लेख – पंढरीस जावे, हरिनाम गावे…

>> डॉ. प्रकाश क्षीरसागर

साहित्यिक, कवी, गझलकारांनाही विठ्ठलाच्या भक्तीचा मोह आवरत नाही. काही जण गझलेतील काही शेर किंवा संपूर्ण गझल विठ्ठलाला समर्पित करतात. विठ्ठल किंवा पांडुरंग काही सारी कामे सोडून पंढरपूरला ये असे म्हणत नाही. शेतकरी भक्त शेतीची कामे करून वारी करतात. त्याला शरण जातात. ते खरे कर्मयोगी आहेत. ‘‘पंढरीस जावे, हरिनाम गावे, तल्लीन तू व्हावे, हाच धर्म’’ असे वारकरी स्वतःला आणि इतरांना बजावत असतात.

ज्येष्ठ सरत आला अन् आषाढ महिना आला की, भागवत भक्तांना पंढरीची ओढ लागते. पांडुरंगालाही भक्तांची आस लागते. हे प्रेम उभयपक्षी असते, एकांगी नसते. देहू आणि आळंदीहून तसेच विदर्भातून भक्त पायी वारीसाठी उत्सुक असतात. जमिनीची मशागत झालेली असते. उरात भक्तीची गंगा वाहू लागते अन् पायांना ओढ लागते ती हरिभक्तीची. वारीची ही परंपरा गेली कित्येक शतके जुनी आहे अथवा हजारो वर्षांची ही परंपरा आहे. लोक वारीसाठी ख़डबडून जागे होतात. वळवाच्या पावसाने जमीन भुसभुशीत केली अन् भुईमूग अन तेलबियांची लागवड शेतकरी करतात. विठ्ठलाच्या सगुण रूपाच्या दर्शनाची ओढ भाविकांना लागते. घरदार सोडून हे वारकरी दिंडय़ापताका घेऊन पंढरीच्या वाटेने चालू लागतात. त्यांना एकच आस असते… त्या परमेश्वराला पाहण्याची, त्याच्या भेटीची. संपूर्ण महाराष्ट्रातून वारीसाठी भक्त जमा होत असतो. त्यांच्या ओठी फक्त विठ्ठलाचे नाम असते.

साहित्यिक, कवी, गझलकारांनाही विठ्ठलाच्या भक्तीचा मोह आवरत नाही. विदर्भातील एक तरुण गझलकार गोपाल मापारी विठ्ठलाला धीर देतात. वारीची लगबग सुरू झाल्याने कोरोना काळात घरी बसलेले भक्त आता पंढरीच्या दिशेने कूच करीत आहेत. ते येतीलच, विठ्ठला, तू धीर सोडू नकोस. भक्त कधी वारी चुकवायचा नाही. तो आता पंढरीला येण्यासाठी निघाला आहे. वाटेवर आहे. त्या भक्तांसाठी तू पंढरीतच थांब. फक्त मंदिर सोडू नकोस. विटेवरच उभा रहा. अठ्ठावीस युगे तर तू तिथेच आहेस. मग आता मंदिर सोडण्याची घाई कशाला? असा सवाल ते करतात…

भक्त येतील तू धीर सोडू नको

विठ्ठला फक्त मंदिर सोडू नको 

तर मराठवाडय़ातील धाराशीवचे एक गझलकार व भागवत भक्त भागवत ऊर्फ बाळू घेवारे म्हणतात, वारीसाठी निघालेल्या भक्तांना तू दर्शन दे. त्यांचे सारे क्लेश दूर कर, अशी विनवणी ते करतात. ते स्वतः भाविक आहेत. विठ्ठलाच्या दर्शनाला ते वारीत जातात. कधी नामस्मरणात दंग होतात. ते म्हणतात की,

म्हणतात भक्त तुजला तू चांग पांडुरंगा 

फेडून टाक त्याचे तू पांग पांडुरंगा 

आपल्या भक्ताचे तू पांग फेडावेस. भक्तासाठी तू किती चांगला आहेस हे साऱ्या जगाला ठाव आहे. तुझ्यापाशी मी एकच मागणे मागतो की, तू भक्तांचे पांग फेडावेस. त्यांना मुक्ती द्यावी. त्यांची भक्ती सफल व्हावी. त्यांना दर्शन देऊन त्यांचे जीवन तू सफल करावेस. भक्तांची हीच आस असते की, त्यांना पांडुरंगाने दर्शन देऊन कृतार्थ करावे.

 मंगळवेढय़ाचे एक गझलकार हेमंत रत्नपारखी त्याची भक्ती करताना फक्त त्याची ओढ लागावी अशी इच्छा व्यक्त करतात. त्याच्याकडे ते हट्ट करतात की, जीवनात देव दिसावा व भेटावा अशी त्यांना आस आहे. मंगळवेढे ही संतांची भूमी आहे. चोखोबाचे कुटुंब आणि कान्होपात्रा ही संत मंडळी मंगळवेढय़ाचीच. त्यामुळे हेमंतजी विठ्ठलाला सांगतात, माझ्या अंतरी आता तुझी ओढ लागू दे. माझे हेच तुला सांगणे आहे. किती साध्या आणि सरळ व सोप्या शब्दांत ते विठ्ठलाला मागतात…

विठू अंतरी माझ्या ओढ तुझी लागावी 

असे एवढे माझे तुला सांगणे आता 

आणखी एक गझलकार गुजरातमधील आहेत. गांधीनगर येथील दिवाकर चौकेकर. तेही विठ्ठलाचे व्यवहारी भक्त आहेत. ते विठ्ठलभक्ती करतात. ‘कर्म हीच पूजा’ या ब्रीदवाक्याप्रमाणे गझल हीच त्यांची पंढरी किंवा विठ्ठल आहे. ते तनाने पंढरपूरला जात नाहीत तरी त्यांच्या ध्यानीमनी पांडुरंग आहेच. ते त्याला बजावून सांगतात…

नाही कधी केली कार्तिकी अन् आषाढी 

मुशायरा ही माझ्यासाठी वारी आहे 

विविध गझलकारांना भक्तीची ओढ लागली आहे. काही जण गझलेतील काही शेर किंवा संपूर्ण गझल विठ्ठलाला समर्पित करतात.  विठ्ठल किंवा पांडुरंग काही सारी कामे सोडून पंढरपूरला ये असे म्हणत नाही. शेतकरी भक्त शेतीची कामे करून वारी करतात. त्याला शरण जातात. ते खरे कर्मयोगी आहेत. ‘‘पंढरीस जावे, हरिनाम गावे, तल्लीन तू व्हावे, हाच धर्म’’ असे वारकरी स्वतःला आणि इतरांना बजावत असतात. गझलकारही हा धर्म बजावत असतात. शेरातून त्यांचे व्यक्तित्व विठ्ठलापायी लीन होत असते.