अभिप्राय- मूकपणातील क्रांती

>> शुभांगी बिंदूरानडे

सुझन केन यांच्या अतिशय गाजलेल्या ‘क्वाएट’ या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद नुकताच वाचनात आला. समाजातल्या व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वातल्या एका अशा पैलूवर हे पुस्तक प्रकाश टाकते, ज्या पैलूला काहीसं हिणकस, कमी महत्त्वाचं, दुर्लक्ष करण्याजोगं समजण्याची प्रथा आहे – शांत, गंभीर, अबोल, अंतर्मुखी असणं. निसर्गतच शांत आणि गंभीर किंवा संवेदनशील व्यक्तींकडे प्रदीर्घ काळापासून दुर्लक्ष करण्यात आलं आहे. ही वेळ आहे अंतर्मुख व्यक्तींचं शांततेचं महत्त्व समजून घेण्याची. आपल्याला समाजात अबोल आणि अंतर्मुख अशी पुष्कळ माणसं दिसतात. जोरजोरात, उत्साहाने सतत बोलणाऱया बहिर्मुख व्यक्तींच्या तुलनेत या व्यक्ती अगदी फिक्या वाटतात, हो ना? पण हे खरं आहे का? खरंच का या व्यक्ती दुर्लक्ष करण्याजोग्या, कमी महत्त्वाच्या असतात? मुळीच नाही- वस्तुस्थिती अशी मुळीच नाही हे या कसदार पुस्तकातून मांडण्यात आलेलं आहे.

आजच्या समाजात अत्यंत बोलक्या, आपल्या कल्पना सर्वांसमोर प्रभावीपणे मांडू शकणाऱया आणि उत्साही लोकांनाच आदर्श व्यक्तिमत्त्व समजलं जातं. प्रत्यक्षात ते खरं असतंच असं नाही याची जाणीव करून देण्यासाठी लेखिका अबोल, अंतर्मुख समजल्या गेलेल्या; पण आपल्या कार्यामुळे जगात अत्यंत समर्थपणे बदल घडवून आणू शकलेल्या अनेक शास्त्रज्ञ, विचारवंत, कलाकारांची उदाहरणं देते. आपलं व्यक्तिमत्त्व मुळात कसं आहे. अंतर्मुख की बहिर्मुख, हे ओळखण्याची काही सूत्रं या पुस्तकात मिळतात. अत्यंत दिमाखदार भाषेत, चटपटीतपणे आपल्या व्यक्तिमत्त्वाने इतरांना भारून टाकत सांगितल्या गेलेल्या गोष्टी तेवढय़ा सकस असतीलच याची काही खात्री नाही आणि अबोलपणे, एकांतात राहून काम करणाऱया व्यक्तीने सांगितलेल्या गोष्टी टाकाऊच असतील असं तर मुळीच नाही, असं लेखिका अनेक उदाहरणं देऊन सिद्ध करते. बहुतेक संशोधक आणि कलाकार एकांतातच आपल्या सृजनाचा सर्वोत्तम आविष्कार घडवू शकतात आणि नंतर तो जगासमोर आणला जातो, असं सुझन केन म्हणतात. माणूस एकांतात असतानाच आपल्या मनाचा तळ गाठू शकतो, विचार करू शकतो, असं सांगतानाच बहिर्मुख व्यक्ती हे काम अंतर्मुखी व्यक्तीच्या ताकदीने करू शकत नाहीत, हेही त्या स्पष्ट करतात. व्यक्ती अंतर्मुख किंवा बहिर्मुख का बनते, याचा जैविक आधार काय, हेही सुझन यांनी अतिशय विस्ताराने या पुस्तकात सांगितलं आहे. अंतर्मुख आणि बहिर्मुखींच्या मेंदूची रसायने कशा प्रकारे भिन्न आहेत आणि समाज अंतर्मुखींना कशा प्रकारे कमी लेखतो हे लेखिकेने दाखवून दिलं आहे. आशियाई लोक अंतर्मुख, तर पाश्चिमात्य लोक बहिर्मुख असतात असं त्या नमूद करतात. हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी अभ्यासलेल्या त्या आशियाई विद्यार्थ्यांची उदाहरणं देतात. या ओघातच त्या आशियातून पश्चिमी देशांत स्थलांतरित झालेल्या विद्यार्थ्यांना, आदर्श व्यक्तिमत्त्वाबाबतच्या विरुद्ध कल्पनांमुळे कशा समस्यांना तोंड द्यावं लागतं, त्याचाही ऊहापोह करतात. अत्यंत कळकळीने अंतर्मुखी व्यक्तींची बाजू मांडणारं, अत्युत्कृष्ट संशोधनाचं पाठबळ लाभलेलं आणि असंख्य खऱयाखुऱया प्रसंगांचं रोचक वर्णन करणारं हे पुस्तक तुमचा स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलायला लावतो. त्याचबरोबर या पुस्तकाच्या वाचनानंतर अबोल, एकलकोंडय़ा आणि बुजऱया व्यक्तींकडे पाहण्याचा आपला पूर्वापार दृष्टिकोन पूर्णपणे बदलून जातो. अंतर्मुख विद्यार्थी आणि त्यांचे पालक, त्यांच्यासाठी अनेक बहुमूल्य सल्ले केन यांनी या पुस्तकातून दिले आहेत.

क्वाएट

लेखिका ः सुझन केन, अनुवाद ः व्यंकटेश उपाध्ये

प्रकाशक ः साकेत प्रकाशन ,पृष्ठे ः 296 , किंमत ः 299/-