गुलदस्ता- गुरू भेटशी भला

>> अनिल हर्डीकर

जेव्हा शिष्य तयारीत असतो, तेव्हा गुरू प्रकट होतो. वाट चुकलेल्या शिष्याला त्याक्षणी गुरूची गरज होती आणि खरेच गुरू भेटले. असा क्षण आणि अशी भेट हृषिकेश येथे घडलेली एपीजे अब्दुल कलाम व स्वामी शिवानंद यांची.

एपीजे अब्दुल कलाम आपल्या ‘विंग्ज ऑफ फायर’ या आत्मकथनपर पुस्तकात एका विलक्षण भेटीची आठवण सांगतात. 1958 साल! उमेदीचा काळ होता. अफाट बुद्धिमत्ता होती. जे काही करायचे ते पूर्णपणे झोकून करण्याची वृत्ती होती. त्यांना एका महत्त्वाच्या मुलाखतीला जायचे होते. डी टी डी अँड पी (एअर) मधली मुलाखत चांगली झाली. प्रश्न अगदी नेहमीचे होते. त्यांच्या विषयाचे ज्ञान पारखण्याचे आव्हान त्या प्रश्नांमध्ये मुळीच नव्हते. तिथून पुढे ते डेहराडूनला गेले. तिथे हवाई दलाच्या निवड समितीपुढे त्यांची मुलाखत झाली. त्या ठिकाणी बुद्धिमत्तेपेक्षा, ज्ञानापेक्षा व्यक्तिमत्त्वावर अधिक भर दिला गेला. त्या नोकरीत शारीरिक क्षमता आणि वागण्यातील शिष्टाचार यांना अधिक महत्त्व दिले जायचे. त्यामुळे कलाम उत्तेजित, उत्सुक आणि थोडेसे घाबरलेले होते. मुलाखत चांगली होईल असे वाटत होते तरीही कुठेतरी धाकधूक वाटत होती, ताण होता. पंचवीस उमेदवारांपैकी आठ जणांना निवडणार होते आणि कलामांचा नंबर नववा आला.

ती यादी पाहिल्यावर  कलामांना त्यांच्या हातून हवाई दलात सामील व्हायची संधी गेली असे वाटले. निराश होऊन ते कचेरीच्या बाहेर पडले आणि समोरच्या कडय़ावर जाऊन उभे राहिले. पुढचे दिवस कठीण आहेत असे त्यांच्या मनात आले. आता आपल्या प्रश्नांची उत्तरे आपल्यालाच शोधायला लागणार आणि काय करायचे ते ठरवावे लागणार याची कल्पना त्यांना आली. तिथून पुढे ते हृषिकेशला आले. गंगेच्या पाण्यात उतरून आंघोळीचा आनंद घेतला. तिथून टेकडीवर थोडय़ाच अंतरावर वसलेल्या शिवानंद आश्रमात गेले. आत गेल्यानंतर त्यांना वातावरणात कसल्यातरी जोशपूर्ण लहरी जाणवल्या. तिथे अनेक साधू समाधी अवस्थेत बसलेले होते. साधूपुरुष मानसिकदृष्टय़ा वेगळ्या पातळीवर असतात, तंद्रीत असतात. त्यांना काही गोष्टी अंतर्ज्ञानाने कळू शकतात. कलामांच्या निराश मनाला, त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देऊ शकतील असा कुठेतरी विश्वास वाटत होता.

कलाम तिथे स्वामी शिवानंदाना भेटले. त्यांच्याकडे पाहिल्यावर भगवान बुद्धांची आठवण व्हावी असे त्यांचे रूप होते. पांढरे स्वच्छ धोतर, खडावा घातलेली त्यांची गव्हाळगोरी मूर्ती अन् अंतरंगाचा ठाव घेणारे काळेभोर डोळे. लहान मुलासारखे निर्व्याज हास्य. कलाम भारावल्यासारखे पाहात राहिले. ओळख करून दिली. त्यांच्या मुसलमान नावाचा उल्लेख झाल्यावरही त्यांनी काही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. ते काही बोलणार, तोच त्यांनी कलामांच्या मनात सलणाऱया दुःखाविषयी चौकशी केली. कलामांची निराश मनोवस्था त्यांनी कशी जाणली होती.

मग कलामांनी त्यांना स्वतच्या अयशस्वी मुलाखतीबद्दल सांगितले. भारतीय वायुसेनेत दाखल होऊन आपली खोलवर जोपासलेली आकाशात उडण्याची इच्छा आता अपुरी राहणार हेही बोलून दाखवले. त्यावर ते मंद हसले. त्यांच्या हसण्याने कलामांची निराशा क्षणार्धात दूर झाली.

ते कलामांना म्हणाले, “हृदयापासून, आत्म्यापासून एखादी इच्छा उत्पन्न झाली असेल, ती जर तीव्र आणि पवित्र असेल, तिचा मनाला ध्यास लागला असेल, तर तिच्यामध्ये एक प्रकारची विद्युत चुंबकीय ऊर्जा असते. आपण जेव्हा निद्राधीन होतो, तेव्हा ती आसमंतात फेकली जाते. वैश्विक किरणांनी अधिक बलशाली होऊन ती इच्छा पुन्हा आपल्या जागृत मनामध्ये सकाळी परतते. अशी जर ती वर्धित होत गेली तर ती नक्कीच आपला प्रभाव दाखवेल. युगानयुगांच्या या वचनांवर तू विश्वास ठेव. रोज सकाळी सूर्य उगवतो, ग्रीष्मानंतर वसंत अवतरतो हे जितके अटळ आहे तसे अशी इच्छा पूर्ण होणे हेही अटळ आहे.’’ जेव्हा शिष्य तयारीत असतो, तेव्हा गुरू प्रकट होतो. वाट चुकलेल्या शिष्याला त्याक्षणी गुरूची गरज होती आणि गुरू भेटले.

“नियतीचा स्वीकार कर आणि आयुष्याच्या सोबतीने पुढे जा. हवाई दलात तू वैमानिक होणे हे नियतीला मंजूर नाही. तू नक्की कोण होणार हे नियतीने अजून उघड केलेले नाही. पण ते ठरलेले आहे. अपयश विसरून जा. तुझ्या ठरवलेल्या मार्गावर तुला नेण्यासाठी अपयश यावे असे नियतीनेच योजलेले आहे. तुझ्या अस्तित्वाच्या खऱया हेतूचा तूच शोध घे. अंतर्मनात डोकावून पाहा. त्याच्याशी एकरूप हो. देवाच्या इच्छेच्या स्वाधीन हो.’’ स्वामींनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट कलामांना पटली.

दिल्लीला परतल्यावर तिथल्या मुलाखतीचा निकाल पाहायला कलाम गेले तर त्यांच्या हातात नेमणूक पत्र ठेवण्यात आले. वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी म्हणून 250 रुपयांच्या मूळ पगारावर दुसऱयाच दिवसापासून कलाम रुजू झाले. हीच जर माझी नियती असेल तर ती मी स्वीकारायला हवी असे कलामांनी स्वतला समजावले. मनातला कडवटपणा निचरून गेला.

…नंतर अब्दुल कलाम यांनी काय काय केले ते साऱया जगाला माहीत आहे.

z [email protected]