दखल – जीवनविषयक वैचारिक लेखन

<<< रेखा बैजल >>>

राज्य साधन केंद्र, प्रौढ शिक्षण संचालक या पदावर कार्यरत राहिलेले डॉ. अनिल कुलकर्णी यांचे ‘पुस्तकांच्या पलीकडे’ हे पुस्तक नुकतेच वाचण्यात आले. खरोखरच काही शब्दात न मावणारे किंवा मोठ्या लेखरूपात व्यक्त न होणारे लहानसे, पण ठिणग्यांसारखे विविध विषयांवरचे लेख यात आहेत. एखादे काजव्यांचे झाड असावे तसे हे लेख काही जीवनविषयक विचार घेऊन लुकलुकतात. सभोवताल पाहताना काही जाणवलेले, मोठ्या व्यक्तींच्या स्मृतीतून जागवलेले आणि त्यांच्या स्वतच्या अध्यापन क्षेत्रातले अनेक अनुभव यात शब्दबद्ध आहेत. माणसे वाचणे हा त्यांचा छंद लक्षात येतो. या छंदाचे मोठ्या आशयात रूपांतर होते. कार्तिक वजीर, मोक्षा रॉय यांच्यासारख्या छोट्यांपासून ते डॉ. रघुनाथ माशेलकर ते संत साहित्यापर्यंतचा मोठा आवाका त्यांच्या विषयांचा आहे. त्या-त्या विषयांप्रमाणे त्यांची शैलीही बदलते. काही ठिकाणी निवेदनपर, तर काही ठिकाणी लालित्यपूर्ण व उत्स्फूर्त.

‘पानगळ’ हा लहानसा लेख त्यांच्या आस्वादक मनाचा प्रत्यय देतो. ‘पार’ हा लेख त्यांची वैचारिक बैठक व्यक्त करतो. हा लेख माइलस्टोन आहे. प्रत्येक ‘पार’ ऊर्जा देतो म्हणता म्हणता मनाला पार केले की सगळे पार आपोआप सुटतात, एक मोठे वैचारिक तत्त्व ते सांगून जातात. पण यात अधिक भावणारे आणि चांगल्याची जाणीव करून देणारे लेख आहेत ते शाळांवरचे. पाहण्यात आलेल्या अनेक लहान मोठ्या शाळांमधील काही वैशिष्ट्यपूर्ण अनुभव आणि व्यक्तिमत्त्वांची माहिती या लेखांमधून आपल्याला मिळते. जसे की, जव्हारच्या जि. प. शाळेतील मुलांनी केलेले पक्षी निरीक्षण, आगळीवेगळी असणारी शाळा ग्राममंगल, नांदूरच्या शिक्षिका रोहिणी लोखंडे. ‘असे शिक्षक अशा शाळा’ या लेखांमधून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी मनापासून धडपडणाऱ्या शाळा आणि शिक्षकांबद्दल वाचून आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.

पुस्तकांच्या पलीकडे
 लेखक : डॉ.अनिल कुलकर्णी
 प्रकाशक : शब्दान्वय प्रकाशन, मुंबई
 पृष्ठसंख्या : 174
 किंमत : 350 रुपये