अभिप्राय- प्रेम भावनांचा ‘बिलोरी’ आविष्कार

>> राजेंद्र विठ्ठल ठाकूर

‘बिलोरी’ हा महेद्र कोंडे यांचा ग्रंथालीने प्रकाशित केलेला काव्यसंग्रह प्रेमातील नानाविध भावभावनांचा उत्कट आविष्कार आहे. ‘माझे अस्तित्वच तुझ्या असण्याने भारलेले, मग नवल कसले सारे शब्दच तू गर्भारलेले’ अशा प्रेम भावनेने ओतप्रोत भरलेल्या आणि भारलेल्या ओळींनी या प्रेम प्रवासाला सुरूवात झाल्यानंतर पुढे कविता वाचता वाचता आपण त्यात नकळतपणे गुंतत जातो. प्रत्येकाच्या मनातील प्रीती भावनेला सहज स्पर्श करणाऱया आणि काव्य प्रतिभेला जागृत करणाऱया या कविता समरसून अनुभवाव्यात अशा आहेत. प्रेमातील विविध विभ्रम टिपणाऱया या बिलोरी कविता प्रेमाची नवनवीन रूपे दाखविणाऱया आहेत व प्रेम कसे करावे हे शिकवणाऱयाही आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

प्रेम भावना ही चराचरात व्यापून राहिलेली आहे. मनातील प्रेमाचे घट्ट नाते हे संपूर्ण जगणे ऋतुमानाप्रमाने भारून टाकते. ते कधी वसंतात फुलते, पावसात बरसते तर विरहाची पानगळ अनुभवास येते. प्रियतमेच्या रूपाने एक पारदर्शी बिलोरी व्यक्तिमत्त्व मनात कायमचे स्थान निर्माण करते.

‘तू बिलोरी आकाशव्यापी, तेजाळणारी चांदणी, तू बिलोरी अंतर्बाह्य, प्रकाशमयी मानिनी’ – असे कवी म्हणतो. कारण आपल्याला दिसणाऱया सृष्टीतील वेगवेगळ्या घटकांवर तिचे अस्तित्व कवीला प्रकर्षाने जाणवते. प्रत्येक बहरात, वाटेवर, वळणावर ती भेटत जाते आणि परकाया प्रवेश व्हावा त्याप्रमाणे कविता होऊन सोबत चालत राहते.

मग तिच्या असण्यावर, तिच्या समोर दिसण्यावर, तिच्या जवळ नसण्यावरही कवितांच्या ओंजळी वाहू लागतात. कविता श्वासागणिक सुचू लागते. मग तो लिहितो… कविता लिहिणे सोपे नाही. काळजाच्या प्रत्येक ठोक्यावर तपासून घ्यावी लागते कविता… मला नव्याने उमगू लागले आहे, कविता लिहिण्यासाठी काळजावर वार व्हावे लागतात.

या जगात असलेल्या त्याच्या घरात तिच्या सोनपावलांचा आवाज घरची ओढ लावतो. ते प्रितीचे घर अंतर्बाह्य जाणून घ्यावेसे वाटते. कुणीतरी हवेहवेसे समोर दिसते. नकळत आपल्या मनात भरते. आपल्या आयुष्यात येते. आपले होऊन जाते. नाते जुळताना झालेला आनंद मग प्रेमाचा हक्क मिरवू लागतो. प्रेम भावना अशी जीवनातील गोडी निर्माण करते. तुझं कोवळं हासू, म्हणजेच माझी कविता, किंवा तिरपा कटाक्षही, मग तू हसत राहतेस आणि मी भरभरून वाहतो, कवितांच्या ओंजळी… अशी कवितांची बरसात होऊ लागते.

पण, हा आनंद फार काळ टिकत नाही. किंबहुना प्रेमाची सार्थकता विरहातच असते काय? असे वाटावे इतक्या सहजतेने सुखाच्या एका लाटेमागे दुःखाच्या दहा लाटा धडकाव्यात तशी विफलता नशिबी येते. तिथेही समंजसपणा दाखवत, तिचे आयुष्यात येणे जितके अपरिहार्य, तितकेच निघून जाणेही, कुंडलीच्या ग्रहांनी, तिला महाराणीच करायचं ठरवलं, त्यात तिचा काय दोष…? अशी मनाची समजूत कवी काढतो. प्रेम विश्वातील सर्व प्रकारच्या भावभावनांना हळुवार स्पर्श करणाऱया व त्यात आपल्याला गुंतून ठेवणाऱया या कविता आहेत, जणू काही आपल्याच मनाचा उद्गार!

या काव्यसंग्रहातील प्रत्येक कविता तिच्या अस्तित्वाची बिलोरी जाणीव करून देते. तिच्या नजरेतून सृष्टीचे रंगरूप पाहते. तिच्या स्वप्नभारल्या डोळ्यात चांदणे शिंपते. उदास मेघांच्या पुंजक्याला तिचे हास्य बहाल करते. प्रीतीच्या या भावविभोर विश्वात तिचा शोध घेते. समजूतदारपणा दाखवते. ती कानांचे प्राण करून ऐकण्यास उत्सुक असताना तो शब्दबावरा झाला तरी ती त्यातील अर्थ जाणून घेते. ‘सारे तुझे तुझेच आहे’ म्हणत गुलाबी सूर, गुलाबी तराणे छेडते. तिच्या अस्तित्वातून साऱया विश्वाला प्रेमाचे काव्यात्म दर्शन देणारा हा संग्रह म्हणजे कविता प्रेमींसाठी एक सुंदर भेट आहे.

‘बिलोरी’ म्हणजे उंची काच, स्फटिक. ज्यामधून प्रकाश आरपार गेला तर इंद्रधनुषी सप्तरंगी शलाका पसरतात. बिलोरी या काव्यसंग्रहामधून प्रेमाचे असेच विलोभनीय सप्तरंग लोभसपणे उमटले आहेत. त्यातील ती म्हणजे सखी, केवळ प्रेयसी इतकी मर्यादित नाही. तर जगातील प्रिय असणारी कोणतीही गोष्ट म्हणजे ‘बिलोरी’ आहे. प्रेमातील नानाविध भावभावनांच्या प्रतिमा या काव्यसंग्रहातील वैशिष्टय़पूर्ण उपमा, रूपक, अलंकार, प्रतिभेमुळे अधिकच सुंदर दिसू लागतात आणि प्रेमाचे शुद्ध रूप गवसल्याचा आनंद मिळतो. महेंद्र कोंडे यांचा ‘बावनकशी’ नंतरचा ‘बिलोरी’ हा दुसरा काव्यसंग्रह ती आनंदी अनुभूती वाचकांना देतो.

 बिलोरी

कवी ः महेंद्र कोंडे

प्रकाशन ः ग्रंथाली n मूल्य ः रु. 150/-