लेख – अमेरिकेचे ‘टेरिफ’ अस्त्र आणि भारत

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन, [email protected]

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयांमुळे जगातल्या अर्थव्यवस्थांमध्ये उलथापालथी होत आहेत. आयात कर किंवाटेरिफहे असेच एक अस्त्र ट्रम्प यांनी जगावर डागले आहे. त्यामागे अमेरिकेच्या फायद्याचा हेतू असला तरी त्याचे परिणाम जगावर होणार आहेत. भारतही त्यात आलाच. म्हटले तर हे टेरिफ अस्त्र भारतासाठी संधीही ठरू शकते. प्रश्न त्याचा फायदा आपण कसा घेतो एवढाच आहे.

अमेरिकेला आयात कर किंवा टेरिफचा वापर करून दोन मोठ्या बाबी साध्य करायच्या आहेत. एक त्यांच्या आणि इतर राष्ट्रांमध्ये असलेल्या व्यापाराची तूट कमी करणे आणि दुसरी अमेरिकेमध्ये होणारी बेकायदेशीर घुसखोरी थांबविणे. या दोन्हीमध्ये अमेरिकेला गेल्या काही दिवसांतच बऱ्यापैकी यश मिळालेले आहे.

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोसह इतर सर्व राष्ट्रांतून होणाऱ्या पोलाद आणि ऍल्युमिनियमच्या आयातीवर 25 टक्के शुल्क लावले आहे. ट्रम्प यांनी चीन तसेच मेक्सिको आणि कॅनडा या दोन देशांवर भरमसाट आयात कर लावण्याची घोषणा केली. आदेशानुसार चिनी मालावर 10 टक्के आणि मेक्सिको-कॅनडातील आयातीवर 25 टक्के कर लावण्यात येणार आहे. कॅनडातून येणारे तेल, नैसर्गिक वायू आणि विजेचा अपवाद करत त्यावर 10 टक्के आयात कर असेल.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्याशी चर्चा केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी  कॅनेडियन वस्तूंवरील प्रस्तावित कर 30 दिवसांसाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला . कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांनी घोषणा केली की, त्यांनी सीमा सुरक्षेवर अतिरिक्त सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. मेक्सिकोच्या अध्यक्षा क्लॉडिया शीनबॉम यांनीदेखील घोषणा केली की, अमेरिकेच्या अध्यक्षांनी मेक्सिकन आयातीवरील 25 टक्के कर एका महिन्यासाठी थांबविण्यास सहमती दर्शविली आहे. कारण देशाने ट्रम्प यांच्या इमिग्रेशन आणि ड्रग्ज तस्करीवर कारवाई करण्याच्या मागणीला प्रतिसाद म्हणून सीमा अंमलबजावणी प्रयत्नांना बळकटी देण्याचे आश्वासन दिले आहे. थोडक्यात, मेक्सिको आणि कॅनडा या दोन देशांवर भरमसाट आयात कर लावण्याची धमकी देऊन  डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिको आणि कॅनडाला वठणीवर आणले आणि दोन्ही देशांनी त्यांच्या सीमेमधून अमेरिकेमध्ये होणारी घुसखोरी पूर्णपणे थांबविण्याकरिता मोठ्या प्रमाणात सैन्याची तैनाती केली. म्हणजेच डोनाल्ड ट्रम्प यांची चाल अत्यंत यशस्वी झाली आहे.

सध्या तरी ट्रम्प चीनविरोधात व्यापार युद्धाकरिता तयार नाहीत. 2023 मध्ये अमेरिका व चीन यांचा व्यापार हा 575 बिलियन डॉलर्स एवढा वाढला. त्यात अमेरिकेने 147 बिलियन डॉलर्सची चीनला निर्यात केली; तर चीनकडून 427 बिलियन डॉलर्स किंमतीच्या वस्तू आयात केल्या. व्यापारातील तूट भरून काढणे हे अमेरिकेचे नजीकच्या काळातील सर्वात मोठे उद्दिष्ट राहील. मात्र चीन त्याकरिता तयार दिसत नाही. सध्या चीनच्या बाबतीत अमेरिकेने मवाळ धोरण स्वीकारले आहे. कारण ते चीनबरोबर पूर्ण व्यापार युद्धाकरिता तयार नसावेत, पण हे युद्ध होईल याविषयी कोणाच्याही मनात शंका नको. कारण चीन आणि अमेरिकेमधील व्यापाराची तूट प्रचंड आहे आणि ती कमी करणे डोनाल्ड ट्रम्प यांच्याकरिता अत्यंत महत्त्वाचे आहे. भारताने या संधीचा फायदा घ्यावा आणि ज्या वस्तू चीन आज अमेरिकेला निर्यात करत आहे, त्या भारतात ‘मेक इन इंडिया’खाली तयार करून चीनची जागा घ्यावी. अर्थात हे आव्हान पेलण्याकरिता प्रचंड प्रयत्न करावे लागतील. भारत या दोन्ही महासत्तांच्या आपापसातील तणावाचा फायदा घेत आपल्याला व्यापारविषयक सवलती कशा प्रकारे प्राप्त करून घेता येतील यासाठी प्रयत्नशील आहे.

ट्रम्प यांनी ‘ब्रिक्स’ देशांवर वाढीव करबोजा लादण्याचा इशारा दिला असला तरी त्यामधून भारताला वगळण्यात आले आहे. यामागे कारण आहे. भारताबरोबर असलेली अमेरिकेची व्यापारी तूट तीन देशांच्या तुलनेत कितीतरी कमी आहे. चीन, मेक्सिको आणि कॅनडाची व्यापारी तूट अनुक्रमे 30 टक्के, 19 टक्के आणि 14.5 टक्के असताना भारताबरोबरची अमेरिकेची व्यापारी तूट मात्र केवळ 3.2 टक्के आहे.

भारताचं बजेट सादर झालं. त्यात मोटरसायकलवरचा आयात कर कमी करण्यात आला. जड वजनाच्या 1600 सीसीपेक्षा कमी इंजिन क्षमता असणाऱ्या मोटरसायकलवरील कर 50 टक्क्यांवरून 40 टक्क्यांवर आणला गेला. 1600 सीसीपेक्षा जास्त क्षमतेच्या बाईकसाठी आणखी जास्त कपात करण्यात आली. या मोटरसायकलमागचा आयात कर 50 टक्क्यांवरून 30 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला. या निर्णयाचा फायदा हार्ले डेव्हिडसन या अमेरिकन मोटरसायकलला होणार आहे. या मोटरसायकलची 30 लाख डॉलर किमतीची आयात मागच्या वर्षी भारताने केली होती.  2023 मध्ये दोन्ही देशांमध्ये 19 हजार कोटी डॉलर्सपेक्षाही जास्त किमतीचा व्यापार झाला. भारताकडून अमेरिकेत निर्यात केल्या जाणाऱ्या विक्री मालात 2018 पासून 12.3 हजार कोटी डॉलर्सपर्यंत म्हणजे 40 टक्क्यांनी वाढ झाली, तर निर्यात केल्या जाणाऱ्या सेवा 22 टक्के वाढीने 6.6 हजार कोटी डॉलर्सपर्यंत जाऊन पोहोचल्या आहेत. याउलट अमेरिकेकडून भारतात एकूण 7 हजार कोटी डॉलर्सची निर्यात झाली आहे.

मोटरसायकल सोडता भारतानं उपग्रह बनविण्याच्या उपकरणांवरचा आयात करही अगदी शून्यावर आणला आहे. भारताने अमेरिकेच्या इतरही उत्पादनांवरचा आयात कर लक्षणीयरीत्या कमी केला आहे. ट्रम्प यांनी टीका केल्यानंतर भारत आपलं आयात कर धोरण बदलून संकटाचे संधीमध्ये रूपांतर करत आहे. त्यामुळे अमेरिकेची वेगवेगळ्या क्षेत्रांतली निर्यात येत्या काळात वाढू शकते. 2023 मध्ये भारताने बदाम, सफरचंद, हरभरा, डाळी आणि अक्रोड अशा अमेरिकेतील काही कृषी उत्पादनांवरील कर कमी केला.

बेकायदेशीरपणे अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांना परत देशात घेण्याची तयारी भारताने दाखविल्यानेही भारताकडून एक सकारात्मक संदेश गेला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या वागणुकीमुळे जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये प्रचंड उलथापालथ होत आहे. मात्र भारताने अशा प्रकारच्या उलथापालथीला तोंड देण्याकरिता तयारी केली आहे. केंद्रीय बजेटमध्ये आपल्या अर्थमंत्र्यांनी इन्कम टॅक्सची लिमिट वाढवून जास्त पैसा करदात्यांच्या हातात खर्चाकरिता ठेवला आहे. याशिवाय वेगवेगळ्य़ा आयात कर कमी करून आपण अमेरिकेशी व्यापार करण्याकरिता तयार आहोत, असा संदेश भारताने दिला आहे.