विज्ञान-रंजन – पटावरचा पराक्रम!

>> विनायक

विज्ञान कशाकशात सामावलं आहे किंवा विज्ञानात काय काय सामावलं आहे, या दोन्ही प्रश्नांचं उत्तर एकच. सर्व गोष्टीत. आपल्या अस्तित्वासाठी आणि जीवनातल्या प्रत्येक गोष्टीमागे विज्ञान कळत-नकळत महत्त्वाची भूमिका बजावतं. आपण निर्माण केलेल्या कला, क्रीडा, संगीत अशा अनेक गोष्टींमध्ये ते दडलेलं असतं आणि म्हणूनच ते रंजकही असतं. क्रिकेट, फुटबॉल, टेनिसपासून कुस्ती, भालाफेक अशा कित्येक क्रीडा प्रकारांत प्रावीण्य प्राप्त करणारे खेळाडू त्यातील ‘विज्ञानाचा’ सराव करत असतात. त्यातही सर्वाधिक महत्त्वाची असते ती खेळाडूची मानसिकता. अर्थातच त्याच्या (किंवा तिच्या) मनाची जडणघडण आणि तयारी यशस्वी होण्यासाठी लागणारी तितिक्षा किंवा सहनशीलता अथवा ‘पेशन्स’ व चिकाटी नसेल तर कोणतीच गोष्ट यशाच्या शिखरापर्यंत नेता येत नाही. त्यासाठी अनेकदा माघार घ्यावी लागते, पराभवही पचवावा लागतो. परंतु ध्येय उत्तम असेल तर त्याचा ध्यास त्यातूनच खेळाडूला (अथवा एखाद्या शास्त्र्ाज्ञालाही) अधिक उमेद देत असतो.

या सर्व गोष्टींची उजळणी करण्याचं कारण म्हणजे आपल्या देशासाठी तब्बल अकरा वर्षांनी बुद्धिबळातलं जगज्जेतेपद मिळवून देणाऱया दोमाराजू गुकेश याचा पटावरच्या 64 घरातला पराक्रम! विश्वनाथ आनंद या आपल्या लोकप्रिय खेळाडूच्या जागतिक यशानंतर पुन्हा एका तपाने या खेळातील सर्वोच्च विजयाची पहाट झाली आहे. अवघ्या 18 वर्षांच्या गुकेशने 18 व्या जगज्जेतेपदाचा सन्मान मिळवला आहे. यापूर्वी विश्वनाथन आनंदने 2012 मध्ये हाच सन्मान प्राप्त केला होता.

बुद्धिबळ हा बैठा खेळ केवळ विचारांच्या आवर्तनाचा तासन्तास सुरू राहू शकेल असा. या काळात प्रतिस्पर्ध्याची संभाव्य चाल कशी असेल याचा दूरदृष्टीने विचार करत प्रत्येक ‘चाल’ खेळायची. किंचितशी गफलतही ‘चेकमेट’ करायला पुरेशी ठरते. अशा या खेळात मन स्थिर आणि जागरूक ठेवून पटावरचा डाव जिंकणे ही बुद्धीच्या बळाची कसोटीच. त्यामुळे खेळाचं आपल्याकडचं नाव अगदी समर्पक आहे…बुद्धिबळ! पाश्चात्य त्याला ‘चेस’ (पाठलाग) म्हणतात.

आठ गुणिले आठ चौरसांचा पट त्यावर राजा, वझीर, दोन उंट, दोन हत्ती आणि दोन घोडय़ांची पहिली रांग, तर पुढच्या रांगेत सर्व प्यादी अशा काळय़ा आणि पांढऱया रंगाच्या प्रत्येकी सोळा सोंगटय़ा. म्हणजे एकूण बत्तीस सोंगटय़ांनी 64 घरात ‘लढाई’ करून विजय मिळवायचा किंवा सामना अनिर्णित ठेवायचा. त्यासाठी दोन खेळाडूंचे कुशाग्र मेंदू या सोंगटय़ा हलवणार. सोंगटय़ांच्या ‘चाली’ही नियमाने ठरलेल्या. हत्ती (रुक) सरळ, उंट (बिशप) तिरका, घोडा (नाइट) अडीच घरं (इंग्लिश ‘एल’ आकारात) आणि राजा-राणी किंवा राजा-वझीर आंतरराष्ट्रीय खेळात वझीर नसतो राणी असते. आता कोण कोणाचं राज्य जिंकणार हे या सोंगटय़ांना खेळवणाऱयाच्या बुद्धिबळावर अवलंबून. 1997 मध्ये मात्र ‘डीपब्लू’ या रोबोटने गॅरी कॅस्परोवला खेळात हरवलं होतं!

बुद्धीला चालना देणारा हा खेळ शेकडो वर्षांपूर्वी हिंदुस्थानात सुरू झाला. तिथून तो पर्शिया (इराण) आणि मग युरोपात गेला. आपल्याकडे राधा-कृष्णाचं ‘बुद्धिबळ’ खेळतानाचं प्राचीन रंगचित्र गुगलवर उपलब्ध आहे. यावरून त्याची आपल्याकडची प्राचीनता लक्षात यावी. या खेळामागे प्रचंड मानसविज्ञान दडलेलं आहे. विचार म्हणजे मेंदूतील न्यूरॉनच्या घडामोडी. त्यांचा तोल म्हणजेच आपला मानसिक तोल सांभाळत खेळायचं. त्यातही जागतिक स्पर्धा असेल तर त्याचं मनावर येणारं दडपण बाजूला सारून खेळत राहायचं. यात आत्मविश्वासाची परीक्षाच. त्याच परीक्षेत आपला गुकेश पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला.

पाश्चात्यांकडे पंधराव्या शतकात रुजवलेल्या या खेळाने नंतर सातत्याने प्रगती केली. परवा गुकेश जिंकला तो जगज्जेतेपदाची स्पर्धा (टुर्नामेंट) 1886 मध्ये सुरू झाली. आपल्या महाराष्ट्रातले प्रवीण ठिपसे (गॅडमास्टर 1997) आणि जयश्री तसेच वासंती या खाडिलकर भगिनींनीही जागतिक बुद्धिबळात नाव कमावलं.

विश्वनाथन आनंद यांनी ऍलेक्सी सिरॉकला हरवून 2000 मध्ये बुद्धिबळातलं जगज्जेतेपद मिळवलं ते 2002 पर्यंत टिकलं. नंतरही 2007 ते 2013 मध्ये त्यांना असा सन्मान मिळत गेला. तामीळ विश्वनाथन नंतर आता तेलुगू भाषी गुकेशने बुद्धिबळाच्या जागतिक विक्रमावर नाव नोंदवलं आहे. 40 चालींसाठी 90 मिनिटांची मर्यादा असलेला हा खेळ 1989 मध्ये बेलग्रेड येथे इव्हान विरुद्ध गोरान स्पर्धेत 20 तासांहून जास्त वेळ चालला आणि त्यात 269 चाली खेळल्या गेल्या. थोडक्यात आपल्याकडे ‘चतुरंग’ नावाने सुरू झालेल्या या खेळाच्या आताच्या जागतिक स्वरूपात सामील होऊन गुकेशने संतुलित मनोविज्ञानाचं कलात्मक उदाहरण यशस्वीरित्या जगासमोर ठेवलं आहे.