
>> रविप्रकाश कुलकर्णी
हल्ली वेगवेगळे गांधी वेगवेगळ्या ठिकाणी दिसतात. पण 2 ऑक्टोबर आणि 30 जानेवारीला तरी हमखास आठवतात ते म्हणजे महात्मा गांधीच. पण त्याच वेळी मला आठवतात ते `गांधी मला भेटला’ कविता लिहिणारे कवी वसंत दत्तात्रेय गुर्जर! स्वातंत्र्य मिळवण्यासाठी महात्मा गांधींनी आपले आयुष्य पणाला लावले. त्याच गांधीना प्रतीक करून कवी वसंत गुर्जर यांनी सामान्य माणसाच्या मनातले कुचंबलेपण, वैफल्य, कोलाहल इत्यादी भावना व्यक्त करणारी कविता लिहिली. `गांधी मला भेटला!’ सर्वप्रथम ही कविता चंद्रकांत खोत संपादित `अ ब क ड ई’ दिवाळी अंकात प्रकाशित झाली. दिवाळी अंकाच्या घाईगर्दीत प्रकाशित झालेल्या कवितेवर काटेकोर संपादकीय संस्कार करून अशोक शहाणे यांनी या कवितेचे पोस्टर प्रकाशित केले. ते वर्ष होते 1983. दोन हजार पोस्टर्स संपायला तीन-चार वर्षे लागली. त्यावेळी पोस्टर कविता हा प्रकार तसा नवीनच होता. तरीसुद्धा काव्यरसिकांकडे ही पोस्टर कविता पोहोचली ती त्यातील काव्यगुणांमुळे. त्यामुळेच अशोक शहाणे यांनी लगेच म्हणजे 1986 मध्ये या पोस्टर कवितेची दुसरी आवृत्ती चक्क तीन हजाराची काढली. ती मात्र यथावकाश म्हणजे धिम्या गतीने जात राहिली. मग नंतर 1995 मध्ये एका बँकेच्या बुलेटिनमध्ये वसंत गुर्जर यांची ही कविता परस्पर छापली गेली.
`गांधी मला भेटला’ ही कविता प्रकाशित होऊन तेरा वर्षे झाली तरी ही कविता आहे तरी काय असे ज्याला त्याला वाटू लागले. याचे कारण या कवितेवर आणि संबंधितांवर खटला भरला गेला आणि परिणामी बंदी आली!
बँक बुलेटिनवाल्यांना एका कवितेने हे भलतेच काहीतरी निर्माण झालेले पाहून, पुढची अधिक कटकट नको म्हणून ते माफी मागून मोकळे झाले. मात्र कवी वसंत गुर्जर यांनी आपल्या या कवितेमुळे गांधींचा यत्किंचितही अवमान होत नाही हे स्पष्ट केले. आपल्याला मत स्वातंत्र्याचा अधिकार आहे याचा आग्रह धरला. परिणामी हा खटला सुप्रीम कोर्टापर्यंत गेला…
पण शेवटी वरच्या कोर्टाने ही केस नंतर जिथून आली तेथे म्हणजे लातूर कोर्टाकडेच पुनर्विचारार्थ पाठवून दिली. तेव्हापासून आजतागायत ती केस निकालासाठी पडून आहे… `गांधी मला भेटला’ कवितेला न्याय मिळायला अजून किती वर्षे लागणार आहेत कुणास ठाऊक? हे सगळे पाहिल्यावर वाटते की वसंत गुर्जर या कवीची जडणघडण कशी घडली असेल?
गुर्जर शालेय विद्यार्थी असताना त्यांनी विद्वान पण फटकळ असलेल्या न. र. फाटक यांच्याकडे स्वाक्षरी आणि संदेश मागितला होता. फाटक यांनी लिहिले, `जुने ते सोने समजू नका. स्वतंत्र विचार करून योग्य काय अयोग्य काय ते ठरवायला शिका व जे प्रमाण शुद्ध वाटेल त्याचा विचार निर्भयपणे चालवा.’
तसेच, पुढे अशोक शहाणे यांनी मनोहर साप्ताहिकात मराठी साहित्यावर `क्ष किरण’ लेख लिहिला होता. त्यात त्यांनी म्हटले होते, `भाषा सार्वभौम असते. भाषेतून होणारा आत्मविष्कार म्हणजे साहित्य; साहित्याला अंगभूत तत्व असतं, लेखकाने स्वतशी, स्वतच्या जगण्याशी प्रामाणिक असणं आवश्यक आहे.’ हा आवाज वसंत गुर्जर यांना आपलाच वाटला.
वरील दोन विचार गुर्जर यांना कायम आपल्या वाटचालीसाठी होकायंत्रा सारखे मार्गदर्शक ठरले असावेत. या भूमिकेतूनच ते त्यावेळी लिटिल
मॅगझिन मूव्हमेंट – लघुपत्रिका चळवळीत सािढय झाले. मात्र त्यांचा सूर त्यांच्या प्रकृती धर्माप्रमाणे संयत राहिला हे विशेष. अरुण कोलटकर, अशोक शहाणे यांच्यानंतर भालचंद्र नेमाडे, चंद्रकांत पाटील, सतीश काळसेकर, नारायण बांदेकर, अनिल किणीकर, प्रकाश कामतीकर आदी मंडळी या लघुपत्रिका चळवळीत आपापल्या परीने सामील झालेली होती. त्यातलेच एक वसंत दत्तात्रेय गुर्जर. आपले संपूर्ण नाव देण्याचा त्यांचा कटाक्ष राहिला हे जसे त्यांचे वेगळेपण. तसेच वेगळेपण त्यांच्या कवितेत राहिले. हा कवी एके ठिकाणी म्हणतो…
सदा सर्वदा दुःख माझे पहावे
तुझे कारणी दुःख माझे घडावे
अपेक्षू नको दुःख माझे अनंता
रघु नायका हेचि मागणे (गाऱहाणे) आता
त्याचबरोबर अल्पाक्षरित्व हा त्यांच्या कवितेचा विशेष असतो. गोदी, अरण्य, समुद्र, कोलाहल या त्यांच्या कवितासंग्रहातील कविता त्याची साक्ष आहे. शब्दांची उतरंड करून हा कवी जो परिणाम साधतो तो विलक्षणच. त्यांची एक कविता पहा…
देणं कुठवर पचवणं
कुठवर स्वतलाच उभं करणं
कुठवर कोसळणं कुठवर सावरणं
कुठवर ही पाठराखण कुठवर हा खेळ
अशी जडणघडण झालेला हा कवी. कोर्टकचेरीच्या कटकटीतून केव्हा मुक्त होणार आहे कुणास ठाऊक? कवितेचे हे देणे पण आगळेवेगळेच असे म्हणायचे काय?