विज्ञान-रंजन – दिसे मनोहर तरी!

>> विनायक

‘केल्याने देशाटन पंडित मैत्री, सभेत संचार’ असं एक जुनं सुभाषित. विद्वज्जन प्रत्येक पर्यटनात भेटतील आणि चर्चा घडतीलच असं नाही. पर्यटन अनेकदा, माणसांपलीकडच्या जगात डोकावण्याची संधी देतं एवढं मात्र निश्चित. खूप वर्षांपूर्वी अबू पहाडावर निघालो होतो. पौर्णिमेची रात्र. घाटात बस गोलाकार वळणे घेत असताना खालची दरी रुप्याच्या रसाने भरून गेलेल्या मोठ्या वाडग्यासारखी दिसत होती. राजस्थानात आपल्या महाराष्ट्रासारखी विपुल वनसंपदा नाही, परंतु दरीमधली झाडंझुडपं, त्यातून डोकावणारी बैठी कौलारू घरं आणि अंगणाअंगणात होळी पौर्णिमेच्या सणाचा उत्सव. त्यात थंडीत होळीच्या ‘शेकोटी’पाशी गोळा झालेली मंडळी आणि वरून चांदण्याची शीतल बरसात. ते दृश्य उंच डोंगरकपारीतून न्याहाळताना जसं दिसलं तसंच आताही नजरेसमोर तरळलं.

अगदी मुंबईसारख्या शहरातही शोधला तर भरपूर ‘निसर्ग’ सापडतो. आमच्या लहानपणी राजावाडी आणि आसपास तर वृक्षवेलीचं सोयरेपण भरपूर अनुभवायला मिळालं. त्यातच घरासमोर बहरलेला मळा, त्यापलीकडे खडखडत वाहणाऱ्या देशातल्या पहिल्या रेल्वेमार्गावरच्या ट्रेन आणि त्या दोहोमध्ये एक स्वच्छ पाण्याचा ओहोळ. आता ते सगळे कालौघात ओसरलंय, पण त्या रम्य स्मृती कायम आहेत.

हिंदुस्थानभर दोन वेळा, मुख्यत्वे ट्रेनने फिरताना खूप प्रदेश आणि तिथला बदलता निसर्ग पाहायला मिळाला. दक्षिणेकडच्या प्रवासाने पश्चिम घाट, उत्तरेकडच्या प्रवासाने हिमालय, पश्चिम दिशेचं थरचं वाळवंट आणि पूर्वेला बंगालमधलं सुंदरबन. आपल्याकडे वन्य जीव आणि वनसंपदा प्रचंड प्रमाणावर आहे. फार पूर्वी रशियन संशोधक वॅविलॉन यांनी नोंदल्याचं आठवतं ते असं की, एकेकाळी हिंदुस्थानचा 73 टक्के भाग निसर्गरम्य होता. आता हा जंगल एरिया किती असेल?
हे सर्व सांगण्याचं कारण, फिरता फिरता कधी अचानक देशी वृक्षवल्लीबरोबरच परदेशातून इथे येऊन रुजलेली झाडं दिसतात. शोभेची परदेशी रोपे मिळतात ती वेगळी, पण बाओबाबसारखा काहीसा भेसूर दिसणारा महावृक्ष आणि सध्या थंडीतही लाल, नारिंगी, सुंदर फुलांनी बहरलेलं आफ्रिकन टय़ुलिपचं झाड. बरेच दिवस ते पुठे रस्त्यालगत सापडत नव्हतं. आठवडाभरापूर्वी कासारवाडी ते पुणे मार्गावर अशी बरीच झाडे दिसली. कार थांबवून लहान मुलांच्या उत्सुकतेने फुलं वेचली. छानसा फोटो मात्र रस्त्यावरच्या गर्दीमुळे घेता आला नाही. तो नेटवर मिळतो.

या वेळी शोभिवंत फुलांचा संचार बाळगणाऱया आफ्रिकन टय़ुलिपविषयी. टय़ुलिप म्हटलं की, नेदरलॅण्ड्स आणि ‘सिलसिला’मधलं अमिताभ-रेखाचं गाणं आठवतं. आफ्रिकन टय़ुलिप तसा उपवनातला नाही. तो मुख्य वनातला डेरेदार वृक्ष आहे.

हे झाड पूर्व आणि दक्षिण आफ्रिकेच्या विषुववृत्तीय जंगलातलं. माणसं जशी इकडून तिकडे स्थलांतर करतात तसं त्यांच्या सोबत काही प्राणी आणि वनस्पतीही करतात. दुसऱया भूभागात कधी या वनस्पती रुजतात तर कधी नाही, परंतु आपल्याकडे महाराष्ट्रात समशीतोष्ण वातावरण असल्याने ते या टय़ुलिपला मानवलं. हिंदुस्थानात थेलेसिया पॉप्युलनिया ही त्याची प्रजात चांगली रुजली. संपूर्ण देशात त्याने हातपाय पसरले किंवा मुळं धरली.

या झाडाचे औषधी उपयोग म्हणजे शारीरिक आग (इन्फ्लेमेशन) कमी करण्यासाठी याच्या पानाफुलांचा वापर होतो. जखमा बऱया करण्याची त्याची प्रवृत्ती आहे. मलेरियावर त्याचा उपचार केला जातो, असं म्हणतात. शरीरातल्या अनेक रोगांवर ते उपयुक्त असल्याचं सांगितलं जातं.

असं असलं तरी हा झाला त्याचा गुणवर्णनाचा भाग. मात्र हे सुंदर ऑलिव्ह ग्रीन पानांचं आणि मोहन फुलांचं झाड फारसं काwतुकाला पात्र ठरत नाही. कारण ते वेगाने स्वतःच्या प्रजातीचा प्रसार करतं. त्याच्या बिया सावलीतसुद्धा चांगल्या रुजतात. त्यामुळे एक झाड बघता बघता स्वतःसारखं जंगल तयार करू लागतं. साहजिकच जंगलातल्या इतर झाडांना त्याचा त्रास होतो आणि शेतीच्या आसपास तर ते लावता येत नाही किंवा त्याची नवनवी रोपं सारखी काढून टाकावी लागतात.

याशिवाय हे झाड काही वेळा विषारी, तर काही वेळा विषनाशक मानलं जातं. मात्र त्याची पानं-फुलं ‘टॉक्सिक’ किंवा आरोग्याला त्रासदायक असल्याने त्यातील अल्कोलॉइड आणि ग्लायकोसिडरचा प्रपृतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. केवळ माणसांनाच नव्हे, तर जनावरांनाही याचा त्रास होऊ शकतो. लहान मुलांना त्याची फुलं आकर्षक वाटतात, पण ती आरोग्याच्या दृष्टीने वाईट ठरू शकतात.

बरीच काळजी घेऊन ही झाडं लावली तर मात्र छान दिसतात. ‘दुरून डोंगर साजरे’ असा प्रकार. औषधी मूल्य असले तर ते निष्णात वैद्यांनाच कळणार. त्यामुळे या झाडांविषयी फारसं ममत्व नसावं. म्हणूनच ती सर्वत्र दिसत नाहीत. तशी धोत्र्यासारखी झाडंही ‘टॉक्सिक’ प्रकारात येतातच, पण त्यात औषधी गुणधर्मही सामावलेले असतात.

निसर्गसौंदर्य म्हणून मात्र आफ्रिकन टय़ुलिप ट्री सुंदर दिसतं. त्याच्या पानांचा दाट हिरवा पिसारा आणि लाल, नारिंगी आणि कलापुसरीने कातरलेल्यासारख्या पाकळय़ांचा फुलोरा दुरूनच पाहावा. आपल्या आसपासच्या वनश्रीची ओळख आपल्याला असायला हवी. तीही आपल्यासारखीच सजीव आणि गुणदोष असलेली आढळेल. पुढच्या वेळी ‘बाओबाब’विषयी.