![delhi bjp](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/delhi-bjp-696x447.jpg)
‘देशाची सत्ता आपल्या हाती आहे. मात्र दिल्ली ताब्यात नाही,’ या भाजपच्या भळभळत्या जखमेवर अखेर ‘मलम’ लागले. तब्बल 27 वर्षांनंतर संसदेपासून चार हात लांब असलेल्या पंडित पंत मार्गावरच्या भाजपच्या दिल्ली कार्यालयात गुलाल उधळला गेला, एरवी देशात तीनदा भाजपचे सरकार येऊनही दिल्ली कार्यालयात सुतकी वातावरण होते. या वेळी ते बदलले. दहा वर्षांची अरविंद केजरीवालांची राजवट उलथून पडली.
लोकपालाच्या जनआंदोलनातून अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पक्षाचा ‘पाळणा’ हलला. त्यानंतर केजरीवालांच्या पक्षाने ‘सिस्टिम’ बदलण्याच्या घोषणा देत चांगलेच राजकीय बाळसे धरले. भाजप व काँगेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांना दिल्लीतून हद्दपार करण्याची कामगिरी केजरीवालांनी केली. दिल्लीत भाजप जिंकणार नाही. भाजपकडे नेता नाही, हे हेरून संघप्रणीत संघटनांनी सुरुवातीला केजरीवालांना बळ दिले होते. इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या बॅनरवर केजरीवाल पुढे आले. दहा वर्षांत केजरीवालांनी सिस्टिम बदलली नसली तरी काही चांगले बदल जरूर केले. शिक्षण, आरोग्य, वीज व पाणी या मूलभूत क्षेत्रांत उत्तम काम केले. मात्र त्याच वेळी काही राजकीय व प्रशासकीय चुका त्यांच्याकडून झाल्या. ‘व्होट बँके’चे राजकारण करायला ते गेले आणि त्यातही ते फसले. अरविंद केजरीवाल हा भला माणूस आहे या त्यांच्या प्रतिमेवर कथित मद्य घोटाळ्याचे शिंतोडे उडाले. केजरीवालांनी सजवलेला मुख्यमंत्र्यांचा शासकीय बंगला ‘शीशमहल’ हा जागतिक स्तरावर चर्चेला आला. केजरीवालांची ‘कथनी व करनी’ यात फरक आहे, हे नरेटिव्ह जनमानसावर बिंबवण्यात भाजप यशस्वी झाला आणि 26 वर्षांचा दिल्लीतला सत्तेचा दुष्काळ वसंत ऋतूच्या साक्षीने संपवला!
केजरीवालांनी आश्वासनांची खैरात करून जनतेच्या अपेक्षा अधिक वाढविल्या. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना अगदीच मर्यादित अधिकार असतात. त्यात केजरीवालांना वेसण घालण्यासाठी केंद्रीय सत्तेने एकापेक्षा एक असे नायब राज्यपाल नेमले. त्यांच्या विरोधातील लढाईत केजरीवाल घायपुतीला आले. यमुना शुद्धीकरण हा दिल्लीकरांच्या जिव्हाळय़ाचा विषय केजरीवालांना नीट हाताळता आला नाही. त्यात भ्रष्टाचाराविरोधात बोंब मारून जो पक्ष जन्माला आला त्याच पक्षाचे एकेक नेते तुरुंगात जाताना पाहून दिल्लीकरांचा हळूहळू भ्रमनिरास व्हायला लागला. केजरीवालांकडचा मुस्लिम मतदार काँग्रेसकडे गेला. या वेळी या व्होट बँकेने भाजपला हरविण्यासाठी ‘आप’ला मतदान केले नाही हे नोंद घेण्याजोगे आहे. भाजपने या निवडणुकीसाठी झाडून सगळ्या खासदारांना कामाला लावले. हे खासदार नीट काम करताहेत की नाही, ते तपासण्याची यंत्रणा होती. त्यामुळे संसदेतले काम आटोपले की टिफीन भरून दिल्लीत राहून जो इलाका कधी माहिती नव्हता तिथेही भाजपच्या खासदारांना पायधूळ झाडावी लागली. ल्यूटन झोनच्या पलीकडेही दिल्ली आहे व ती प्रचंड अस्वच्छ आहे, तिथे मोठय़ा समस्या आहेत याची जाणीव या नेत्यांना फिरताना झाली असेल. भाजपला आता यमुना शुद्धीकरणासह सगळय़ाच शुद्धीकरणाची तयारी करावी लागणार आहे. दिल्लीतील सत्ता गमावणे हे ‘आप’सह विरोधी पक्षांना मोठा धक्का आहे, हे नक्की.
काँगेस अन् दीक्षित
दिल्लीच्या निकालात काँग्रेसचे पानिपत झाले. ज्या शीला दीक्षितांनी काँग्रेसला एका उंचीवर नेऊन ठेवले. सलग पंधरा वर्षे दिल्लीची सत्ता गाजवली. दिल्लीत पायाभूत सुविधांची व नव्या दिल्लीची पायाभरणी केली तो पक्ष या निवडणुकीतही गारद झाला. राहुल व प्रियंका गांधी यांनी काँग्रेससाठी खूप मेहनत घेतली. विशेषतः पंजाबमधले काँग्रेसचे नेतेही या वेळी दिल्लीत तळ ठोकून होते. शीख समुदाय आपल्याकडे वळविण्यासाठी या नेत्यांनीही प्रयत्न केले. देवेंद्र यादव यांनी असंतोष यात्रा काढली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र दुर्दैवाने काँग्रेसला ही मते ईव्हीएममध्ये खेचून आणता आली नाहीत. दिल्लीत मेट्रोची पायाभरणी अटल बिहारी वाजपेयींनी केली असली तरी शीला दीक्षितांच्या पाठपुराव्यामुळे दिल्लीकरांचे सार्वजनिक वाहतुकीचे जीवन सुखकर झाले. काॅमनवेल्थ गेम्सच्या वेळी भ्रष्टाचाराचे आरोप जरूर झाले. मात्र दिल्लीत त्या वेळी ज्या पायाभूत सुविधा निर्माण झाल्या त्याला तोड नाही. मात्र या जमेच्या बाजू असूनही काँग्रेसचा पराभव झाला. ज्या शीला दीक्षितांनी दिल्लीत काँग्रेसचा दरारा निर्माण केला. त्यांचे चिरंजीव संदीप दीक्षित तिसऱया क्रमांकावर आले. काँग्रेसने दिल्लीचा पेपर यापुढे तरी गांभीर्याने घ्यावा, हा संदेश देणारा हा निकाल आहे.
अवध ओझांचा ‘भौकाल’ फेल
मोटिव्हेशन टीचर आणि स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांमधले एक लोकप्रिय नाव असणारे अवध ओझा विधानसभा निवडणुकीत दारुणरीत्या पराभूत झाले. ओझांभोवती असणारे वलय लक्षात घेऊन केजरीवालांनी त्यांना मनीष सिसोदियांच्या पटपडगंजमधून तिकीट दिले. सिसोदियाही पडले व ओझा मास्तरही पराभूत झाले. केजरीवालांकडून उमेदवार निवडीच्या या वेळी काही मूलभूत चुका झाल्या होत्या. त्यापैकी हा पटपडगंज मतदारसंघ. सिसोदिया यांनी मेहनतीने उभा केला. या मतदारसंघात ते प्रचंड लोकप्रिय होते. त्यांचे कामही चांगले होते. विरोधकही त्याची प्रशंसा करत. मात्र या मतदारसंघातील बिहारींची मोठी संख्या लक्षात घेऊन अवध ओझांना मैदानात उतरविण्यात आले. ओझा मास्तर निसंशय चांगले ‘मोटिव्हेशन टीचर’ आहेत. मात्र यूपीएससीच्या विद्यार्थ्यांना ज्ञान देणे आणि जनतेच्या मनाचा काैल मिळविणे या दोन भिन्न बाबी आहेत. प्रशासनात आपले चेलेचपाटे आहेत, आपल्याभोवती वलय आहे अशा गोड गैरसमजात ओझा मास्तर राहिले. त्याची परिणिती दारुण पराभवात झाली. हल्ली कार्यकर्त्यांऐवजी अशीच वलयांकित माणसे राजकारणात घुसत आहेत. मात्र दरवेळी हे वलय कामाला येतेच असे नाही. यूपीएससीचा क्लास सुशेगात सुरू असताना मास्तर या राजकारणाच्या नसत्या भानगडीत पडले. आता त्यांची अवस्था ‘गाढवही गेले आणि ब्रह्मचर्य’ही गेले अशी झाली आहे. मोटिव्हेशनल स्पीकर म्हणून ज्ञानामृत पाजणे वेगळे आणि जनतेचे मोटिव्हेशन करणे वेगळे, हा फरक ओझा मास्तरांच्या एव्हाना लक्षात आलेला असेल.