लेख – शहीद भगतसिंगांची शोध पत्रकारिता

>> विशाल अहिरराव

भगतसिंग यांचं संपूर्ण कुटुंबच या देशकार्याच्या यज्ञवेदीत आहुती देत आलं. त्यांच्याकडून देशभक्तीचं बाळकडू मिळालंच, शिवाय वाचन, अभ्यासक वृत्ती यातून संस्कार होत गेले. वाचनातून देशभक्तीचा रंग तर लागलाच, मात्र इतिहास, जगभरात झालेल्या क्रांती, कायदे निर्मिती, अर्थशास्त्र, साहित्य यांची गोडी आणि महत्त्व त्यांना उमजलं. केवळ वाचन आणि टिपणं इतक्यापर्यंतच स्वतःला मर्यादित न ठेवता त्यांनी वृत्तपत्रांत काम करण्यास आणि लिहिण्यास सुरुवात केली.

‘‘चिकित्सकपणा आणि स्वतंत्र विचार हे दोन गुण क्रांतिकारकांसाठी अपरिहार्य आहेत’’ असा विचार मांडणारे शहीद भगतसिंग यांनी स्वतःच्या जीवनात हे सूत्र कसोशीनं पाळलं होतं, पण हे सूत्र केवळ राजकीय क्रांतीसाठी मर्यादित नाही. विविध क्षेत्रांत काम करताना वैशिष्टय़पूर्ण कार्य करणाऱया किंवा प्रवाहाविरुद्ध पोहणाऱयांनी हेच सूत्र आचरल्याचं दिसून येतं. भगतसिंग यांनी तेच शब्दबद्ध केलं आहे, पण त्यांचं वैशिष्टय़ हे की, 23 वर्षे 5 महिने 23 दिवस इतक्या कमी काळात क्रांतिकार्यासाठीची ही परिपक्वता त्यांच्याकडे होती. क्रांतिकार्यात, देशभक्तीत कधीही एकमेकांशी तुलना होऊ शकत नाही. देशासाठी जीवन अर्पण करणारी व्यक्ती ही पुजनीय असतेच. मग त्यांचा मार्ग सशस्त्र असो निःशस्त्र! मात्र तरीही इतक्या कमी वयात प्रचंड कठीण परिस्थितीत विविध विषयांचा अभ्यास करत शोध घेऊन चरित्रांना न्याय द्यायचा, एखादा विचार प्रस्थापित करायचा, त्याचं महत्त्व लोकांना पटवून द्यायचं आणि त्यासाठी प्राणार्पण करायचं अशा व्यक्ती निराळ्याच. त्यामध्ये शहीद भगतसिंग यांचं स्थान खूप महत्त्वाचं आहे.

भगतसिंग यांचं संपूर्ण कुटुंबच या देशकार्याच्या यज्ञवेदीत आहुती देत आलं. त्यांचे आजोबा अर्जुनसिंग आर्य समाजाच्या विचारसणीत घडले. त्यांचे वडील किशनसिंग, काका अजितसिंग, स्वर्णसिंग असे तिघेही देशकार्यात सक्रिय होते. त्यांच्याकडून देशभक्तीचं बाळकडू मिळालंच, मात्र भगतसिंग यांचं वाचन, शोधक – अभ्यासक वृत्ती यातून त्यांच्यावर संस्कार होत गेले. वाचनातून त्यांच्या मनाने आकार घेतला. इयत्ता चौथीत असतानाच त्यांनी काका अजितसिंग, लाला लजपतराय, अन्य नेते आणि राजकीय घडामोडी यांची कात्रणं असलेल्या अनेक फायली वाचून काढल्या होत्या. लहान वयातच त्यांनी राजकीय घडामोडी आणि कार्ल मार्क्स वगैरैंसारख्या महान व्यक्तींच्या संदर्भातील किमान 50 पुस्तकांचं वाचन केल्याचं वाचनात येतं. भगतसिंग यांचे सहकारी शिववर्मा यांनी आठवण सांगताना सांगितले आहे की, ‘‘भगतसिंग यांच्या एका खिशात पिस्तूल असे तर दुसऱयात पुस्तक. ते जराही वेळ वाया घालवत नसत. अगदी सुनसान रस्त्यावर चालतानादेखील ते पुस्तक वाचत असायचे. अगदी कुणाला भेटायला गेले असतील आणि त्यांना भेटण्यासाठी वेळ होत असेल तर त्या वेळातही ते वाचत राहायचे.’’ फाशीवर जायच्या काही वेळ आधीदेखील ते लेनिन यांचं चरित्र वाचत होते हा प्रसंग चित्रपटांमधून अधिक परिचयाचा झाला आहे.

केवळ वाचायचं म्हणून वाचायचं असं नाही तर कात्रणं जमवणं, विविध विषय आणि भावलेली विधानं, लेखन त्यात नकल करून घेणं, टिपणं काढणं अशी त्यांना सवय होती. तुरुंगात असतानादेखील त्यांनी वाचन कायम ठेवलं. तुरुंगातील त्यांची टिपणं आजही उपलब्ध आहेत. राजकीय क्रांती, इतिहास, चरित्रं, साहित्य, विज्ञान, अर्थशास्त्र अशा विविध विषयांवर त्यांनी सखोल अभ्यास सुरू ठेवला होता. त्यांच्या अभ्यासपूर्ण लेखांमधून आणि टिपणांमधून त्याची कल्पना येते. लोकमान्य टिळकांचे ‘गीतारहस्य’, ‘नेपोलियन की जीवनगाथा’, वीर सावरकरांचे ‘हिंदुपदपातशाही’ पुस्तकांसह, मार्क्स, लेनिन, रुसो अशा जागतिक स्तरावर क्रांतिकारी विचार मांडणाऱया व्यक्ती आणि त्यांच्या संदर्भातील पुस्तकांचा त्यांनी अभ्यास केलेला पाहायला मिळतो.

वाचनातून देशभक्तीचा रंग तर लागलाच, मात्र त्याच सोबत इतिहास, जगभरात झालेल्या क्रांती, कायदे निर्मिती, अर्थशास्त्र, साहित्य यांची गोडी आणि महत्त्व त्यांना उमजलं. वाचनातून त्यांचे विचार दीर्घ होत गेले. आपल्याला उमजलेलं लोकांपर्यंत पोहोचवावं लागेल हे त्यांनी हेरलं. म्हणून केवळ वाचन आणि टिपणं इतक्यापर्यंतच स्वतःला मर्यादित न ठेवता त्यांनी वृत्तपत्रांत काम करण्यास आणि लिहिण्यास सुरुवात केली. गणेश शंकर (विद्यार्थी) यांच्या ‘प्रताप’ वृत्तपत्रात संपादन विभागात काम करण्यास सुरुवात केली. त्यावेळी क्रांतिकारी स्वतःच्या नावानं लिहायचे नाहीत. त्यामुळेच त्यांनी प्रथम ‘बलवंतसिंग’ या नावानं लिखाण केलं. त्यानंतर 1924 मध्ये ‘अकाली’ नावाच्या वृत्तपत्रात त्यांनी काम केलं. 1925 मध्ये त्यांनी दैनिक ‘अर्जुन’च्या संपादकीय विभागात काम केलं.

‘आजादी की भेंट शहादते’ या मथळ्याखाली त्यांनी ‘किरती’मध्ये लेखमाला लिहिली. त्यामागे स्वातंत्र्यासाठी पंजाबमध्ये झालेली आंदोलनं, पंजाबमध्ये जागृती कशी आली, शहिदांनी कोणत्या विचारांसाठी बलिदान दिलं याचीही वाचकांना माहिती व्हावी असा त्यांचा उद्देश असल्याचं त्यांनी स्पष्ट म्हटलं होतं. ‘विद्रोही’ या नावानं त्यांनी हे लेखन केलं होतं. त्यांनी लेखमालेतून लिहिलेली चरित्रं अभ्यासणं खूप कठीण होतं. त्यावेळी आतासारखी साधनं नव्हती. त्यात क्रांतिकार्य करता करता लपून-छपून अभ्यास करून, पुरावे शोधून अत्यंत सोप्या शब्दांत पंजाबमध्ये होऊन गेलेल्या क्रांतिकारकांना न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मदनलाल धिंग्रा, सुफी अंबाप्रसाद, बलवंतसिंह, डॉक्टर मथुरासिंग अशी 34 चरित्रं त्यांनी लिहिली आहेत. चरित्रांना न्याय देण्यासाठी त्यांनी केलेली ही एक प्रकारची शोध पत्रकारिताच म्हणावी लागेल. त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांतूनच पंजाबमध्ये जागृती येऊ लागली. क्रांतिवीरांना समाजातून मदत करण्यासाठी लोक पुढे येऊ लागले. आपल्या शब्दांतून जनमत तयार करणं, त्यांना प्रेरित करत राहणं, जनतेतील अन्यायाविरुद्धच्या असंतोषाला वाचा फोडणं हे पत्रकाराचं कार्य आहे. जागतिक परिस्थितीचा अभ्यास करून आपल्याकडील परिस्थिती अधिक चांगली करण्यासाठी त्याचा वापर कशा प्रकारे करता येईल याचा तुलनात्मक अभ्यास लेखातून मांडण्याचं काम त्यांनी केलं.

अन्याय करणाऱया इंग्रज सरकारविरुद्ध जनतेत असलेल्या असंतोषाला बाहेर आणण्यासाठी त्यांनी अभ्यासपूर्ण लिखाण करण्यास सुरुवात केली. पंजाब हा ‘इंग्रजांना मदत करणारा प्रांत’ किंवा ‘राजकीयदृष्टय़ा मागास’ असा शिक्का लागला होता, तो दूर करून स्वातंत्र्ययज्ञात पंजाबमधून पडलेल्या आहुत्यांचा इतिहास त्यांनी वृत्तपत्रांमधून मांडला. तसंच दिल्लीतील ‘महारथी’ आणि अलाहाबाद येथील ‘चांद’ नावाच्या वृत्तपत्रांतून त्यांनी लिखाण केलं.

स्वतः पत्रकारिता करत असताना त्यांनी चुकीच्या गोष्टींवरदेखील टीका करणं सोडलं नाही. धर्म आणि स्वातंत्र्य संग्राम या लेखात त्यांनी सांप्रदायिक नेते आणि वर्तमानपत्रे यांच्यावर ठपका ठेवला आहे.  जातीय दंगलीच्या संदर्भात ते लिहितात की, ‘या पाठीमागे सांप्रदायिक नेते आणि वर्तमानपत्रे यांचा हात अधिक आहे. पत्रकारितेचा व्यवसाय हा एकेकाळी अत्यंत पवित्र समजला जायचा. आज तो अत्यंत किळसवाणा झाला आहे. लोकांना शिक्षण देणे, त्यांच्यातील संकुचित वृत्ती दूर करणे, परस्पर सौख्य वाढवणे, सामूहिक एकता वृद्धिंगत करणे हे आद्य कर्तव्य होते, पण आज त्यांनी अज्ञान वाढवणे, दंगली घडवून आणणे आणि राष्ट्रीय एकता नष्ट करणे हेच आपले प्रमुख कर्तव्य मानले आहे…’ त्यांच्या या लिखाणातून पत्रकाराकडे असलेला स्पष्टवत्तेपणा त्यांच्यात पाहायला मिळतो.