
हिंदुस्थानच्या वैद्यकीय क्षेत्रात एक नवी क्रांती घडणार असून लवकरच देशात eVTOL एअर अॅम्ब्युलन्सची सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. आयआयटी मद्रासच्या एका स्टार्टअपला या तंत्रज्ञानासाठी एक अब्ज डॉलर्सचा (8300 कोटी रुपये) निधी मिळाला आहे. eVTOL हे तंत्रज्ञान अत्यंत अनोखे आहे. eVTOL म्हणजे Electric Vertical Take-Off and Landing एअरक्राफ्ट. हे एअरक्राफ्ट विजेवर चालते आणि धावपट्टीशिवाय थेट अवकाशात सरळ उड्डाण करू शकते. विजेवर चालत असल्याने हे तंत्रज्ञान पर्यावरणासाठीदेखील पूरक आहे.
अत्यंत वेगवान आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या या तंत्रज्ञानावर आधारलेली सेवा देशात पहिल्यांदाच सुरू होत आहे. या प्रकारची सेवा ही मुख्यत्वे आपत्कालीन परिस्थिती आणि दुर्गम भागातील अत्यवस्थ रुग्णांपर्यत त्वरेने पोहोचण्यासाठी प्रामुख्याने विकसित केली जात आहे. जगात सध्या काही देशांत हे eVTOL तंत्रज्ञान वापरले जात आहे. होंडा कंपनीचे eVTOL तंत्रज्ञान हे वेग आणि सुरक्षेसाठी ओळखले जाते आणि ते लांब अंतर कापण्यास सक्षम आहे. AIR पंपनीने त्यांच्या eVTOL तंत्रज्ञानाची बांधणी एखाद्या कारप्रमाणे केली आहे. ‘वैयक्तिक उडती कार’ असे तिचे बरेचदा गमतीने वर्णन केले जाते, तर युनायटेड एअरलाईन्सचे eVTOL तंत्रज्ञान हे बॅटरीवर आधारित असून एअर टॅक्सीप्रमाणे वापरासाठी त्याची बांधणी करण्यात आलेली आहे.
eVTOL तंत्रज्ञानाकडे भविष्याचे तंत्रज्ञान म्हणून बघितले जाते. पारंपरिक हेलिकॉप्टरपेक्षा जास्त पर्यावरणपूरक आणि कमी आवाज करणारे हे तंत्रज्ञान शहरी भागातील वाहतूक कोंडीवर एक प्रभावी उपाय ठरणार आहे. वाहतूक, शहराच्या अंतर्गत भागात तसेच दोन शहरांमध्ये वेगवान व सुरक्षित प्रवासासाठी तसेच सामानाची ने-आण करणे, लॉजिस्टिकच्या इतर क्षेत्रांत उपयोगात आणणे अशासाठीदेखील त्याचा उपयोग होऊ शकतो. सैन्याला रसद पुरवण्याचा पर्यायदेखील या तंत्रज्ञानाने उपलब्ध होणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दुर्गम क्षेत्रात आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी होणारा या तंत्रज्ञानाचा उपयोग फार महत्त्वाचा ठरणार आहे.
स्पायडरमॅन