वेब न्यूज – औषधी साप

काही विशिष्ट जातीच्या सापांच्या विषापासून गुणकारी औषध बनवले जाते हे आपण अनेकदा वाचले किंवा ऐकले असेल. जगाच्या काही भागात साप आवडीने खाल्लादेखील जातो. मात्र मिडल ईस्टसारख्या वाळवंटी भागात चक्क उंटाला किंग कोब्रासारखा विषारी साप हा औषध म्हणून खायला घातला जातो. वाळवंटातील जहाज मानल्या जात असलेल्या उंटाला हयाम नावाच्या एका विशिष्ट रोगाचा सामना काही वेळा करावा लागतो. या आजारात उंटाच्या पायांना आणि तोंडाला प्रचंड वेदना होत असतात. उंट खाणे-पिणेदेखील सोडतो. काही वेळा हा आजार प्राणघातकदेखील ठरतो. अशावेळी या आजारावर उपचार म्हणून उंटाला विषारी साप खायला घातला जातो.

इथल्या काही स्थानिकांचा असा विश्वास आहे की, या रोगात उंटाची तहान प्रचंड कमी होते. अशा वेळी जर उंटाला विषारी साप खायला घातला तर त्या सापाचे विष उंटाच्या शरीरात पसरते आणि त्याच्या चरबीचे पाणी व्हायला सुरुवात होते व त्याला आराम पडतो, अशीदेखील इथं एक मान्यता आहे. काही लोकांच्या मते उंटाला साप खायला घातल्यानंतर तो सापाच्या विषामुळे अशक्त होतो आणि खाणे-पिणे सोडून देतो. मात्र काही काळातच त्याच्या शरीरात असलेली ऍण्टीबॉडी या विषाला हळूहळू कमी करत जाते आणि काही काळात उंट रोगमुक्त होऊन पहिल्याप्रमाणे अन्न, पाणी ग्रहण करू लागतो.

उंट हा पूर्णपणे शाकाहारी प्राणी आहे असे काही लोक ठामपणे सांगतात, तर कधी कधी उंट वाळवंटी सापांनादेखील अन्न म्हणून भक्षण करतो असा दावा काही स्थानिक करतात. पशुवैद्य मात्र या उपायाला मान्यता देत नाहीत. उलट सापाचे विष उंटाच्या आरोग्यासाठी घातक असल्याचे त्यांचे मत आहे. मात्र पूर्वी पशुवैद्य नव्हते. त्या काळात स्वतःला जाणकार मानणारे वैद्य अशा प्रकारचे असे सल्ले देत असत. त्यामुळे साप खायला घालणे ही फक्त परंपरागत चालत आलेली एक पद्धत आहे आणि तिला कोणताही वैद्यकीय असा ठोस आधार नाही.