लेख – जैविक पुनर्भरण आणि भूमी सुपोषण

>> संतोष सोमनाथ लाटणेकर,  [email protected]

आज आपल्याला मृदा आरोग्य धोरणाची खूप जास्त गरज आहे. माती परीक्षण अहवालामधे मातीतील अन्नद्रव्याप्रमाणे सविस्तर जैविक तपासणी करणे गरजेचे आहे. (फक्त सेंद्रिय कर्ब नव्हे) तसेच मातीची जैविक तपासणी करणारी प्रयोगशाळा असणे आवश्यक आहे. पीक व्यवस्थापन आणि मृदा आरोग्य (भूमी सुपोषण) हे वेगवेगळे विषय आहेत आणि त्यांची हाताळणीदेखील वेगवेगळीच केली पाहिजे. शेती कोणत्याही पद्धतीने केली तरी भूमी सुपोषणाशिवाय पर्याय नाही आणि भूमी सुपोषण करण्यासाठी जैविक पुनर्भरणाशिवाय पर्याय नाही.

सध्या संपूर्ण जगात सेंद्रिय शेती व उत्पादनाबद्दल बरीचशी जागरुकता आली आहे. आपल्याकडे गेली 50-55 वर्षे रासायनिक शेती केल्यानंतर सेंद्रिय/नैसर्गिक/योगिक ई शेतीकडे वाटचाल सुरू झाली आहे. जगभर रासायनिक शेतीचे जमिनीवर झालेले परिणाम भयावह आहेत. जपानमध्ये 34 टक्के माती 1981 ते 2003 दरम्यान नापीक झाली तर इंग्लंडच्या मातीमधे 40 ते 60 टक्के सेंद्रीय कर्ब कमी झालाय. जगभरात रासायनिक शेतीने 80 टक्के गांडूळ कमी झाले तर जर्मनीमध्ये 10 वर्षांत 25 टक्के गांडूळ कमी झाले. मातीच्या नापिकीमुळे जगात 20 टक्के उत्पादकता कमी झाली, पण माती पुनरुजीवित केल्यास 1.4 ट्रिलियन डॉलरचे उत्पादन वाढू शकते. (115 लाख कोटी रुपये) 2019 मधील इस्रोच्या अहवालानुसार भारताची 30 टक्के म्हणजे 22 कोटी एकर जमीन दूषित/बाधित झाली आहे आणि त्यामधे 2003 ते 2016 मधे 83 लाख एकर जमीन बाधित झाली आहे. सर्वाधिक दूषित जमीन राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, जम्मू-कश्मीर येथे झाली आहे.

आपल्याकडे 1970 च्या अगोदर सर्व प्रकारच्या प्रदूषणाचे प्रमाण खूपच कमी होते, जे नंतर भयानक वाढले. आपण यासाठी वाढलेली लोकसंख्या, रासायनिक खते आणि औद्योगिकीकरण याकडे बोट करतो. याबरोबर विभक्त कुटुंब पद्धत, जमिनीवर जैविक उपचार पद्धतीकडे केलेले दुर्लक्ष आणि महत्त्वाचे म्हणजे स्वदेशी गायींकडे दुर्लक्ष यांचा एकत्रित परिणाम आहे. 1970 च्या अगोदर आपल्याकडे शेतीमध्ये स्वदेशी गायींचे शेणखत मोठय़ा प्रमाणात वापरले जायचे. जमिनीत असलेल्या गांडुळांना अन्न मिळायचे. त्यातून गांडूळखत/अर्क निर्मिती व्हायची. शेणखतातील जैविक घटक, अन्नद्रव्य आणि गांडूळ खतातील व अर्कातील जैविक घटक, अन्नद्रव्ये पिकांना मिळायची. यातून आपली शेती व्हायची.

एकत्रित कुटुंबात गायींकडे लक्ष देणे शक्य होते. पुढे हरितक्रांती आली. रासायनिक खते आली, पिकाला भरपूर अन्नद्रव्ये मिळाली आणि मातीच्या जैविक मूल्याकडे पूर्ण दुर्लक्ष झाले, जे आजपर्यंत तसेच आहे. मातीचा पोत कमी झाला. यासाठी आपण रासायनिक खतांना किंवा जास्त वापरल्या जाणाऱ्या पाण्याला दोष देतो, पण वेळोवेळी जैविक पुनर्भरण केले असते तर मातीची अशी अवस्था झाली असती का, हा खरा प्रश्न आहे. स्वदेशी गायींच्या शेणाचे आणि गांडूळखत पाणी, तसेच अर्काचे जैविक मूल्य न समजल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

आपल्याकडील शेतीमध्ये पीक उत्पादनाला सर्वाधिक महत्त्व दिले जाते, पण भूमीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. आणि म्हणून शेतामध्ये गेल्यावर पिकांचे निरीक्षण नेहमी होते, पण मातीचे निरीक्षण करत नाही. तसेच पिकावर जसा पैसे/वेळ/ऊर्जा खर्च करतो तसा मातीच्या आरोग्यासाठी होत नाही. शेती म्हणजे माती आणि पीक असे असताना फक्त पिकाकडे लक्ष देऊन कसे चालेल?

कृषिप्रधान देश असूनही आपल्याकडे अजूनही मृदा आरोग्य धोरण नाही. तसेच आपल्या कृषी संशोधन संस्था/विद्यापीठांकडे जमिनीचा सेंद्रिय कर्ब/सुपिकता कमी वेळेत वाढवण्यासाठी हुकमी तंत्रज्ञान नाही. मातीच्या आरोग्याकडे 2-3 पिढय़ांचे दुर्लक्ष झाल्याचे परिणाम आज दिसत आहेत. आता पुरेशी काळजी न घेतल्यास वाढत जाणार आहेत. अनेक ठिकाणी जमिनीत पाणी मुरत नाही, पाण्याचा निचरा होत नाही. तसेच माती चिबड, चिकट, टणक झाली आहे. जमिनीत हवा खेळत नाही आणि खतांचा अपटेक होत नाही. मातीचा सेंद्रिय कर्ब अवघा 0.40 टक्के इतका कमी झालाय तर मातीचा सामु वाढलाय. माती नापीक/क्षारपड/चोपन होत चाललीय, गांडूळ तर दिसतच नाही. त्यामुळे पिकाची वाढ, उत्पादन पैसे, श्रम, वेळ खर्च केल्यानुसार होत नाही. त्यात बदलते हवामान, अवकाळी पाऊस यांची भर पडली आहे.

आपल्या पूर्वजांनी आपली भूमी शतकानुशतके सुपोषित ठेवली ती भूमी आपण 1970 नंतर 15-20 वर्षांतच वाळवंटाकडे नेण्यास सुरुवात केली. त्यांनी भूमी सुपोषनाची तंत्रे विकसित केली व हजारो वर्षे यशस्वीरीत्या वापरली. ही सर्व तंत्रे जैवविविधतेवर आधारित होती. अशा तंत्रांमधे स्वदेशी गायीचे शेण, गोमूत्र, दही, दूध, शेतातील मुठभर माती अशा विविध जिवाणूंचे स्रोत असलेल्या वस्तू वापरल्या. तसेच जिवाणूंची संख्या वाढवण्यासाठी गूळ, तूप, मध, हरबरा डाळीचे पिठ, केळी इ. वापरल्या. यामधील काही वस्तु उपलब्धतेनुसार वापरल्या. आजही काही प्रमाणात शेतकरी अशा द्रावणांचा वापर करतात. अशी तंत्रे/द्रावणे वेळोवेळी वापरत राहिल्याने जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढतो, जमीन सुपिक राहते हे त्यांनी शतकानुशतके दाखवून दिले.

अणू आणि जिवाणूंशिवाय शेती समृद्ध होत नाही हे आपल्या पूर्वजांनी दाखवून दिले. त्यामुळे आता आपली जमीन वाचवण्यासाठी किंवा सजीव करण्यासाठी जैविक पुनर्भरण करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. आज कोणतीही शेणखत/भरखते देतेवेळी जैविक द्रावण वापरणे गरजेचे आहे. भूमी सुपोषण केल्याने जमीन/माती भुसभुशीत होते, सुपिक होते, सेंद्रिय कर्ब वाढतो, पाण्याचा निचरा होतो, खताचा अपटेक वाढतो आणि पिकास फायदा होतो. जमिनीची प्रतिकार क्षमता वाढल्याने पिकांचे आजार कमी होतात. तसेच निविष्ठांवर होणारा खर्च कमी होतो. शेत नांगरायला वेळ व इंधन कमी लागते, तसेच उत्पादनाचे पौष्टिक व औषधी मूल्य वाढते, टिकाऊपणा वाढतो. आज आपल्याला मृदा आरोग्य धोरणाची खूप जास्त गरज आहे. माती परीक्षण अहवालामधे मातीतील अन्नद्रव्याप्रमाणे सविस्तर जैविक तपासणी करणे गरजेचे आहे. (फक्त सेंद्रिय कर्ब नव्हे) तसेच मातीची जैविक तपासणी करणारी प्रयोगशाळा असणे आवश्यक आहे.

वैज्ञानिक पद्धतीने मातीवर जैविक उपचार आवश्यक आहे आणि शेतकऱ्यांना/शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मातीवर जैविक उपचाराचे प्रशिक्षणही आवश्यक आहे. जैविक खते      (Bio-fertiliser) त्या हंगामाच्या पिकाच्या वाढीसाठी उपयोगी आहे, पण जैवविविधतेवर आधारित तंत्राने माती बरीच वर्षे सुपिक राहते. त्यामुळे वेगवेगळी जैविक खते वापरण्यापेक्षा जैवविविधतेवर आधारित असलेले एकच वस्तु/पदार्थ निर्माण करणे आणि वापरणे आवश्यक आहे. देशी गोवंश संवर्धन करून जैवविवधतेवर आधारित पंचगव्य, जिवामृत, अमृत पाणी, संजीवक, गांडूळखत पाणी, भूमंगल द्रावण इ. तंत्रांची माहिती देणे व उत्तेजन देणे गरजेचे आहे. सेंद्रिय घटक/बायोमास निर्मितीसाठीचे प्रकल्प उभे करणे किंवा त्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवे. गोशाळा, पांजरपोळ, गोठे सेंद्रिय घटकांचे महत्त्वाचे स्रोत आहेत ज्यांना उत्तेजनाची गरज आहे. तसेच गांडूळखत प्रकल्प हे जिवाणूंचे मुख्य स्रोत असल्याने त्यांनाही उत्तेजनाची गरज आहे. जिल्हा पातळीवर किमान एक माती (मृदा) आरोग्य प्रशिक्षण पेंद्र स्थापन करून किमान एक अनुभवी व्यक्ती/प्रशिक्षक उपलब्ध करून द्यावा. सर्व शेतकरी गट/समूह/पंपनी यांना असे प्रशिक्षण अनिवार्य करून एक पथदर्शी प्रकल्प लवकर सुरू केल्यास त्याचे यश पाहून अनेकांना प्रेरणा मिळेल आणि शेतीकडे बघण्याचा किंवा शेती करण्याचा दृष्टिकोण बदलून जाईल.

पिक व्यवस्थापन आणि मृदा आरोग्य (भूमी सुपोषण) हे वेगवेगळे विषय आहेत आणि त्यांची हाताळणीदेखील वेगवेगळीच केली पाहिजे. शेती कोणत्याही पद्धतीने केली तरी भूमी सुपोषणाशिवाय पर्याय नाही आणि भूमी सुपोषण करण्यासाठी जैविक पुनर्भरणाशिवाय पर्याय नाही.

(लेखक मातीचे आरोग्य पर्यावरण अभ्यासक आहेत.)