भटकंती – अॅमस्टरडॅम सिलसिला प्रेमाचा

>>निमिष पाटगावकर

‘देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए…’ हे गाणं जरी मनात गुणगुणलं तरी डोळ्यांसमोर उभे राहतात ते अमिताभ, रेखा आणि नजरेच्या टप्प्यात बसणार नाहीत इतकी विस्तीर्ण आणि तितकीच सुंदर, रंगीबेरंगी ट्युलिप्सची शेतं. काही ठिकाणांची ओळख ही अशी बॉलीवूडमधल्या गाण्यांनी आपल्या मनावर कायमची ठसली आहे. या गाण्याने ट्युलिप्स आणि अॅमस्टरडॅम यांचं नातं असंच पक्कं केलं आहे.

युरोपमधील प्रत्येक मोठ्या शहराला वेगळी ओळख आहे. यातली लंडनसारखी शहरे आपले अंतरंग छान उलगडून दाखवतात, तर पॅरिस, फ्रँकफर्ट, रोमसारखी शहरे डोळ्यांत साठवायची असतात. मातृभाषा डच असली तरी इथले लोक कुणाशीही इंग्रजीत उत्तम संवाद मोकळेपणाने साधतात असा हा देश.

अॅमस्टरडॅमला माझे पाय पहिल्यांदा लागले ते माझ्या पहिल्या परदेश प्रवासाच्या निमित्ताने. मी उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला जाताना माझे विमान मला अॅमस्टरडॅमला बदलायचे होते. 28 वर्षांपूर्वी हिंदुस्थानातून बाहेर जाताना अॅमस्टरडॅमचे स्किफॉल विमानतळ हे जणू एक वेगळी दुनियाच वाटली होती. हा विमानतळच इतका मोहून टाकणारा होता की, अॅमस्टरडॅम शहरात न जाताच त्याच्याबद्दल माझ्या मनात एक आवडीचा कोपरा तयार झाला. या शहरात नंतर कामाच्या निमित्ताने वास्तव्य करायला मिळाले तेव्हा या शहराची खरी ओळख झाली. प्रत्येक भेटीत या शहराने प्रेम वृद्धिंगतच केले. अॅमस्टरडॅम म्हणजे टय़ुलिप्स, पवनचक्क्या आणि चीझ हे समीकरण असले तरी यातली प्रत्येक गोष्ट ही अॅमस्टरडॅमपासून काही अंतरावर होते. अॅमस्टरडॅमपासून काही अंतरावर कुकेनहॉफ म्हणून एक सुंदर उद्यान आहे. दरवर्षी साधारण मार्च ते मे असे दोनच महिने ते उघडे असते. तेव्हा पृथ्वीतलावरचे ते सर्वात सुंदर उद्यान असते. सर्व रंगांची टय़ुलिप्स, डॅफोल्डिल्स आणि तऱ्हेतऱ्हेची फुले इथे रंगांची मुक्त उधळण करत असतात. इथे जाणीवपूर्वक मेहनतीने हे बगिचे तयार केले जातात. तिथे गेल्यावर कळले की, ‘सिलसिला’च्या गाण्यात जी अथांग ट्युलिप्सची शेते दिसतात ती याकुकेनहॉफमध्ये नसून बाजूच्या गावातील खरोखरची शेते आहेत.

हॉलंड हा आपल्या कोल्हापूरसारखा दूधदुभत्याचा प्रदेश. इथे मिळणारे चीज खाल्ले नाही तर खऱ्या खवय्यांच्या आयुष्याचे चीज होणार नाही. तुम्हाला उत्तम चीज कसे बनते हे बघायला आणि इथल्या शेकडो वर्षे जुन्या पवनचक्क्या बघायला अॅमस्टरडॅमच्या बाहेर जावे लागेल. अॅमस्टरडॅमपासून जेमतेम तासाच्या अंतरावर असलेल्या झान्सेस्खन्स अशा उच्चारायला विचित्र गावात तुम्ही गेलात तर तुमचे स्वागत होते ते महाकाय अशा लाकडी पवनचक्क्यांनी. आज यातल्या बहुतांशी बंद आहेत किंवा वीज निर्मितीसाठी नक्कीच वापरत नाहीत, पण या पवनचक्क्या आजही हॉलंडची ओळख आहे. इथेच लाकडी बूट बनवायचा कारखाना आहे. डच लोक पूर्वी शेतात काम करताना हे लाकडी बूट वापरायचे. इतके कडक लाकडी बूट घालून ते शेतकाम कसे करायचे देव जाणे! पण आज या लाकडी बुटांनाही पवनचक्क्यांसारखी हॉलंडची ओळख बनवले आहे. या बुटांवर केलेली कलाकुसर इतकी सुंदर असते की, हे घालून शेतातल्या चिखलात पाय ठेवायला कुणी धजावणार नाही. अर्थात शेतात काम करायचे बूट हे इतके कलाकुसर केलेले नसतात, तर निव्वळ एकरंगी असतात. इथूनच पुढे
फॉलनडॅमला चीज फॅक्टरीज आहेत. इथले गौडा प्रकारचे चीज जगप्रसिद्ध आहे. त्या चीजचे आपल्या दिवाळीत वापरायच्या मोती साबणाच्या आकाराचे गोळे तुम्हाला
हॉलंडच्या कुठच्याही भागात दुकानात विकायला ठेवलेले दिसतील. यांना वरून मेणाचे आवरण दिले असल्याने ते दीर्घकाळ टिकतात.

अॅमस्टरडॅमच्या आसपासचीही ठिकाणे सुंदर आहेत, पण खुद्द अॅमस्टरडॅमही नितांत सुंदर आहे. हे कालव्यांचे शहर असल्याने छोटय़ा छोटय़ा बोटींनी या कालव्यातून फिरताना शहराचे सौंदर्य न्याहाळत फिरण्यासारखा दुसरा आनंद नाही. इथला प्रसिद्ध डॅम स्क्वेअर, त्याच्यामागे असलेला पॅलेस हे युरोपियन शैली दाखवते, तर त्याच्याच समोर अद्ययावत मॉल्स आहेत. या डॅम स्क्वेअरमध्ये उन्हाळ्यात अनेक स्ट्रीट परफॉर्मर आपली कला दाखवत असतात. साधारण मार्चमध्ये वसंत ऋतूचे आगमन झाले की, हिवाळ्यात गारठलेले अॅमस्टरडॅम मोकळे होऊन हातपाय पसरू लागते आणि जसजसा उन्हाळा येतो तसतसे ते पर्यटकांनी फुलून जाते. या अॅमस्टरडॅमची अजून एक ओळख म्हणजे इथे जगातील प्रसिद्ध रेड लाइट डिस्ट्रिक्ट आहे. इथे अनेक क्लब्ज आहेत, जिथे फक्त प्रौढांसाठीच शो असतात. इथला वेश्या व्यवसाय हा अधिकृत आहे. म्हणजे हा व्यवसाय करणाऱ्यांना सरकारचे परमिट असते आणि त्या व्यवस्थित आयकर भरतात. आपल्या संस्कारांमुळे अशा ठिकाणी फिरताना उगीच चोरट्यासारखे फिरणे होते, पण जगभरचे पर्यटक इथे मुक्तपणे लहान मुलांसकट फिरत असतात.

सकाळचे अॅमस्टरडॅम हे एखाद्या मोठ्या गजबजलेल्या शहरासारखे असते. उन्हाळ्यात सगळे आपले कामकाज पाचच्या ठोक्याला आवरतात आणि सर्व शहर उत्साहाने फुलून जाते. जसे सकाळ आणि संध्याकाळचे अॅमस्टरडॅम वेगळे तसेच रात्रीचे अंतरंग या शहराचे नाईट लाईफचे अंतरंग सजवतात. इथे फिरणाऱ्या ट्रम, बस शहराच्या एका भागातून दुसरीकडे अगदी सहज पोहोचवायला तयार आहेत. त्यामुळे शहराचे वेगवेगळ्या प्रहराचे वेगवेगळ्या भागातले रंग बघताना पुन्हा ‘सिलसिला’ आठवतो आणि आपण गुणगुणू लागतो…ये कहाँ आ गये हम…यूं ही साथ चलते चलते…अॅमस्टरडॅम हे नुसतेच ‘सिलसिला’ चित्रपटाचे शहर नाही, तर एकदा इथे आलात तर या शहराशी प्रेमाचा ‘सिलसिला’ कायमचा होऊन जातो.
>> [email protected]