
>> सुधाकर वसईकर
नव्वदोत्तरीच्या काळात नामवंत निर्मिती संस्था, सशक्त नाटकाकार, कल्पक व बुद्धिमान दिग्दर्शक, समर्थ कलाकार आणि समर्पक नेपथ्यकार या साऱयांनीच डॉक्टर.. तुम्हीसुद्धा, हसत खेळत, चारचौघी, ती फुलराणी, नागमंडल, चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी, गिधाडे, आमच्या या घरात, कोण म्हणतं टक्का दिला यांसारखी सशक्त, दर्जेदार अनेक नाटके मराठी रंगभूमीला दिलीत. तो मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ ठरला. याच सुवर्णकाळातील ऑगस्ट… 1991 ते नोव्हेंबर 1992 दरम्यानच्या कालावधीत ‘लोकप्रभा’ या लोकप्रिय साप्ताहिकात कवी, कथाकार, कादंबरीकार, नाटककार, समीक्षक प्रा. अशोक बागवेंनी आपल्या सिद्धहस्त लेखणीने त्याची चिकित्सकपणे नाटय़समीक्षा लिहिली. याचे ऐतिहासिक महत्त्व ओळखून त्यातील काही निवडक नाटय़ परीक्षणांचा शारदा प्रकाशनाने नुकताच ‘नाटय़स्वधर्म’ समीक्षाग्रंथ प्रकाशित केला आहे. बागवेंची विपुल साहित्यसंपदा असून, नाटय़ स्वसधर्म हे त्यांचं 44 वे पुस्तक त्यांनी ज्येष्ठ नाटय़ समीक्षक व नट कै. कमलाकर नाडकर्णी यांना अर्पण केलं आहे.
नाटकाच्या सर्व अंगाचे प्रशिक्षण घेतलेला समीक्षक नाटकाच्या समीक्षेला न्याय देऊ शकतो, असे मत विजया मेहता यांनी व्यक्त केलं आहे. बागवेंनी तर मराठीतील सगळे साहित्यप्रकार लीलया हाताळले असून, एकांकिका, नाटय़लेखन, नाटय़, चित्रपट गीत लेखनात तितक्याच ताकदीने मुशाफिरी केलीय. अनेक मानाचे पुरस्कारही मिळाले आहेत. मुख्यत्वाने त्यांचा रंगमंचावर प्रत्यक्ष वावर असल्यामुळे नाटक हे माध्यम त्यांना चांगलंच ज्ञात आहे.
बागवेंची नाटकाची सोपी सुटसुटीत व्याख्या आहे. ‘रंगाकडून अंतरंगाकडे घेऊन जातं ते नाटक!’ संहिता, नेपथ्य, अभिनय, प्रकाशयोजना आणि दिग्दर्शन आदी सर्वं नाटय़घटकांची केलेली समीक्षा कुठल्याही रंगकर्मी, नाटय़ अभ्यासकाला, रसिकाला सहज समजणारी असून, मार्गदर्शकही आहे. तसेच इतर सहा परीक्षण लेखांतून बागवेंची नाटकाविषयी असलेली कळकळ आणि रंगकर्मीविषयी असलेला जिव्हाळा प्रतीत होतो. नाटय़ संकुलाला रंगभूमीशी निगडित असलेल्या व्यक्ती आणि कलावंतांची नावे देणेच योग्य असल्याचे मत ‘नाटय़संकुलाचे नाव काय?’ या परीक्षणात त्यांनी आवर्जून नमूद केलेय. शिवाय मराठी रंगभूमीवर सादर होणारी बहुतांशी नाटके ही एकतर कुठल्या तरी पाश्चात्त्य कल्पनेवर आधारित असतात. नाहीतर रूपांतरित तरी असतात. स्वतंत्रपणे लिहिलेल्या नाटकांची वानवा असल्याची खंतही व्यक्त केलीय.
31 वा महाराष्ट्र राज्यनाटय़ महोत्सव एक आढावा परीक्षण लेखातून हौशी राज्यनाटय़ स्पर्धा आणि व्यावसायिक रंगभूमी यांचा परस्पर संबंध दृढ असून, ह्या स्पर्धेची अत्यंत गंभीरपणे चिकित्सा करणे गरजेचे असल्याचे बागवेंनी त्या काळात नमूद केलेले मत समकालातही लागू पडते. विशेषत स्पर्धेतील परीक्षकांच्या निवडीविषयी दिलेली तपशीलवार माहिती तसेच समांतर नाटय़मंच आणि नाटकाचा पहिला जाणकार रसिक म्हणजे नाटय़ समीक्षक!
नायिका प्रधान आणि राजकीय नाटकं प्रामुख्याने लिहिली गेली नाहीत. त्यामुळे मराठी रंगभूमीवर पुरुषी आविष्कार अधिक प्रमाणात झालेला दिसून येतो. बागवेंनी कल्पिलेल्या 1990 पर्यंतच्या तीन पिढय़ांतील नटांची अभिनय कारकीर्द आणि नाना पाटेकर, दिलीप प्रभावळकर, विनय आपटे आणि संजय मोनेसारख्या दिग्गज सामर्थवान व प्रतिभावंत नटांनी रंगभूमीवर, समर्थपणे सादर केलेल्या पुरुषी – रंगाविष्करणाचा पहिल्याच लेखात बागवेंनी विस्तार भयास्तव थोडक्यात, पण मुद्देसूद घेतलेला आढावा तर दिलचस्प आहे. सदर परीक्षणं साप्ताहिकातली असल्यामुळे, काही विस्ताराने तर काही प्रसंगानुरूप आटोपशीर आहेत. गाजलेल्या 24 नाटकांची परीक्षणं अंतर्भूत असल्याने वाचकांसाठी एक पर्वणी आहे. खेळकर वृत्तीने, मिश्किलतेने तर कधी तिरकस आणि मल्लिनाथी करत परखड, बेधडक लिहिलेली परीक्षणं अतिशय रंजक झाली आहेत.
समीक्षाग्रंथ असूनही, विशेषज्ञाचा कोणताही आविर्भाव न बाळगता गुण-दोषासकट अधिकारवाणीने लिहिलेल्या परीक्षणांतून मराठी रंगभूमीचा एक विशालपट वाचकांसमोर उभा राहातो. भाषेवरील प्रभुत्व, मोजक्या आणि नेटक्या शब्दांत मांडण्याची बागवेंची हातोटी तर सर्वश्रुत आहेच; याची प्रचिती परीक्षणांतूनही येते. मुखपृष्ठावर नटराज मूर्तीचे सुबकसे समर्पक चित्र महेश ढोंबरेंनी छान चितारलेय. संहिता आणि प्रयोग अशा पातळीवर केलेली विचक्षण नाटय़समीक्षा नाटक अध्ययनकर्त्यांसाठी मार्गदर्शक असून, हा समीक्षाग्रंथ संग्राह्य असा आहे.
नाटय़स्वधर्म
लेखक ः प्रा. अशोक बागवे
प्रकाशक ः शारदा प्रकाशन
पृष्ठ ः 147 मूल्य ः 200/-