चैतन्य सोहळा – अक्षय सुखाची पाणपोई

>> डॉ. सुनीलकुमार सरनाईक

माणसाचं दैनंदिन जीवन हे अनेक घटनांनी, अनुभवांनी भरलेलं असतं. प्रत्येक दिवस हा वेगळा अनुभव, हुरहुर घेऊन येत असतो. असं असलं तरी प्रत्येक जण सुखाच्या, आनंदाच्या प्रतीक्षेत असतोच. वर्षभरात ठरावीक काळानंतर येणाऱ्या सणासुदीच्या दिवसांमध्ये हे सुख, हा आनंद तो मनमुराद मिळवत असतो. हे सणासुदीचे दिवस प्रत्येकासाठी ‘सुखाचा सोहळा’ होऊन अवतरतात. यातच मानवी आयुष्याचं आणि जगण्याचं गुपित दडलेलं आहे. आयुष्य जगण्याच्या या अविरत धडपडीतूनच आपले सण आणि संस्कृती साकारली आहे.

चैत्र महिन्याची चाहूल लागली की, निसर्गात नवनिर्मितीचे पडघम वाजू लागतात. वृक्षांना नवीन पालवी फुटायला सुरुवात होते. भूमातेच्या उदरातून नवसृजनाचे कोंब अलगद वर येऊ लागतात. असीम इच्छाशक्ती आणि दुर्दम्य आशावाद घेऊन जन्माला आलेली ही निसर्गाची संपदा पाहून मन प्रसन्न होते. निसर्गाच्या संगतीने ही वृक्षसंपदा स्थिरावते आणि शिशिराच्या कडाक्याच्या थंडीत पानगळीचे निमित्त करून पुन्हा अनंताच्या प्रवासाला निघून जाते. हा काळ अतिशय संवेदनशील मनाचा ठाव घेणारा असतो. क्षितिज कधीच जमिनीवर पाय टेकवत नाही, ते कधीच हाती येणार नाही हे माहीत असूनही त्यामागे धावण्याचा जबर अट्टहास असतो. या जीवनातली प्रत्येक गोष्ट शाश्वत आहे, अक्षय आहे या बेफिकिरीने व गैरसमजाने प्रत्येकजण अदृश्याची वाट चालत असतो. आपल्याला जणू सुखाचे अक्षय वरदान लाभले आहे या जाणिवेतून तो आपले आयुष्य जगत असतो. त्याच्या या जाणिवेला समृद्ध करत असतात ते आपले वर्षभरात वाजतगाजत येणारे सणासुदीचे दिवस.

हे सण, उत्सव आपल्या जीवनात आनंदाचे अक्षयधन उधळण्यासाठीच येत असतात. निमित्त कोणतेही असो, या सणांचे, उत्सवांचे मानवी जिवाला मोठे औत्सुक्य असते. वसंताच्या उल्हासी वातावरणात ‘अक्षय्य तृतीये’चा सण येतो. प्रत्येकाच्या सुखेनैव आयुष्याला फुलवण्याचे काम तो करतो. चैत्रात वृक्षवेलींना फुटणारी हिरवीगार पालवी आणि आम्रवृक्षाला आलेला मोहोर यांच्या साक्षीने हा अक्षय्य तृतीयेचा सण येतो. साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक सण. वैशाखातील वणव्याला सामोरा जाणारा, उन्हाळ्याची तप्त होरपळ अनुभवायला देणारा हा सण सर्वत्र साजरा केला जातो. ग्रीष्माची तप्त काहिली सोसण्याची ऊर्मी देणारा हा सण आहे.

पाण्याला ‘जीवन’ असे म्हणतात. या सणांचे वैशिष्टय़ म्हणजे या दिवशी ‘वाहते जीवन’ अर्थात पाण्याचे दान (जलदान) करण्याचा प्रघात आहे. निसर्गामध्ये पृथ्वी (भूमी), तेज (प्रकाश), वायू (वारा), आकाश (अवकाश) आणि अर्थातच आप (पाणी) ही पंचमहाभूते आहेत. ही पंचमहाभूते आपले सर्वस्व जणू या निसर्गतत्त्वावर उधळून देतात.

मानवी जीवनात पाण्याचे महत्त्व मौलिक व अग्रेसर आहे. कारण नदीनाले, कालवे यांतून खळाखळा वाहणारे पाणी बघून आपले मन नेहमीच उल्हसित होते. जिथून हे ‘जीवन’ वाहत जाते, तिथला व त्याच्या आजूबाजूचा प्रदेश आपोआपच सुपीक, सुजलाम अन् सुफलाम होतो. त्यावर चराचर सृष्टी पोसते, बहरते आणि वृद्धिंगत होते. अशा या जीवनतत्त्वांचा गौरव अक्षय्य तृतीयेला केला जातो.

अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने सर्वत्र पाण्याने आटोकाट भरलेले रांजण ठेवण्याची प्रथा पूर्वापार चालत आलेली आहे. येणारे-जाणारे पांथस्थ, मुकी जनावरे, जीवजंतू यांची तहान भागावी हा त्यामागे शुद्ध हेतू असतो. त्यानिमित्ताने तहानलेल्या जिवाला ‘जीवन’ देण्याचे पुण्य पदरी पाडून घेण्याची मनीषा असते. जलदान हे शाश्वत ‘दान’ आहे असे पुराणात म्हटले गेले आहे व याचा दाखलाही दिला जातो. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी अनेक ठिकाणी पाणपोया बांधून त्या लोकार्पण करण्याचे शाश्वत सुख समाजातली धनवंत मंडळी पूर्वापार घेत आली आहेत. याच कालावधीत नैसर्गिक पाण्याचा साठा कमी कमी होत जातो हेही कारण कदाचित या जलदानामागे असावे.

‘अक्षय्य तृतीया’ हा अक्षय सुखाची साठवण करून देणारा सण समजला जातो. मानवी जीवन हे क्षणभंगुर आहे, ते अशाश्वतही आहे हे खरे असले तरी त्यापासून मिळणारे सुख हे शाश्वत असावे असे प्रत्येकाला वाटत असते. या वेडय़ा ध्यासापायीच मानवी जीवनात सणासुदीची निर्मिती केली गेली आहे. या सणासुदीच्या काळात आपल्याला आनंद तर मिळत असतोच, शिवाय जीवन जगण्यासाठी ऊर्मी आणि उभारी प्राप्त होत असते. हा आनंद, ही ऊर्मी आणि ही उभारी सांघिक प्रयत्नांतून मिळत असते. एकटय़ाने सण, उत्सव साजरा करतो म्हटले तर ते अशक्य असते. त्यामध्ये अनेकांचा वाटा असतो, अनेकांनी हातभार लावलेला असतो. त्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा उत्सव म्हणजे अक्षय्य तृतीया! या दिवशी गोरगरीबांना घरी बोलवावे, त्यांना गोडधोड खायला द्यावे. आपल्या ऐपतीनुसार गरजवंतांची निकड भागवावी, त्यांना वस्त्र, द्रव्य देऊन संतुष्ट करावे, अनाथ व गरीब विद्यार्थ्यांना कपडेलत्ते आणि शिक्षणाला मदत करावी, शिक्षणसंस्था, अनाथाश्रम यांना आर्थिक सहाय्य करावे, सवाष्ण स्त्रियांना सौभाग्याचे वाण द्यावे, कुमारिकांना साडीचोळी देऊन संतुष्ट करावे, बालकांना  पुस्तके, खेळणी द्यावीत व त्यांचे कौतुक करावे. आपल्या ऐपतीप्रमाणे सर्वांना आनंद व समाधान द्यावे आणि त्यातून शाश्वत सुखाची प्राप्ती करून घ्यावी असे सांगणारा हा सण आहे.

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी केली जावी असे म्हणतात, पण अशा प्रकारचा संदर्भ कुठेही सापडत नाही. मात्र अक्षय्य तृतीयेच्या आसपास विवाह मुहूर्त असतात, त्यांच्या योगाने ही सुवर्णखरेदी केली जात असावी. सोने खरेदी ही महागडी बाब म्हणूनच ती सर्रास आणि वारंवार केली जात नाही. मात्र मंगलकार्यासाठी केली जाणारी सुवर्णखरेदी याच अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर केली तर अधिकच उत्तम. शिवाय साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त साधला जातो याचे सात्त्विक समाधानही मिळते असा या सोने खरेदीसाठीचा हेतू असावा. अक्षय तृतीयेचा मुहूर्त हा तसा महत्त्वाचाच. कारण अक्षय्य तृतीया झाल्यावर पुढल्या मुहूर्तासाठी थेट दसरा, दिवाळी पाडव्यापर्यंत वाट पहावी लागते. वर्ष प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा, विजयादशमी अर्थात दसरा व दिवाळी पाडवा या पूर्ण मुहूर्तांनंतर पूर्वसुरींनी अर्ध्या मुहूर्तांची सोय याकरिताच ठेवली असावी असे वाटते.

जगण्याचा संघर्ष करीत आयुष्य कधी खर्च झाले हे आपल्या लक्षातही येत नाही. शेवटी आपल्या हाती काहीच उरत नाही याची प्रचीती येते तेव्हा सुखाचा सोहळा घडवून आणण्याखेरीज दुसरे आपण काय करू शकतो? असा प्रश्न उपस्थित होतो. संत तुकोबाराय म्हणतात, ‘याचसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिवस गोड व्हावा’ तुकोबारायांसही आपले जीवन क्षणभंगुर असल्याचे ठाऊक होते. मात्र त्या अल्पशा जीवनातही त्यांनी ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ अनुभवला. त्यांनी स्वत हा निर्व्याज आनंद लुटला व इतरांनाही तो लुटण्याची प्रेरणा दिली.

आपल्या जीवनात ज्यांनी आपल्याला मदत केली, त्या केलेल्या उपकाराचे स्मरण ठेवणे, भ्रामक गोष्टीच्या मायाजालात गुंतून न राहता चिरंतन गोष्टींचा ध्यास घेणे, सुखाचा शाश्वत आनंद लुटणे. दुःख, दारिद्य्र, चिंता, क्लेश यांना मनातून हाकलून देणे. कपटातून, परपीडा यातून मिळणाऱ्या क्षणभंगुर आनंदाचा त्याग करणे, आपल्या आनंदात इतरांनाही सहभागी करून घेणे हेच खऱ्या अर्थाने ‘शाश्वत’ आहे. म्हणूनच ते ‘अक्षय’ही आहे आणि ते ‘अक्षय’ आहे म्हणूनच तुम्हाआम्हा सर्वांनाच त्याचे स्मरण व्हावे हे अक्षय्य तृतीयेच्या सणामागचे खरे औचित्य आहे. हे ज्याला समजेल त्याला सुखाचे आणि समाधानाचे ‘अक्षय’ धन सापडेल. शेवटी आपल्या संपूर्ण आयुष्यात समाधान असेल तरच खऱ्या अर्थाने जीवन सार्थकी लागले असे वाटते. हे वाटणेच मनाला आणि चित्ताला शांती देणारे असते याची प्रचीती आणून देणारा अक्षय्य तृतीयेचा सण म्हणजे सुख, समाधान, समृद्धी प्राप्त करून देणारी पाणपोईच आहे.

[email protected]

(लेखक मानसशास्त्र व लोककलेचे अभ्यासक आहेत.)