>> श्रीकांत आंब्रे
व्यवसायाने शिक्षकी पेशा असलेले नारायण मुरलीधर पारकर हे भगवद्गीतेचे चिकित्सक चिंतनशील अभ्यासक म्हणून ओळखले जातात. आयुष्यभर गीताभाष्य प्रमाण मानून त्यांनी वाटचाल केली. त्याचा सर्वांगसुंदर परिपाक म्हणजेच त्यांचे अलीकडे प्रकाशित झालेले ‘श्रीमद्भगवद्गीता समश्लोकी मराठी’ हे भगवद्गीतेचे मराठी भाषांतरित काव्याचे पुस्तक. या पुस्तकात त्यांनी सोप्या भाषेत काव्यरूपात गीतातत्त्व उलगडले आहे. त्यांचे काव्यलेखन उत्स्फूर्त असून या काव्यरचनाही त्यांच्या अभ्यास, चिंतनाबरोबर त्यांच्या भक्तियुक्त अंतःकरणाची साक्ष देणाऱया आहेत. आचार्य विनोबा भावे यांनी ज्या पद्धतीने ‘गीताई’ची रचना केली त्याच पद्धतीने लेखकाने मराठी श्लोक लिहून गीतेचा अर्थ उलगडून दाखवला आहे. मूळ श्लोकाचा अर्थ बिघडू न देता एकास एक श्लोक याप्रमाणे केलेले रूपांतर सहजपणे समजेल अशा सोप्या भाषेत आहे. या श्लोकांना गेयता, ओघ, माधुर्य असल्याने वाचकांना त्यात नक्की गोडी वाटेल. मूळ संस्कृत श्लोकांच्या अर्थाला कुठेही बाधा होऊ न देता त्या श्लोकांचा अर्थ लयबद्ध, काव्यात्म आणि भावपूर्ण होण्याची काळजी लेखकाने जबाबदारीने घेतल्याचे प्रत्ययास येते. या पुस्तकात भगवद्गीतेत जसे अठरा अध्याय व सातशे श्लोक आहेत, त्याच पद्धतीने मांडणी केली आहे. भगवद्गीता ही सर्व वेदांची जननी आणि धर्माचा आधार आहे. धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, कोणत्या प्रसंगी कसे वागावे याचे जीवन तत्त्वज्ञान गीतेत असून संभ्रमावस्थेतील मानवाला अर्जुनाप्रमाणेच ती मार्गदर्शक ठरते हा तिच्यावरील भाष्यकारांचा अनुभव आहे. आजपर्यंत गीता तत्त्वज्ञान आद्य शंकराचार्य, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर, लोकमान्य टिळक, आचार्य विनोबा भावे यांच्यासह अनेक तत्त्ववेत्त्यांनी स्वतःला भावलेल्या दृष्टिकोनातून मांडले आहे. आचार्य विनोबांच्या ‘गीताई’शिवाय गीतेचे अन्य मराठी समश्लोकी रूपांतर अभावानेच आढळते. त्यामुळेच पारकर यांच्या मराठी रूपांतराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. लेखकाच्या अंगी प्रतिभासामर्थ्याबरोबरच मराठी भाषा आणि काव्यशास्त्राची यथार्थ जाण असल्यामुळेच त्यांनी हे आव्हान लीलया पेलले आहे. काव्यातील प्रत्येक शब्द तोलून मापून सहजतेने योजणे ही प्रासादिक किमया लेखकाने समर्पित भावनेने भक्तिभावाने त्यात आपला जीव ओतल्यामुळेच शक्य झाली आहे. गीतेचा एक वेगळा लालित्यमय अनुभव घेण्यासाठी मराठी रसिकांनी हे काव्य वाचायलाच हवे.
श्रीमद्भगवद्गीता समश्लोकी मराठी
लेखक ः नारायण मुरलीधर पारकर
प्रकाशक : सुमेरू प्रकाशन, डोंबिवली
पृष्ठे ः 111
मूल्य ः 250 रुपये.