स्वयंपाकघर- लव्हाळीचं पातं

>> तुषार प्रीती देशमुख

आपल्या नावापुढे आपली ओळख लागण्याआधीचा प्रवास अनंत अडचणींचा, संघर्षाचा असतो. नावापुढे सेलिब्रिटी शेफ हे बिरुद लागण्याआधी अर्चनाताईंनाही अनेक संकटांना सामोरे जावे लागले. जिवलगांच्या वियोगाचे दुःख अन् दुसरीकडे कामाची जबाबदारी अशा द्विधेत अडकलेल्या अर्चनाताईंनी नदीच्या पाण्यातल्या लव्हाळीच्या पात्याप्रमाणे चिवटपणे संघर्ष करीत यश कमावलं.

सपना बाडकर यांचे लहानपणी आवडणाऱया एका पदार्थामुळे  पाककलेच्या क्षेत्रात करिअर घडले. लग्नानंतर त्या अर्चना आर्ते बनल्या आणि सेलिब्रिटी शेफ म्हणून सगळ्यांच्या घराघरात पोहोचल्या. लहानपणी प्रत्येकाला आवडणारा कोणता ना कोणता एक पदार्थ असतो. अर्चनाताईंना लहानपणी रसमलाई प्रचंड आवडायची. पण ती रसमलई कशी केली जाते? आपण ती घरी तयार करू शकतो का? पारंपरिक बंगाली पद्धतीने ती करण्यासाठी कोणते घटक वापरले जातात? असे व अनेक प्रश्न त्यांना फक्त रसमलाईच नाहीतर अनेक पदार्थांच्या बाबतीत पडायचे. कॉलेजमध्ये असताना त्यांनी माधवी कदम यांच्याकडे पाककृती प्रशिक्षणाचे वर्ग घेतले. त्यात त्यांनी बंगाली, पंजाबी, चायनीज, केक्स व अनेक पदार्थ त्यांच्याकडे त्या शिकल्या. खाण्याची, पदार्थ तयार करण्याची व सर्वांना खाऊ घालण्याची त्यांना पहिल्यापासूनच आवड होती.

वसईमधील नामांकित आर्ते कुटुंबातील उमेश आर्ते ज्यांचे वसई गावात भांडय़ांचे दुकान होते त्यांच्याशी लग्न झाले. अर्चनाताईंनी नोकरी करू नये असे कुटुंबाला  वाटत होते. मुलगा शिवम एक वर्षाचा झाला तेव्हा त्यांनी कुकिंग क्लासेस घ्यायचे ठरवले. त्यांच्या या निर्णयाला त्यांचे पती, सासूबाई मंगला आर्ते व आई संगीता बाडकर यांनी सहकार्य केले. सुरुवातीला पाककृती प्रशिक्षण वर्गासाठी चार-पाच महिला यायच्या. नंतर या प्रशिक्षणवर्गाची चांगलीच प्रसिद्धी झाली. पुढे अर्चनाताई दिवसातून दोन वेळा 50 जणींच्या प्रशिक्षण वर्गाच्या बॅचेस घेऊ लागल्या. अनेकांनी त्यांच्याकडे दिवाळी फराळाची विचारणा केली. तेव्हा ताईंनी गरजू आदिवासी महिलांना उत्पन्न मिळवून देण्यासाठी त्यांना हाताशी घेऊन घरगुती फराळ विक्रीचा व्यवसाय सुरू केला. पुढे त्यांनी जेवणाचे डबे व नाश्त्याच्या
ऑर्डर्स घ्यायला सुरुवात केली.

2000 साली अर्चनाताईंच्या गुरु माधवी कदम यांनी त्यांना ई-टीव्हीवरील ‘मेजवानी परिपूर्ण किचन’ या कार्यक्रमाचे अंतर्गत स्वयंपाकघर सांभाळण्याची जबाबदारी दिली. मग साम टीव्हीवरील ‘सुगरण’ या रेसिपी शोसाठीही अंतर्गत स्वयंपाकघराची जबाबदारी त्यांना मिळाली. पुढे मी मराठीवरील ‘मोगरा फुलला’ या कार्यक्रमात मेघना एरंडेबरोबर अर्चनाताईंनी पहिल्यांदाच पाककृती सादर केल्या. 2012 साली आयएफएन मराठी या युटय़ूब चॅनेलवर त्यांना पाककृती सादर करण्यासाठी आमंत्रित केले गेले. चित्रीकरणाच्या आदल्या दिवशी अर्चनाताई त्यांच्या मोठय़ा मुलाबरोबर मंडईत अळूची पाने आणण्यासाठी गेल्या होत्या. त्याचवेळी त्यांच्या पतींना ब्रेनस्ट्रोक झाला आणि त्यात त्यांचे निधन झाले. सगळे काही सुरळीत चालले असताना ताईंवर संपूर्ण घराची जबाबदारी पडली. मोठा मुलगा शिवम चौदावीत तर लहान मुलगा आदित्य दहावीत. दोन्ही मुलं वडिलांच्या भांडय़ांच्या दुकानाची जबाबदारी सांभाळत शिक्षणही घेत होते. शिक्षणानंतर त्यांना नोकरी लागली तेव्हा त्यांनी दुकान सोडले. शिवमने अर्चनाताईंना पाककृती सादर करण्याच्या कार्यक्रमासाठी प्रेरित करून वडिलांच्या निधनानंतर दोन महिन्यातच ‘IFN मराठी’वर व्हिडीओ करण्यास भाग पाडले. 2013 साली अर्चना ताईंची ‘रुचकर मेजवानी’ या युटय़ूब चॅनेलसाठी रजत सरांनी निवड केली. या चानेलची सुरुवातच अर्चनाताईंच्या कार्यक्रमापासून झाली व त्याला खवय्यांनी भरघोस प्रतिसाद दिला. लाखो फॉलोवर्स त्यांच्या प्रेझेंटेशनच्या प्रेमात पडले. जशी आई एखादा पदार्थ शिकवते त्याच प्रेमाने अर्चनाताई रुचकर मेजवानीच्या माध्यमातून आम्हाला पदार्थ शिकवतात… अशा आशयाच्या असंख्य प्रतिक्रिया येऊ लागल्या. त्यामुळे अर्चनाताईंना अकरा वर्षे ‘रुचकर मेजवानी’ सादर करण्यात बळ लाभले.

कोव्हिडच्या काळात युटय़ूबच्या माध्यमातून अर्चनाताईंनी रुचकर मेजवानी व अर्चना आर्ते रेसिपी हे कार्यक्रम सोशल मीडियाच्या माध्यमातून चालू ठेवले. त्यांच्या दोन्ही मुलांनी व सुनेने मोलाचे सहकार्य केले. अर्चना ताईंना वेगवेगळ्या शहरांमध्ये पाककृती प्रशिक्षण वर्ग घेण्यासाठी बोलावणे असते. तसेच अनेक रेस्टॉरंट्स,  फूड स्टॉल्स त्यांचे प्रमोशन करण्यासाठी अर्चनाताईंना आमंत्रित करतात.

त्यांचा मुलगा शिवमला याला एका भयंकर आजाराने विळखा घातला. त्यावेळी त्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी ताईंने खूप प्रयत्न केले. पण शेवटी नियतीसमोर सगळेच अपयशी ठरले. जन्ममृत्यू हा आपल्या हातात नसतो हेच खरे. या प्रसंगानंतर अर्चनाताई पूर्णपणे कोलमडल्या. त्यांना साथ देणाऱया त्यांच्या चार मैत्रिणी उदिता, निवेदिता, राजेश्वरी, मंजुषा यांनी खूप आधार दिला. त्यांचा लहान मुलगा आदित्यने त्यांना शिवमने त्यांच्याकडून घेतलेल्या वचनाची आठवण करून दिली. शिवमला त्याच्या आईचे नाव शेफ अर्चना आर्ते असे जगभरात होताना पाहायचे होते.  मुलाने आईसाठी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक वादळे पचवणाऱया अर्चनाताईंने पुन्हा कमरेला पदर खोचला. जेवणाच्या ऑर्डर्स, पाककृती प्रशिक्षण वर्ग आणि स्वतचे पाककृतीवरील पुस्तक काढण्यासाठी त्या सज्ज झाल्या. अर्चनाताईंच्या या धाडसाला व त्यांच्या जिद्दीला मनापासून सलाम!

[email protected]

(लेखक युटय़ूब शेफ आहेत.)