लेख – शालेय शिक्षणात ‘एआय’ – चीन आणि भारत

चीनने शालेय शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत एआयचा समावेश केला आहे. त्याचबरोबर एआय संशोधनासाठी मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक केली आहे. चीनच्या या रणनीतीतून भारताने काही महत्त्वाचे धडे घेतले पाहिजेत.भारतानेही एआयच्या क्षेत्रात चीनप्रमाणेच पावले उचलणे आवश्यक आहे. भारतानेही शालेय स्तरापासूनच एआयचे शिक्षण सुरू केले पाहिजे. त्यामुळे मुलांना लहान वयातच एआयची ओळख होईल आणि ते भविष्यात या क्षेत्रात करीअर करू शकतील.

चीनने कृत्रिम बुद्धिमत्तेचा (Artificial Intelligence) वापर करून महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहिले आहे. त्यासाठी त्यांनी शालेय स्तरापासूनच मुलांना एआयचे शिक्षण देणे सुरू केले आहे. बीजिंगमधील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये एआयचे शिक्षण अनिवार्य करण्यात आले आहे. याचा उद्देश विद्यार्थ्यांना सध्याच्या तसेच भविष्य काळातील अत्यावश्यक तंत्रज्ञान कौशल्यांनी सुसज्ज करणे आहे. 1 सप्टेंबरपासून सुरू होणाऱया शैक्षणिक सत्रापासून विद्यार्थ्यांना प्रत्येक शैक्षणिक वर्षात किमान आठ तास कृत्रिम बुद्धिमत्ता शिक्षण मिळेल. सहा वर्षांचे विद्यार्थी चॅटबॉट्स वापरण्यास, मूलभूत कृत्रिम बुद्धिमत्ता संकल्पना शिकतील.

उच्च माध्यमिक वर्गात ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’बाबच्या नवीन कल्पनांवर भर असेल. शाळा, विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानासारख्या विद्यमान विषयांमध्ये एआय शिक्षणाचा समावेश करू शकतात किंवा ते स्वतंत्र अभ्यासक्रम म्हणून देऊ शकतात.

चीनच्या शिक्षण मंत्रालयाने देशभरातील 184 शाळांची निवड केली. चीनचे शिक्षणमंत्री हुई जिनपेंग एआय देशाच्या शिक्षण व्यवस्थेसाठी ‘गोल्डन की’ असल्याचे सांगतात. सुरुवातीच्या टप्प्यात शिक्षण सुरू केल्याने तांत्रिक क्षेत्रातील नवनव्या कल्पनांमध्ये यामुळे योगदान मिळेल. बीजिंगचा दृष्टिकोन हांगझोऊमधील झेजियांग विद्यापीठाच्या यशाने प्रेरित आहे, ज्याने डीप सीकचे लियांग वेनफेंग आणि युनिट्रीचे वांग झिंगझिंगसारखे तंत्रज्ञ निर्माण केले.

चीन सरकारने घेतलेला निर्णय एआय शिक्षणातील जागतिक कल दाखवत आहे. कॅलिफोर्नियाने शालेय अभ्यासक्रमात एआय साक्षरतेचा समावेश करण्यासाठी कायदे केले आहेत आणि इटली डिजिटल कौशल्ये वाढविण्यासाठी वर्गात एआय साधनांचा प्रयोग करत आहे. जगभरातील देश एआय शिक्षणाचे महत्त्व ओळखत आहेत आणि ते त्यांच्या शैक्षणिक चौकटीत घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. एस्टोनियाच्या सरकारने अलीकडेच माध्यमिक शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी चॅट जीपीटी एज्यु. सादर करण्यासाठी ओपन एआयशी भागीदारी केली आहे.

कॅनडा, दक्षिण कोरिया आणि ब्रिटननेदेखील के-12 शिक्षणात एआयचा समावेश केला आहे. काही संस्था एआय संचालित पाठय़पुस्तके वापरतात, तर यूकेमधील एका खासगी शाळेने ‘शिक्षकविरहित’ वर्गखोली सुरू केली आहे. तेथे विद्यार्थी शिकण्यासाठी ‘व्हर्च्युअल रिऍलिटी हेडसेट’ आणि एआयवर अवलंबून असतात.

तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अनेक क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल होत आहेत. घरगुती रोबोट्सचा उदय ही एक नवीन क्रांती ठरली आहे. यंदाच्या लास वेगास कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शोमध्ये (CES 2025) घरगुती रोबोट्स हे प्रमुख आकर्षण ठरले. हे रोबोट्स केवळ घरातील कामे उरकण्यासाठी नाहीत, तर संवाद साधण्याची क्षमता असलेले बुद्धिमान सहाय्यक म्हणून विकसित करण्यात आले आहेत. अंगणातील गवत कापणे, जमीन स्वच्छ करणे, किचनमध्ये मदत करणे, मुलांबरोबर संवाद साधणे, अगदी बारटेंडरिंगसारख्या सेवा देण्यापर्यंत त्यांची क्षमता विस्तारली आहे. ही घरोघरी पोहोचणारी नवी यंत्रमानव क्रांती सुरू झाली आहे का?

कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञान जितके प्रगत, सक्षम, तितके ते खर्चिक असे समीकरण होते. याच गृहितकावर अमेरिकेतील ‘एआय’ कंपन्यांनी कोटय़वधी डॉलर गुंतवून ‘मॉडेल’ तयार केले. असे असताना ‘डीपसीक’ची अत्याधुनिक आवृत्ती केवळ 60 लाख डॉलरमध्ये चीनमध्ये झाली, तीही अमेरिकेकडून आयात केलेल्या दुय्यम दर्जाच्या चिपचा वापर करून.

भारतसुद्धा चॅटबॉट (‘चॅटजीपीटी’) या क्षेत्रात संशोधन करत आहे. असे सांगण्यात आले आहे की, पुढच्या सहा महिन्यांमध्ये भारतीय चॅटबॉट हा जनतेच्या वापराकरिता तयार केला जाईल. हे लवकर केले जावे, खास तर भारतीय भाषा म्हणजे मराठी आणि इतर भाषा यांमध्ये चॅटबॉटसारख्या सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे चॅटबॉटची (चॅटजीपीटी) क्रांती भारतात खोलवर रुजेल.

चीनने एआयच्या विकासासाठी एक स्पष्ट धोरण आखले आहे. त्यांनी शालेय शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत एआयचा समावेश केला आहे. त्याचबरोबर एआय संशोधनासाठी मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक केली आहे. चीनच्या या रणनीतीतून भारताने काही महत्त्वाचे धडे घेतले पाहिजेत.भारतानेही एआयच्या क्षेत्रात चीनप्रमाणेच पावले उचलणे आवश्यक आहे. भारतानेही शालेय स्तरापासूनच एआयचे शिक्षण सुरू केले पाहिजे. त्यामुळे मुलांना लहान वयातच एआयची ओळख होईल आणि ते भविष्यात या क्षेत्रात करीअर करू शकतील.

भारतातील विद्यापीठांमध्ये एआय संशोधनावर भर दिला पाहिजे. यासाठी सरकारने आणि खासगी संस्थांनी एकत्र येऊन संशोधन केंद्रे स्थापन केली पाहिजेत. एआयच्या विकासासाठी आवश्यक असणाऱया पायाभूत सुविधा, जसे की उच्च-कार्यक्षम संगणक आणि डेटा सेंटर्स यांची उभारणी करणे आवश्यक आहे. भारतात एआय तज्ञांची कमतरता आहे. त्यामुळे एआयचे शिक्षण देणाऱया संस्थांची संख्या वाढवणे आणि एआय प्रशिक्षणावर भर देणे आवश्यक आहे. एआयचा वापर करताना त्याचे नैतिक पैलू लक्षात घेणे आवश्यक आहे. एआयचा वापर मानवाच्या कल्याणासाठी व्हावा यासाठी योग्य नियम आणि कायदे बनवणे आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता हे भविष्यातील एक महत्त्वाचे तंत्रज्ञान आहे. या क्षेत्रात आघाडीवर राहण्यासाठी भारताने चीनप्रमाणेच ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. सरकारने, शिक्षण संस्थांनी आणि खासगी क्षेत्रांनी एकत्र येऊन काम केल्यास भारत एआयच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करू शकेल. भारताने जगातील सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञानाच्या प्रगतीवर लक्ष ठेवून ते तंत्रज्ञान भारतामध्येसुद्धा बनवावे. त्यामुळे आपण जगाच्या आणि चीनच्या तंत्रज्ञानाच्या बाबतीत एक पाऊल पुढे राहू शकू.