>> अश्विन बापट
85 वर्षांची साताऱयाची पालेकर बेकरीची सुरुवात घरातून झाली. ही वाटचाल आता सवादोन एकरच्या जागेपर्यंत येऊन पोहोचली आहे. मसाला बटर, रोझ, व्हॅनिला, चोको, कोकोनट, बटर नानकटाई… जर तुम्ही साताऱयाला गेलात तर तिथल्या पालेकरांची बेकरी प्रॉडक्ट्स तुमच्या चहाची लज्जत नक्कीच वाढवतील.
वाफाळलेल्या चहासोबत कुरकुरीत मसाला बटर, चहाची गोडी खुलवणारी रोझ नानकटाई. आपली सकाळ आणखी प्रसन्न करणारी ही वातावरण निर्मिती. खास करून तुम्ही जर सातारा आणि परिसरात असाल तर तिथल्या पालेकरांची बेकरी प्रॉडक्ट्स तुमच्या जिभेचे चोचले पुरवायला सज्ज असतात.
या बेकरीची वाटचाल सुरू झाली ती 1939 मध्ये. याबद्दल नीळकंठ पालेकर यांना बोलतं केलं असता ते म्हणाले, आमचे आजोबा मारुतराव पालेकर यांनी तब्बल 85 वर्षांपूर्वी म्हणजे 22 ऑक्टोबर 1939 या दिवशी याचं बीज रोवलं. त्या वेळच्या आमच्या घरातील हॉलमध्ये छोटीशी बेकरी सुरू झाली, तिथपासून सुरू झालेली ही वाटचाल आता सवादोन एकरच्या जागेपर्यंत येऊन पोहोचली आहे. मौजे वळसे गावातील सवादोन एकर जागेत आमचं प्रॉडक्शन युनिट आणि होलसेल पी केंद्र दिमाखात उभं आहे. आजोबांच्या काळापासूनचे मसाला बटर ही आमची स्पेशालिटी आहे.
माझ्या आजोबांनी रोवलेल्या धंद्याच्या या पायामध्ये माझ्या वडिलांनीही 1960पासून आणखी भर घातली. पोस्ट अँड टेलिग्राफमधील नोकरी करणारे बाबा या व्यवसायात उतरले आणि त्यांनी या व्यवसायाच्या कक्षा आणखी रुंदावल्या. आमच्याकडे फ्लेव्हर नानकटाई, केक्स बनू लागले. टोस्टची व्हरायटीदेखील बाबांच्याच काळात आली. मीही या व्यवसायात झोकून द्यायचं ठरवलं आणि 1980 मध्ये गुजरातच्या आणंदमधील अॅग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये बेसिक बेकरी नॉलेजचा डिप्लोमा कोर्स केला. मग या व्यवसायातील आणखी प्रगत अंग शिकण्यासाठी 1992 आणि 1995 ला युरोपला गेलो. इंटरनॅशनल बेकरी ट्रेड फेअर अटेंड करून आधुनिक बाबींची माहिती घेतली. जर्मनी, अमेरिकेत भेटी दिल्यावर मला अनेक गोष्टी कळल्या, ज्याचा फायदा मला व्यवसायवृद्धीसाठी झाला. आज आमच्याकडे प्रॉडक्शन युनिटमध्ये 85 कर्मचारी आहेत, तर सहा जणांचा ऑफिस स्टाफ आहे.
दैनंदिन उत्पादनाचा विचार केल्यास आमच्याकडे रोज जवळ जवळ 80 हजार ग्राहकांना सेवा देता येईल एवढे उत्पादन होत असतं. रोझशिवाय व्हॅनिला, चॉको, कोकोनट, बटर नानकटाई हे नानकटाईमधील आमचं वैविध्य.
सहा प्रकारचे टोस्ट तर पाच प्रकारचे बटर आणि चार प्रकारच्या खारी आमच्याकडे तयार होतात. तसंच कप केक्स, वाटी केक्स, बर्थ-डे केक्सही आमच्याकडे तयार केले जातात.
या व्यवसायात आता आमची चौथी पिढी आघाडी घेतेय याचं मला समाधान आहे. माझा मोठा मुलगा प्रणव तांत्रिक बाजू, एचआर सांभाळतो, तर धाकटा मुलगा ज्ञानेश मार्केटिंग, पर्चेस आणि अन्य बाजूंची जबाबदारी पाहतो. मी बँकिंग आणि फायनान्समध्ये लक्ष देत असतो.
आमच्या उत्पादनांना सातारा जिह्याबाहेरूनही मागणी आहे. मुंबई, पुणे, ठाणे, वसई, पालघरमध्ये आमची
प्रॉडक्ट्स पोहोचली आहेत, तर बंगळुरू, दिल्ली तसेच कोलकात्यामध्येही आमच्या उत्पादनांना मागणी आहे. परदेशाचा विचार केल्यास ऑस्ट्रेलियातील सिडनी, मेलबर्नसारख्या शहरांत काही दुकानांच्या माध्यमातून आमची उत्पादनं उपलब्ध आहेत. आता आणखी काही देशांमध्ये या बेकरी प्रॉडक्ट्सनी भरारी घ्यावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असा मानस नीळकंठ पालेकरांनी व्यक्त केला.
(लेखक हे एबीपी माझाचे सीनियर प्रोड्युसर – सीनियर न्यूज अँकर आहेत.)