जाऊ शब्दांच्या गावा – माझी मैना गावाकडं राहिली…

>> साधना गोरे

हल्लीची तरुण मुलं-मुली आपल्या प्रियकर-प्रेयसीला म्हणजे बॉयफ्रेंड- गर्लफ्रेंडला ‘पिल्लू’ म्हणतात, असं इन्स्टाग्राम नामक समाज माध्यमावरून लक्षात येतं. ही तरुण-तरुणी उच्चभ्रू वर्गातील असतील तर ‘पिल्लू’ऐवजी ‘बेब’ वापरलं जातं एवढंच. प्रत्येक पिढीने आपल्यापुरती अशी संबोधनं घडवली आहेत आणि ती वापरली आहेत. लोकसाहित्यात प्रेयसीला ‘मैना’, ‘साळू’ अशी संबोधनं वापरलेली दिसतात. जुन्या काळी तर काही स्त्रियांची ही विशेष नावंही होती.

‘मैना’ नावाविषयी वि. का. राजवाडे ‘नामादिशब्दव्युत्पत्तिकोशा’त म्हणतात, हे नाव संस्कृत ‘मदनिका’ किंवा ‘मेनका’ या नावापासून आलं. राजवाडे या नावाचा एक प्रवास ‘मदनिका – मयनिआ – मैनी – मैना’ असा सांगतात, तर ‘मेणका – मेणआ – मेणा – मैना’ असा दुसरा प्रवास सांगतात. या नावाचा ‘मैना’ नावाच्या पाखराशी काही संबंध नाही, असं ते म्हणतात, तर ‘व्युत्पत्तिकोश’कार कृ. पां. कुलकर्णींना राजवाडय़ांचं म्हणणं मान्य नाही. ते म्हणतात, ‘मैना’ हे पक्षी विशेष असलेलं नाम मूळ तुकाa भाषेतलं आहे. तुकाa भाषेत त्याचा ‘मैना’ असाच उच्चार आहे. तुकाaतून हे नाव चीनमध्ये गेल्यावर त्याचं ‘मयना’ झालं. चीनमधून हा शब्द भारतात आल्यावर त्याचं पुन्हा ‘मैना’ झालं. मराठीबरोबरच ‘मैना’ पक्ष्याचं हे नाव हिंदी, उडिया, कश्मिरी, पंजाबी, बंगाली, गुजराती, कोकणी या भाषांमध्येही आढळतं. दक्षिणेतील कानडी भाषेतही ‘मैन’ किंवा ‘मैना’ अशी रूपं आहेत.

आपल्या लोकसाहित्यात, लोकगीतांमध्ये राघू-मैना ही पक्ष्यांची जोडी प्रेमाचं प्रतीक मानली गेली आहे. या प्रतीकाचा आजही इतका प्रभाव आहे की, अनेक मराठी, हिंदी, पंजाबी प्रेमगीतं ‘राघू-मैना’, ‘तोता-मैना’ या शब्दकळेवर बेतलेली आहेत, पण या सगळ्यात अव्वल रचना म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची ‘माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जिवाची होतीया काहिली…’ हे ते गीत. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतलं हे गाणं. यातली मैना म्हणजे अद्याप महाराष्ट्रात येऊ न शकलेल्या सीमा भागाचं प्रतीकसुद्धा आहे.

लोकसाहित्यात प्रेमी युगुलाला ‘राघू-मैने’ची उपमा दिली गेली असली तरी राघू आणि मैना हे दोन वेगवेगळ्या जातीतले पक्षी आहेत. राघू ही पोपटातली एक जात, तर मैना म्हणजे साळुंखी. मराठीत काही पक्ष्यांच्या नावांची फक्त पुल्लिंगी रूपं आहेत. उदा. कावळा, सुतार, कबुतर इ. या पक्ष्यांच्या मादीला कावळीण, सुतारीण असं सहसा कोणी म्हणत नाही, तर काही पक्ष्यांची नावं फक्त स्त्रिलिंगी आहेत. उदा. चिमणी, टिटवी इ. अगदी हीच गोष्ट राघू-मैना या जोडीची आहे. मैना पक्ष्याच्या जातीतल्या नराला वेगळं नाव नाही आणि राघू म्हणजे पोपटाच्या जातीतल्या मादीलाही वेगळं नाव नाही. असे हे वेगवेगळ्या जातीतले दोन पक्षी लोकसाहित्यात प्रेमाचं प्रतीक म्हणून येतात. एक प्रकारे हे आंतरजातीय प्रेमसंबंधच म्हटले पाहिजे.

मैना पक्ष्याला महाराष्ट्राच्या काही भागांत ‘साळुंखी’ असंही म्हटलं जातं. लोकसाहित्यात प्रेयसीला किंवा स्त्राrला लाडाने ‘मैना’ म्हटलं जातं, तसं ‘साळू’ हे संबोधनही वापरलं जातं. राजवाडय़ांच्या मते हा ‘साळू’ शब्द संस्कृत ‘चारू’ शब्दाचा अपभ्रंश आहे. ‘चारू’ म्हणजे सुंदर, पण राजवाडय़ांची ही व्युत्पत्तीही कृत्रिम वाटते. पाखराच्या नावावरून ही नावं आली असण्याची शक्यता अधिक वाटते. कारण अनेकदा निसर्गातल्या एखाद्या साम्यावरून शब्द घडले आहेत, तशी विशेष नावंसुद्धा ठेवली गेली आहेत.

लोककथांमध्ये ‘मैना’, ‘मैनावती’, ‘मैनाबाई’ अशी विशेष नावं आहेत, तशी ‘साळू’, ‘साळूबाई’ हीसुद्धा नावं आहेत. स्त्राr-पुरुष समानतेचं घोषवाक्य ठरावं असं एक लोकगीत आहे – ‘ल्येकीच्या आईला नका म्हनूसा हालकी, ल्येकाच्या आईला कुनी दिलीया पालकी’ इतक्या समर्पक व मोजक्या शब्दांत मुला-मुलीचं समान महत्त्व बिंबवणाऱया या गीतातली आई पुढं म्हणते, ‘लाडक्या लेकीचं नाव ठेविलं मी साळू, किती नावांनी आळवू’ किंवा ‘कुरूळ केसाची वेणी किती घालू, माझ्या मैनाताईचं रूप सुंदर ओठ लालू’. लोकसाहित्यात सामान्य स्त्रियांना उद्देशून ‘साळका-माळका’ किंवा ‘साळकाया माळकाया’ म्हटलं गेलं आहे. या ‘साळका-माळका’ बऱयाचदा कथा पुढे नेण्याचं, पात्रांच्या अपरोक्ष घडलेल्या घटना सांगण्याचं काम करतात. त्यामुळेच अति चौकश्या करणाऱया स्त्रियांना उद्देशून आजही ‘साळकाया-माळकाया’ म्हटलं जातं. स्त्राrला लाडानं, प्रेमानं उद्देशून वापरली जाणारी ‘साळू’, ‘मैना’ ही संबोधनं तिला कामाची विनवणी करतानाही वापरली जातात. त्यासंदर्भात वापरला जाणारा एक शब्दप्रयोग म्हणजे ‘ये गं साळू, आपण दोघी दळू’.