>> जे. डी. पराडकर
पांढरा आणि मध्यभागी पिवळसर झाक असणारा चाफा कोकणात जवळपास सर्वच ग्रामदेवता मंदिरांच्या परिसरात अगदी आजही पाहायला मिळतो.
फुले माणसाला आपल्या गंधाने धुंद करतात. फुले अथवा त्याचा गंध आवडत नाही अशी व्यक्ती म्हणजे अरसिकच म्हणावी लागेल. फुलांच्या गंधाने माणूस काही काळ आपले अस्तित्व विसरतो. कवठी चाफ्याचा गंध जितका दुरून येईल तेवढा तो अधिक मोहित करणारा ठरतो. हजारो फुलांच्या प्रजातीत चाफा हा सर्वांनाच भुरळ घालणारा एक अप्रतिम फुलाचा प्रकार आहे. चाफ्याचे नाव निघताच नजरेसमोर येतात ते पांढरा-पिवळा चाफा, लाल चाफा, भुईचाफा, कवठी चाफा आणि गंधाचा बादशहा म्हणजे ‘नागचाफा’. नागचाफ्याचा मोहित करणारा गंध घेत आमचे बालपण सरले. आम्हाला गंधाची खरी ओळख करून दिली ती या नागचाफ्यानेच.
पांढरा आणि मध्यभागी पिवळसर झाक असणारा चाफा कोकणात जवळपास सर्वच ग्रामदेवता मंदिरांच्या परिसरात अगदी आजही पाहायला मिळतो. ग्रामदेवतेच्या पूजेसाठी लागणारी फुले हमखास देणारा हा पांढरा चाफा बहरला की, पाने गळून पडतात आणि केवळ फुलेच फुले पाहायला मिळतात. चाफ्याची ही फुले एका लांब देठाला अनेक संख्येने फुललेली पाहायला मिळतात. गंध अगदी मंद असला तरी आतील पिवळेपणा एखाद्या मंद ज्योतीप्रमाणे भासत असल्याने याला दिव्यांची फुले असेही म्हटले जाते. या चाफ्यांचे गाभाऱयातील ग्रामदेवतेबरोबर निर्माण झालेले नाते नक्कीच समर्पणाचे असणार. या समर्पणातील सुख चाफ्याला अधिक गंधित करणारे असेल यात शंका नाही. मात्र ग्रामदेवतेच्या चरणी चाफ्याला समर्पित करण्यासाठी गरज असते ती भक्तिभावाच्या ओंजळीची. पुजाऱयाची ओंजळ खरंच या फुलांच्या समर्पणाने गंधित होऊन जात असेल.
चाफ्यांनी आमच्या मनात निर्माण केलेलं नातं नाजूक तर होतंच, शिवाय तितकंच भावस्पर्शीदेखील होतं. आमच्या गावी आंबेडखुर्दला तुळशीच्या अंगणाला लागून एक नागचाफ्याचे झाड आहे . हा चाफा म्हणजे आंबेडखुर्दची एक ओळख म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. आमच्या गावच्या घरी येऊन गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला हा नागचाफा माहीत आहे. यामागचे एकमेव कारण म्हणजे त्याचा मंदधुंद गंध! आजही आमचे नातेवाईक या नागचाफ्याची एखाद्या व्यक्तीची करावी तशी आस्थेने चौकशी करतात. आमच्याकडे आलेल्या प्रत्येक व्यक्तीने या नागचाफ्याचे फूल हातात घेऊन त्याचा गंध घेतला आहे. याचा गंध घेताना नेत्र आपोआप मिटतात ही त्याच्या गंधाची खरी ताकद आहे. नागचाफ्याच्या आजूबाजूला अन्य झाडे असल्याने सूर्यप्रकाश मिळविण्यासाठी हा चाफा उंच उंच वाढत जाऊन त्याने या स्पर्धेतही आपले अस्तित्व सिध्द केले. इच्छाशक्ती कशी असावी, याची शिकवण बालपणी आम्हाला या चाफ्याच्या झाडाने दिली. फुलायचे असेल तर उंच जाण्याचे कष्ट घेतले पाहिजेत. ठरावीक उंचीनंतर भले थोडे झुकावे लागले तरीही चालेल. मात्र बहरण्याचे आपले ब्रीद सोडायचे नाही हे या चाफ्याने शिकवले.
गावाकडील घरात असणारी सर्वच माणसे या नागचाफ्यावर मनस्वी प्रेम करत. कदाचित त्यामुळेच हा चाफा असा काही बहरायचा की, सारा परिसर गंधित होऊन जायचा. नागचाफ्याचा गंध मंद, परंतु धुंद करणारा असल्याने वाऱयाच्या झुळकांसोबत याचा मंद गंध बेधुंद करून टाकायचा. जितके दिवस चाफ्याचा बहर सुरू असायचा तेवढे दिवस अक्षरश गंधाची लयलूट व्हायची. नागचाफ्याचा हा गंध अत्तराच्या कोणत्याही कुपीत सापडणार नाही असा असल्याने साहजिकच त्याच्या गंधासाठी प्रत्येक जण आतुर असायचा. सकाळच्या प्रसन्न वेळी असंख्य छोटे जीव नागचाफ्याच्या फुलांभोवती रुंजी घालताना दिसायचे. घराजवळ असणाऱया बागेत सकाळी फुले काढायला जाताना तुळशीच्या अंगणात नागचाफ्याच्या फुलांचा सडा पडलेला असायचा. आधी ही फुले वेचून मगच बागेत जाता यायचे. सकाळच्या वेळी हातात नागचाफ्याची फुले घेताना मन असे काही मोहरून जायचे की, विशिष्ट गंध थेट हृदयाला जाऊन कसा भिडतो याची जणू साक्षच पटायची. फुलांनी पहिली परडी भरायची ती नागचाफ्यामुळेच.
एका उंच बांबूला विळा लावलेल्या काठीला कोकणात ‘पानकापे’ असे म्हणतात. या पानकाप्याने उंच गेलेल्या नागचाफ्याची फुले देवांना वाहण्यासाठी काढली जायची. देवपूजेत नागचाफा देवांच्या प्रतिमांसमोर वाहिल्यानंतर त्या प्रतिमांनादेखील एक वेगळीच चमक यायची. चाफ्याच्या समर्पणाचा साक्षात परमेश्वराला झालेला हा आनंदच म्हणावा लागेल. देव्हाऱयात नागचाफ्याची फुले म्हणजे भक्ती, गंध आणि समर्पण यांचा तिहेरी संगम असायचा. देवघर आणि माजघर हा सारा परिसर दिवसभर आल्हाददायक बनलेला असे. पूजा करत असताना भक्तीमध्ये आनंद मिसळायचा तो या नागचाफ्यामुळेच!
नागचाफ्याचे फूल कोमेजल्यानंतरही त्याचे मोल अनमोल होते. आमच्या घरी असणाऱया नागचाफ्याने आम्हाला केवळ गंध दिला असे नव्हे, तर घराच्या अर्थकारणात दरवर्षी मोठा हातभार लावला. नागचाफ्याची सारी फुले जमवून सुकवली जायची. आमची काकू या फुलांच्या मध्यभागी असणारे सारे केशर एकत्र करायची. केशर काढण्याची सारी प्रक्रिया किचकट आणि खूप मेहनतीची असे. मात्र आमची काकू हे सारे तेवढय़ाच प्रेमाने करे. केशर उन्हात कसे वाळवायचे, किती उन्हं द्यायची याचेही गणित असे. मात्र आमच्याकडील केशर दर्जेदार असल्याने चिपळूणचे ‘ओतारी’ आडनावाचे व्यापारी केशर खरेदी करायला आमच्या आंबेडखुर्दच्या घरी दोन घाटय़ा चढून यायचे. अनेक वर्षे हा व्यापार सुरू होता. यात खंड पडला तो 21 वर्षांपूर्वी आमची काकू गेली तेव्हाच. काकू गेली आणि तेव्हापासून नागचाफ्याचा बहरदेखील मंदावला. कोणाचे कोठे कसे भावनिक नातं जडलेलं असेल हे सांगता येत नाही याची प्रचीती देणाराच हा प्रसंग. त्यानंतर आपोआप आमचेही या नागचाफ्याशी असलेले नाते काहीसे दुरावले. मात्र बालपणापासून नागचाफ्याच्या असंख्य आठवणी मनात आणि हृदयात साठवल्या गेल्या आहेत.
गावच्या आठवणी आल्या की, साहजिकच नागचाफा आठवतो आणि हळूहळू त्याचा गंध येऊ लागतो आणि आम्हाला परमोच्च आनंदाची अनुभूती देतो.