मैल दूर राहून इंग्रजी जहाजांनी सफर करायची, अन्यथा ती जहाजे जप्त करून दंड वसूल केला जाईल. स्थानिक व्यापारी, मच्छीमार व सागरी संपत्तीचे नुकसान खपवून घेतले जाणार नाही.’ हा प्रसंग 1674 मधला. भारत सरकारने 1974 मध्ये सागरी आर्थिक मर्यादा कायदा पास केला. शिवाजी महाराज किती प्रजाहितदक्ष, सुरक्षेबाबत संवेदनशील व दूरदृष्टीने विचार करणारे कुशल सेनानी होते हे लक्षात येते.
छत्रपती शिवरायांच्या या आरमाराने गमिनी काव्याप्रमाणे एक अद्भुत सागरी प्रकार सुरू केला होता. जमिनीवरून हल्ला झाला तर सागरी सीमेवरून शत्रूच्या गोटात शिरून गनिमाला कापून नेस्तनाबूद करणे हेच आधुनिक युद्धातील Amphilious Warfare होय. या युद्धप्रकाराचे जनकत्व शिवाजी महाराजांकडे म्हणजे मराठा आरमाराकडे जाते. 1971 साली बांगला मुक्ती संग्रामात हेच युद्धतंत्र आम्ही वापरून पाकिस्तानी नौसेनेचे कंबरडे मोडले होते. आरमाराचा तंत्रशुद्ध अभ्यास करून रणगाजी सागरी काफिला उभे करणाऱ्या छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा!