अभिप्राय- भावभावनांची दखल

>> अनिल कुलकर्णी

जयराम कराळे यांचा हा पहिलाच कवितासंग्रह मनातील भावतरंग आहे. अवतीभवतीच्या परिस्थितीतून जाणवलेले हे वैचारिक तरंग आहेत. एकूण 92 कविता या संग्रहात आहेत. अनुभव गाठी असले व निरीक्षण सूक्ष्म असले की मनात तरंग उठतातच.

साध्या साध्या गोष्टीतून, प्रसंगामधून कवीमन टिपकागदासारखे भाव टिपत राहते. मानवी नातेसंबंध जसे जाणवले तसेच ते त्यांनी आपल्या रचनेमधून उलगडले आहेत. संवेदनशील मन असल्याशिवाय मनात तरंग उठत नाहीत. एखाद्या प्रसंगात मन हरवून जाते, एखाद्या प्रसंगावर मनात असंख्य विचार येतात, पण त्याला शब्दबद्ध करत असताना मोजक्या शब्दात व्यक्त करता यायला हवे. प्रसंगानुरूप मानवी जीवनात अनेक भावतरंग मनात उठत असतात आणि कालांतराने नष्टही होतात, पण काही प्रसंगामुळे उठलेले तरंग मनात एक भाव निर्माण करतात, जो कायमस्वरूपी मनात घर करतो.

माणसांच्या तरल भावभावनांचा वेध घेणे व त्यावर मोजक्या शब्दात भाष्य करून त्याचे काव्यात रूपांतर करणे ही एक कलाच आहे. प्रसंग एक असला तरीही प्रत्येकाच्या मनात वेगवेगळे भाव उमटत असतात आणि त्याला शब्दांच्या कोंदणात बसवणे प्रत्येकाला जमत नाही.

अनेक प्रसंगाकडे मूक प्रेक्षक म्हणून अनेक जण पाहतात. पण कवीमन मोजक्या शब्दात भावना व्यक्त करते. जीवनाच्या प्रत्येक प्रसंगात, घटनेत काव्य आहे, त्याचा शोध घेता यायला हवा. भावभावनांचे इंधन असल्याशिवाय तरंग उठत नाहीत. साध्या साध्या गोष्टीतून कथानक फुलवणे हे जसे लेखकाचे काम असते, तसेच मानवी भावभावनांच्या साध्या साध्या भावनांची दखल घेणं कवीचे काम आहे. प्रत्येक नात्याशी आपले काही देणे असते त्याबद्दलच्या भावना व्यक्त करत असताना त्या काव्यरूपात जयराम कराळे यांनी व्यक्त केल्या आहेत.

भावना व्यक्त व्हायला खूप काही अलंकार किंवा अवजड शब्द लागतात असे नाही. नाती उलगडत असताना अनेक विषयांना स्पर्श या कवितेमधून होतो.

शब्दान्वय प्रकाशनतर्फे अनेक चांगली पुस्तके प्रकाशित होत आहेत त्यापैकीच एक `भावतरंग’ आहे. डॉ. सुषमा डाबेराव यांचे मुखपृष्ठ `भावतरंग’ या नावाशी समर्पक आहे.

भाव तरंग

लेखक : जयराम म्हादू कराळे   

प्रकाशक : शब्दान्वय प्रकाशन 

किंमत ः 195 रु.   पृष्ठे ः 110