परीक्षण- उत्कंठावर्धक कोब्रा

>> प्रा. प्रज्ञा पंडित

पोलीस अधिकारी म्हटले की, आपल्या डोळ्यांपुढे करारी, निडर, काटेकोर, शिस्तबद्ध व्यक्तिमत्त्वाची एक प्रतिमा उभी राहते. या प्रतिमेशी साधर्म्य असणारी व्यक्ती साहित्यिक मनाची असणे हा दुर्मिळ योग आहे. कारण रोजच्या आयुष्यात पंचनामा, तक्रार, गुन्हेगारांच्या फाइल्स आणि कोर्टाचे निकाल अशा निरस गोष्टी लिहिणाऱया, वाचणाऱया व्यक्तीच्या मनात एखादा साहित्यिक झराही वाहत असेल अशी साधी शंकाही आपल्याला येत नाही. पण तरीही पोलिसांमध्ये लेखक व्यंकट पाटील यांच्यासारखे अनेक प्रतिभावान साहित्यिक आहेत ज्यांनी देशाची सेवा करताना, सेवेसाठी आयुष्य वाहताना आपल्या मनातला साहित्यिक झराही कायम वाहता ठेवला आहे.

पोलीस खात्यात अनेक वर्षे सेवा देऊन निवृत्त झालेले व्यंकट पाटील आता साहित्यिक क्षेत्रातही मोलाची कामगिरी करत आहेत. ‘घर हरवलेला पोलीस’, ‘घात’, ‘सर्जा’ आणि ‘वारसा’ अशा एकाहून एक सरस कादंबऱया त्यांनी आजवर लिहिल्या आहेत ज्यांना वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. आता या साहित्यिक वाटचालीत पाटील यांनी अजून एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यांची ‘कोब्रा’ ही कादंबरी नुकतीच प्रकाशित झाली आहे.

‘कोब्रा’ ही कौटुंबिक पार्श्वभूमी असलेली रहस्यकथा आहे जी सुरेश, सीमा, रेखा आणि बिंदू या चौकोनी कुटुंबाभोवती फिरते. सुरेश आणि सीमा हे हॉटेल व्यावसायिक आहेत व सीमाचा भाऊ श्रीकांतही त्यांच्याबरोबर या व्यवसायात आहे. महाराष्ट्रातल्या एका खेडेगावात वाढलेला सुरेश नोकरीच्या निमित्ताने बंगळुरूला येतो आणि मेहनत व कर्तृत्वाच्या जोरावर तो माणिकरावांच्या हॉटेल व्यवसायात भागीदार होतो. पुढे माणिकरावांच्या मुलीशी म्हणजेच सीमाशी त्याचे लग्न होतं आणि त्याचा संसार सुरू होतो. त्यांचा व्यवसाय भारतभर पसरतो. सुरेशच्या मुली त्यांचे जोडीदार निवडतात आणि त्यांनाही या हॉटेल व्यवसायात सामावून घेतले जाते, पण अनपेक्षितपणे रेखाचा मृत्यू होतो. वरवर अपघात वाटणारा हा मृत्यू खून असावा अशीही शक्यता तयार होते आणि कथानकाला कलाटणी मिळते. या प्रकरणाचा शोध घेण्याची कामगिरी नारायण स्वामींच्या हातात येते जे कसून तपास करतात आणि सत्य जगासमोर आणतात. काय आहे ते सत्य? रेखाचा जर खून झाला असेल तर तो कोणी आणि का केला? या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी तुम्हाला लेखक व्यंकट पाटील यांची ‘कोब्रा’ ही कादंबरी वाचावीच लागेल.

‘कोब्रा’ची कहाणी जितकी सीमा आणि सुरेश या कुटुंबाची आहे, तितकीच ती इन्स्पेक्टर स्वामींचीही आहे. या शोधकथेची मांडणी करतानाही व्यंकट पाटील यांनी स्वतच्या अनुभवाचा पुरेपूर वापर केला आहे. पोलिसांची कार्यपद्धती, तपासाची पद्धत, न्यायालयीन कामकाज असे अनेक प्रसंग बहुधा यांच्या स्वानुभवामुळेच परिणामकारक झाले आहेत, पण हा परिणाम साधताना कायद्याच्या भाषेमुळे कथानक कुठेही रटाळ होणार नाही आणि सामान्य वाचकालाही ते सहज समजेल याची काळजी त्यांनी घेतली आहे. पोलिसांचे तपास कार्य सुरू असताना नकळत आपणही आपल्या मनात अनेक कयास बांधू लागतो. शोधकथेच्या या थराराला कौटुंबिक पार्श्वभूमीची जोड मिळाल्याने प्रेम, मैत्री, राग, लोभ, मत्सर असे भावनांचे अनेक रंगही या कथेत कादंबरीत आपल्याला अनुभवायला मिळतात.

लेखक व्यंकट पाटील यांच्या कथा, कादंबऱया या गुन्हेगारी, न्याय व्यवस्था आणि तपास यांसारख्या विषयांचा गहन अभ्यास मांडणाऱया कथा आहेत. या प्रकारात गुन्हेगार, तपास अधिकारी, आणि त्यांच्यातील संघर्ष यांचा थरारक व वास्तववादी पद्धतीने ते आढावा घेतात. त्यांच्या पोलीस कथा वाचकाला केवळ गुह्याची रहस्ये उलगडण्याचा अनुभव देत नाही, तर त्याचबरोबर समाजातील नीतिमूल्ये, मानवी वर्तन आणि सामाजिक व्यवस्थेतील दोष यांचाही विचार करायला लावते.

त्यांच्या लेखणीतून तपास अधिकारीच्या चातुर्याचे, गुन्हेगारांच्या मानसिकतेचे, तसेच सामान्य माणसाच्या जीवनावर गुह्यांचा परिणाम यांचे उत्कंठावर्धक वर्णन आढळते. ही कथा गुह्याचे रहस्य उलगडताना समाजातील चांगल्या आणि वाईट दोन्ही बाजूंना समोर आणते, ज्यामुळे वाचकाचा विचारप्रवर्तक दृष्टिकोन निर्माण होतो. अशा कथा लोकांना कायद्याबद्दल जागरूक करतात आणि समाजात सुरक्षिततेचे महत्त्व अधोरेखित करतात. ही कादंबरी वाचकांना एका वेगळ्या जगात घेऊन जाते आणि गुन्हेगारी जगाचे वास्तव स्पष्ट करतो. जर पोलीस तपास, रहस्यकथा अशा प्रकारच्या साहित्यात तुम्हाला रस असेल तर ‘कोब्रा’ ही कादंबरी तुम्हाला नक्कीच आवडेल.