परीक्षण- अनुभवांचा समृद्ध खजिना

>> सर्वेश फडणवीस

काही पुस्तकं आपल्याला क्षणात आपलीशी वाटतात. खरं तर अनुभवांचा शब्दबद्ध समृद्ध खजिना म्हणजे पुस्तक. मग ती कुठलीही असली तरी त्यातील अनुभव दिशादर्शक आणि प्रेरणादायी असतात. असंच डॉ. प्रकाश आमटे लिखित ‘नव्या पिढी नव्या वाटा’ वाचनात आलं. आमटे कुटुंबातील समाजसेवेचा वसा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर तितकाच प्रत्येकाला परिचित आहे. आपल्यापैकी बहुतेकांना हेमलकसा कुठे आहे आणि तिथे काय काम चालू आहे याची कल्पनाही नव्हती. खरं तर दुर्गम जंगलात रुजणं, तग धरून राहणं, आदिवासींचा विश्वास मिळवणं आणि त्यांचं जगणं सुसह्य करण्यासाठी जास्तीत जास्त सोयीसुविधा पुरवत राहणं यातच डॉ. प्रकाश आमटे आणि त्यानंतरची पुढची पिढी कार्य करते आहे. आज लोकबिरादरीचं काम आणखी कितीतरी पटीने वाढलं आहे, वाढतं आहे. डॉ. दिगंत-अनिकेत आणि डॉ.अनघा-समीक्षा यांनी कार्यकर्त्यांची नवी पिढी घडवत कामाला पुढची दिशा दाखवली आहे आणि ‘नव्या पिढी नव्या वाटा’ हे पुस्तक म्हणजे लोकबिरादरीमधल्या त्यांच्या कामाची गोष्ट आहे.

अर्थात त्याआधी लोकबिरादरी प्रकल्पाच्या सुरुवातीच्या टप्प्याची थोडी माहिती घेणं आवश्यक आहे. 2008 साली भामरागडमधल्या आदिवासींसाठी काम सुरू करण्याची बाबा आमटे यांची कल्पना प्रत्यक्षात उतरवली ती डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदा आमटे  दांपत्याने. त्याचे वटवृक्षात रूपांतर होण्याचा प्रवास म्हणजे ‘नव्या पिढी नव्या वाटा’ हे पुस्तक आहे.

शिक्षण आणि आरोग्य या लोकबिरादरी प्रकल्पातल्या पायाभूत गोष्टी आहेत. भामरागडमध्ये रुजणं आणि आरोग्य-शिक्षणाच्या सोयीसुविधा उभ्या करणं यात डॉ. प्रकाश आमटे यांची तब्बल चाळीस वर्षं गेली. त्यामुळे आदिवासींमध्ये जाऊन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, आर्थिक उन्नतीसाठी त्यांनी सतत प्रयत्न केले. शिवाय गडचिरोलीतला हा भाग पूर्वी नक्षलवाद्यांचा वावर असलेला. ही मर्यादाही लोकबिरादरीच्या पुढच्या पिढीने गेल्या काही वर्षांत ओलांडली. आज अनिकेत आमटे आणि सहकाऱयांनी हेमलकसाच्या पंचक्रोशीतल्या गावांमध्ये विकासाची अनेक कामं सुरू केली आहेत आणि आता लोकबिरादरीच्या दृष्टीने हा खरा पुढचा टप्पा आहे.

लोकबिरादरी प्रकल्प फक्त आरोग्य सेवेपुरता मर्यादित नाही. आदिवासींच्या सर्वंकष विकासाचं स्वप्न त्यांनी पाहिले होते. दारिद्रय़ आणि निरक्षरता ही त्यातली मुख्य कारणं.  म्हणूनच त्यांच्या मुलांसाठी मोफत शाळा सुरू करायची असं ठरलं. त्यानुसार दवाखाना थोडाफार स्थिरावल्यावर 1976 मध्ये लोकबिरादरी येथे शाळेला सुरुवात झाली.

भामरागडसारख्या ठिकाणी आरोग्य क्षेत्रात सतत नवी आव्हानं समोर येत असताना कितीही कामं केली तरी ते पुरेसं ठरत नाही. त्यामुळे आरोग्य सेवेची ही मशाल नव्या पिढीला सतत पुढे नेत रहावी लागणार आहे. डॉ. दिगंत आमटे आणि डॉ. अनघा आमटे यांनी अलीकडे केलेला एक उपक्रम म्हणजे ‘स्कूल हेल्थ अवेअरनेस प्रोग्राम’ (शेप). अनिकेत आमटे आणि समीक्षा आमटे यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या शैक्षणिक विकासकामांमुळे लोकबिरादरी प्रकल्पाला विधायक आयाम मिळाला आहे. अर्धशतकापूर्वी पहिल्या पिढीने एका वाटेवरून प्रवास सुरू केला होता. त्याच्या प्रकाशात ‘नवी पिढी नव्या वाटा’ चालते आहे आणि हे पाहण्याचं भाग्य आपल्या सोबत आधीची पिढीदेखील आता अनुभवते आहे. आज महाराष्ट्रातली हजारो माणसं लोकबिरादरी प्रकल्पाशी जोडली गेली आहेत. त्यामुळे या प्रकल्पात नवं काय घडतं आहे हे त्यांना सांगणं कर्तव्य होतं. म्हणूनच पुस्तकाची निर्मिती झाली. दहा-बारा वर्षांपूर्वी प्रकल्पाची जबाबदारी नव्या पिढीने घेतल्यानंतर कामाचा आवाका केवढा तरी वाढला आहे. म्हणूनच ‘प्रकाशवाटा’ हे पुस्तक असतानाही त्यानंतरच्या घडामोडींची गोष्ट या पुस्तकरूपाने वाचकांसमोर डॉ.प्रकाश आमटे यांनी मांडली आहे.

नवी पिढी नव्या वाटा 

लेखक ः प्रकाश आमटे

प्रकाशक ः समकालीन प्रकाशन, पुणे

मूल्य ः रु. 200/-

पृष्ठे ः 136