>> अनिल हर्डीकर
आशा भोसले यांचं गायिका म्हणून नाव बाबुजींना खुद्द ललिता फडके यांनी सुचवलं. त्या दोघींच्या भेटीची ही गंमत.
आशा भोसले आणि सुधीर फडके ही नावं माहीत नसलेला मराठी माणूस शोधूनही सापडणार नाही. सुधीर फडके यांचं मूळ नाव श्रीराम असून ते लौकिक पावले ते सुधीर आणि बाबूजी म्हणून. आशा भोसले यांचं गायिका म्हणून नाव बाबुजींना खुद्द ललिता फडके यांनी सुचवलं. त्या दोघींच्या भेटीचीदेखील मोठी गंमत आहे.
अशीच एकदा आशा भोसले नावाची पार्श्वसंगीताच्या क्षेत्रात काही करू पाहणारी मुलगी मालाडच्या ‘फिल्मिस्तान स्टुडिओ’त जाण्यासाठी लोकलच्या लेडीज डब्यात बसली होती. अर्थात त्या काळी डब्यात तशी गर्दी नसायची आणि लेडीज डब्यात तर सहजच जागा मिळायची बसायला. तिच्या समोरच्या सीटवर बसल्या होत्या त्या काळच्या विख्यात पार्श्वगायिका ललिता फडके. शांतपणे काही विणकाम करत बसल्या होत्या. त्या काळची टॉपची गायिका इतकी नम्र, साधी-सरळ! पण आशा त्याचं कर्तृत्व जाणून होती. धाडस करून आशाने त्यांना विचारलं, “तुम्ही ललिता फडके ना?”
त्या म्हणाल्या, “हो.”
“मी आशा, लता मंगेशकरची धाकटी बहीण.”
“माहीत आहे मला, मी तुम्हाला ओळखते.” ललिताबाई म्हणाल्या.
आशाला खूप बरं वाटलं. कारण तेव्हा तिची ‘दी आशा भोसले’ अशी ओळख अजून बनायची होती. लताची बहीण म्हणूनच तिला तेव्हा ओळखलं जायचं. आशाने ललिताबाईंना विनंती केली, “ माझी ओळख तुमच्या मिस्टरांशी, म्हणजे सुधीर फडके यांच्याशी करून द्याल का?”
ललिताबाई सहजी “हो” म्हणाल्या आणि एक दिवस खरंच त्यांनी तिची ओळख बाबुजींशी करून दिली. आशाताई बाबुजींकडे पहिल्यांदा गायल्या ‘पुढचं पाऊल’ या सिनेमासाठी आणि ते गाणं होतं ‘माझ्या जाळ्यात गावलाय मासा.’
मराठीमध्ये बाबुजींनी 669 गाणी दिलेली आहेत. त्यातील 566 सोलो आहेत आणि त्यातील 154 गाणी एकट्या आशाताईंनी गायलेली आहेत. त्यांनी संगीत दिलेल्या 84 मराठी चित्रपटांपैकी 60 सिनेमांमध्ये आशाताईंनी पार्श्वगायन केलेलं आहे. मराठी सिनेमात बाबुजींनी 78 ड्युएट्स दिली. त्यातली 33 आशाताईंनी गायली आहेत. बाबुजींनी मराठीत 45 गायिकांना आपली गाणी दिलेली आहेत खरी, पण 1960 नंतर प्रामुख्याने आशाताईंचा प्रभाव दिसून येतो.
आशाताई बाबुजींकडे इतक्या रुळलेल्या होत्या तरी एका प्रश्नाचं उत्तर मात्र सापडत नाही. बाबुजींनी ‘गीतरामायण’मधील एकही गाणं आशाताईंना का दिलं नसावं? असो.
धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना, जे वेड मजला लागले, धुंद एकांत हा, रूपास भाळलो मी, आज चांदणे उन्हात हसले, आज प्रीतीला पंख हे लाभले, चंद्र आहे साक्षीला, तू नजरेने ‘हो’ म्हटले, डोळ्यात वाच माझ्या, तुला न कळले मला न कळले, फिटे अंधाराचे जाळे… ही युगुलगीते सुधीर फडके आणि आशा भोसले या दोघांची गायकीतील केमिस्ट्री किती परिणामकारक होती ते दाखवते. मात्र त्यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा आशाताईंच्या शब्दांत त्यांच्या अनेक चाहत्यांनी ऐकलेला आहे.
25 जुलै 1993 ला दादरच्या सावरकर स्मारकात बाबुजींची पंचाहत्तरी साजरी झाली. तेव्हा आशाताईंनी खूप छान भाषण केलं. भाषणात त्या म्हणाल्या, “एका माणसाचं लग्न झालं आणि तो आपल्या वधूला घेऊन गावाला जायला निघाला. ती नववधू अवघडून बसोली होती. गाडीत त्यांच्यासोबत एक कोंबडा होता. बरोबर एक बैलसुद्धा होता. वाटेत कोंबडा लागला की ओरडायला. त्याच्या ओरडण्याने त्याला आला राग. त्याने कोंबड्याची मानगुट पकडली आणि जोरात ओरडला, “चिल्लाता है तू? याद रखना! मेरे सामने कभी चिल्लाना नही. इतकं बोलून त्याने कोंबड्याला फेकूनच दिलं. हा सगळा प्रकार पाहणारी त्याची नवपरिणीत बिचारी वधू इतकी घाबरली की, जन्मभर भीती कायम राहिली.”
आशाताई मिश्कीलपणे पुढे म्हणाल्या, “तर असंच एकदा काय झालं, मी एचएमव्हीच्या स्टुडिओत गेले होते. तेव्हाची एचएमव्ही वेगळी होती. घरगुती वातावरण असायचं. तिथे बाजूला एक खोली होती. त्या खोलीत एक गृहस्थ मोठमोठ्याने ओरडत होते. ‘एचएमव्ही आहे की काय आहे?’ त्यांच्या हातात बाजाची पेटी होती. रागात त्यांनी काय करावं? चक्क ती बाजाची पेटी त्यांनी फाडकन फेकून दिली. मी इतकी घाबरले की, तिथून पळूनच गेले. बाहेर विचारलं, ‘कोण हे गृहस्थ?’ तर कळलं की, सुधीर फडकेसाहेब, संगीतकार. अहो एवढा राग त्या माणसाला. गायला बसल्यावर माझी काय परिस्थिती झाली असेल तुम्ही कल्पना करा. आता मी 60 वर्षांची झाले आहे, पण तेव्हा मनात बसलेली भीती अजूनही कायम आहे.”