
>> धीरज कुलकर्णी
कलाकृतीच्या अभ्यासाच्या आस्वाद, समीक्षा आणि मीमांसा अशा तीन पायऱ्या आहेत. या कलाकृतीचा उत्तरोत्तर अधिक सखोल अभ्यास करतात. एखाद्याला विचारले की, अमुक एक पुस्तक तुला आवडले, तर का आवडले हे दहा वाक्यात सांग पाहू किंवा एक पानभर त्यावर लिही, तर तो मनुष्य कदाचित तसे लिहू शकणार नाही. समीक्षा या विषयाच्या प्रयोजनाबद्दल विचार होतो, तेव्हा सामान्य माणसाला समीक्षेचा नक्की काय उपयोग ते इथे समजते.
चित्रपट, नाटक, संगीत, पुस्तक इत्यादी कलाकृती आपल्या आसपास आहेत, आपण त्यांचा आस्वाद घेतो. पण अमुक एक कलाकृती आवडली किंवा आवडली नाही याची शास्त्राrय कारणे आपल्याला सबळपणे विशद करता आली पाहिजेत. हे सर्व इतर कोणाच्या नव्हे, तर स्वतच्याच व्यक्तिगत विकासासाठी उपयुक्त आहे. अन्यथा ती फक्त एक फुटकळ करमणूक म्हणून उरते आणि वेळ, श्रम, पैसे यांचा अपव्यय यापलीकडे हाती काही लागत नाही. कोणत्याही प्रकारच्या कलाकृतीचा गांभीर्याने आस्वाद घेणाऱया रसिकाने त्यामुळे अल्प प्रमाणात का होईना, समीक्षा या विषयाचा अभ्यास करणे जरूर आहे. मराठीमध्ये उत्तम समीक्षेची फार मोठी परंपरा आहे. व. दि. कुलकर्णी, म. सु. पाटील, गंगाधर पाटील, म. वा. धोंड, सुधीर रसाळ ही यातील काही ज्येष्ठ लेखकांची नावे.
समीक्षा हा विषय जरी समजायला जड वाटला किंवा कंटाळवाणा भासला तरी मुळात तो तसा नव्हे. यातील पारिभाषिक शब्दप्रयोगांमुळे अनेकदा नवख्या वाचकाला अडखळायला होते, पण सततच्या सरावाने समीक्षावाचन हे अंगवळणी पडते. सामान्य माणसाला समीक्षावाचन सोपे व्हावे म्हणून सुचवता येणारी पुस्तके म्हणजे माधव आचवल यांचे रसास्वाद आणि म. वा. धोंड यांचे ‘तरीही येतो वास फुलांना.’ अगदी सोप्या भाषेत या पुस्तकात साहित्य कृतींचे विवेचन केले आहे.
प्रस्तुत लेखातील अभ्यासविषय, म. वा. धोंड यांचे ‘तरीही येतो वास फुलांना’ हे मर्ढेकरांच्या नऊ कवितांचे रसग्रहण आहे. म. वा. धोंड हे अतिशय अभ्यासू समीक्षक. कोणत्याही कलाकृतीची समीक्षा करणार ती मुळापासून. मग त्यासाठी कितीही कष्ट घेण्याची त्यांची तयारी होती. एक कविता अभ्यासताना कितीतरी प्रकारचे साहित्याचे संदर्भ त्यांनी तपासलेत. कवीच्या त्या काळातील वयाचा, मनोवस्थेचा अभ्यास केला. इतकेच नव्हे तर, जिथे ती कविता लिहिली तिथे जाऊन त्या जागेची पाहणी केली. याचे सरळ कारण म्हणजे ती मर्ढेकरी कविता होती. आधीच दुर्बोध म्हणून शिक्का बसलेल्या मर्ढेकरी कवितेतील सौंदर्य वाचकांसमोर उलगडून दाखवायचे तर इतके कष्ट घ्यावे लागणार याची स्पष्ट कल्पना प्रा. धोंड यांना होतीच.
मर्ढेकरी कविता ही एखाद्या अबस्ट्रक्ट पेंटिंगसारखी आहे. तिच्यातील सौंदर्य हे मनाच्या खोल तळाला भावणे महत्त्वाचे. सामान्य वाचकाला एक तर इतका वेळ नसतो, शिवाय त्याच्या अनुभवांचा पैस मर्यादित असतो आणि सामान्य वाचकच का, भल्या भल्या लेखक आणि समीक्षकांची मर्ढेकरांच्या कवितेमागे भलती दमछाक झाली आहे. जेव्हा कुणी मर्ढेकरांना म्हणत, तुमची अमकी कविता काही समजली नाही बुवा, तेव्हा मर्ढेकर शांतपणे उत्तर देत, जर ती कविता तुम्हाला समजली नाही, तर ती तुमच्यासाठी नाही. काय बोलणार यावर? पण समीक्षकाला असे म्हणून चालत नाही. त्याला शोध घ्यावाच लागतो. ‘अजुनी येतो वास फुलांना’ या मर्ढेकरांच्या कवितेच्या शीर्षकातच थोडा बदल करून, ‘तरीही येतो वास फुलांना’ असे या पुस्तकाचे शीर्षक दिले आहे. हे पुस्तक समीक्षात्मक म्हणण्यापेक्षा संशोधनात्मक आस्वादपर पुस्तक आहे म्हणणे अधिक योग्य होईल.
अतिशय पारिभाषिक शब्दात त्यांना मर्ढेकरी कवितेची समीक्षा करता आली असतीच. परंतु आधीच त्या कवितेवर दुर्बोध असा शिक्का बसलेला, त्यात पुन्हा समीक्षात्मक परिभाषा वापरली तर सामान्य वाचकापासून हे पुस्तक दूरच गेले असते. त्यामुळे रसाळ अशा साध्या सोप्या भाषेत त्यांनी या कवितांचे रसग्रहण करून ते रसिकांसमोर ठेवल्याने आजही वाचकांमध्ये या पुस्तकाला विशेष स्थान आहे. ‘अजुनी येतो वास फुलांना’ या कवितेतील प्रतिमा लक्षात घेताना तत्कालीन जगभरात पेटलेली युद्धे, भूकंपासारख्या आपत्ती याबरोबरच मर्ढेकरांच्या आयुष्यातील घटस्फोट, पुनर्विवाह अशा घुसळण करणाऱया बाबी पाहिल्या, तर कविता समजायला अधिक मदत होते. ‘हंबरून गाय गेली। वासराला…’ या कवितेत यंत्रयुगामुळे संवादात आलेला दुरावा सूचित होतो. ‘रहा तिथे तू’ ही कविता तर मर्ढेकरांनी किती वादळी मनस्थितीत लिहिली असावी याची सहज कल्पना येते. त्याच सुमारास त्यांचा घटस्फोट झालेला. वैयक्तिक पातळीवर नोकरीतही त्यांना बराच त्रास सहन करावा लागला. त्यातच ‘काही कविता’ या पुस्तकावर अश्लीलतेचा खटला भरला गेला. कवीची काय मनोवस्था असेल ते या कवितेत दिसते.
अशाच प्रकारे एकूण नऊ मर्ढेकरी कवितांचा
म. वा. धोंड मोठय़ा कष्टाने अन्वयार्थ लावतात. हे करत असताना विजया राजाध्यक्ष, श्री. पु. भागवत यांच्या आणि सर्व स्नेह्यांच्या सहकार्याचा ते आवर्जून उल्लेख करतात.
‘नऊ कवितांचा मोनोड्रामा’ या स्वतंत्र लेखातून याच नऊ कविता आपण का निवडल्यात याचीही कारणे विशद केली आहेत. धोंड यांनी घेतलेल्या या परिश्रमांमुळे केवळ हे पुस्तकच नव्हे तर मर्ढेकरांच्या कवितांनाही त्यांनी पुनश्च एक स्थान मिळवून दिले.