
>> आशा कबरे-मटाले
सध्या गाजणाऱया `अॅडोलसन्स’ मालिकेच्या निमित्ताने पालकत्वाच्या आव्हानांविषयी…
नेटफ्लिक्सवरच्या `अॅडोलसन्स’ वेब सीरिजचा सध्या बराच बोलबाला आहे. पालकत्वाकडे गांभीर्याने बघणारे पालक या वेब सीरिजने विशेष प्रभावित झाले आहेत. मूळ मालिका इंग्रजीत असली तरी ती हिंदीतही पाहता येते. काही जणांना ती लांबलेली व कंटाळवाणीही वाटली आहे. मालिकाकर्त्यांना जे मांडायचं आहे, ते कळायला सोपं नाहीच.
एका 13 वर्षांच्या मुलाला शाळेतील समवयस्क मुलीचा खून केल्याबद्दल पोलीस अटक करतात इथून मालिका सुरू होते आणि उलगडत जातं त्या मुलाच्या अवतीभवतीचं जग. खून त्यानेच केलाय याचे ठोस पुरावे पोलिसांकडे असतात. त्यामुळे `खून कुणी केला’ याबद्दलची उत्कंठा वाढवणारी कहाणी इथे नाही. `हा अवघा 13 वर्षांचा बऱयापैकी हुशार मुलगा खून करण्यापर्यंत कसा पोहोचला’ याचा शोध मालिकेत आहे. सुरुवातीला हुमसून हुमसून रडत “मी काही केलं नाही” म्हणणारा मुलगा अल्पावधीतच “मी काही चुकीचं केलं नाही” म्हणू लागतो. त्यानेच खून केल्याचा पुरावा पोलीस वडिलांसमक्ष त्याच्यासमोर ठेवतात आणि वडील कोलमडून जातात. `जे घडलंय’ त्याचा धक्का बसलेले वडील आणि संपूर्ण कुटुंबच नंतर कशातून जातं, तेही मालिकेत पाहायला मिळतं.
मालिका आपल्याला मुलाच्या शाळेत घेऊन जाते. तिथल्या मुलांची आपापसातली वर्तणूक, त्यांचा सोशल मीडियावरचा वावर, पौगंडावस्थेच्या उंबरठय़ावर त्यांच्यात सुरू झालेला लैंगिक व्यवहार, त्याने प्रभावित होणारं त्यांचं भावविश्व हे सारं सारं आपल्यासमोर उलगडत जातं. वास्तव परिस्थिती आपल्याकडेही फारशी वेगळी नसावी याची जाणीव म्हणूनच इथल्या अनेक सुजाण पालकांना अस्वस्थ करतेय.
`पालकांचे डोळे उघडणारी मालिका’ असंही तिचं वर्णन केलं जातंय. अर्थात ज्या पालकांना आपल्या पाल्यांच्या आयुष्यात हे असं सुरू असू शकेल याचं भान येण्यासाठी अशा एखाद्या मालिकेची गरज पडतेय ते नक्कीच मुलाकडे काहीसे पाठ फिरवून बसलेले असावेत. मालिकेत पौगंडावस्थेतील मुलांच्या आयुष्याचं जे चित्रण पाहायला मिळतं ते कमीअधिक फरकाने आपल्या अवतीभवतीही आहेच. गरीब, मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय, श्रीमंत, शहरी-ग्रामीण या वेगवेगळ्या स्तरांमुळे त्यात थोडाफार फरक पडत असेल, पण बरेचसे घटक सारखेच असावेत.
पौगंडावस्थेतील मुलामुलींमधील लैंगिक व्यवहार, काळानुरूप बदललेली त्यांची भाषा, धारणा, त्यासंदर्भातला ऑनलाइन संवाद, वर्तन याचं भान किती पालकांना आहे? आपल्याकडे बहुतेक पालक अजूनही `सेक्सविषयी मुलांशी काय बोलायचं, ती आपली संस्कृती नाही’ यालाच धरून आहेत का?
वेब सीरिजमधले वडील एके ठिकाणी म्हणतात, “मूल शिकेल, गुंतून राहील म्हणून त्याला काम्प्युटर आणून दिला. बंद दाराआड त्यावर हे असं सगळं चालेल याचा अंदाज मला कसा यावा?”
हीच आपल्याकडच्या बहुतांश पालकांची अवस्था नाही का? काम्प्युटर न परवडणाऱया वर्गातही किमान स्मार्टफोन दिला जातो. कोविड काळापासून ती शैक्षणिक गरजही बनली.
हातातल्या फोनचा वापर मुलं कशाकशासाठी करतात याचा मागोवा किती पालक घेतात? घेऊ शकतात? अनेकदा मुलं पालकांपेक्षा फोनचं तंत्रज्ञान वापरण्यात पुढे असतात. त्यामुळे साधा त्यांचा पासवर्ड वापरून त्यात शिरणंही पालकांना शक्य नसतं. एका विशिष्ट वयानंतर सुशिक्षित वर्गात मुलाची प्रायव्हसी जपणं त्याचा अधिकार मानला जातो, पण मूल कुठे भरकटलं, चुकलं, नको ते करून बसलं तर मात्र जग पालकांनाच दोष देतं.
पालक मुलांच्या जडणघडणीला जबाबदार असतात. असतातच! पण एका विशिष्ट वयानंतर त्यांचे मित्रमैत्रिणी, शाळा, तिथलं जग, बाहेरचं अफाट जग, तिथल्या बदलत्या सामाजिक-राजकीय घडामोडी, समाजमाध्यमं, त्यावरचं कुणाच्याही हातास पडणारं काहीही… हे सारंही मुलांच्या जडणघडणीला हातभार लावत असतंच. यातल्या बऱयाच गोष्टींवर पालकांचं काहीच नियंत्रण नसतं. ते नसणार हे ओळखून अगदी लहानपणापासून मुलांसोबत किमान `संवादाचा पूल’ मात्र निर्माण करायचा असतो.
मूल काहीही शेअर करत नाही ही पार किती पालकांची असते? हा प्रश्न काही पालकांना मूल तिसरी-चौथीत गेल्यावर पडायला लागतो, तर काही जणांना त्याहूनही उशिरा. काहींना त्याची गरजच वाटत नाही. आपलं मूल अभ्यासात हुशार आहे ना, मग काही चिंता नाही असाही समज दिसतो.
धक्का तेव्हा बसतो, जेव्हा एखादं शैक्षणिकदृष्टय़ा हुशार मूल अचानक कुठलाही कारणमीमांसेचा दुवा मागे न ठेवता आत्महत्या करतं किंवा या वेब सीरिजमध्ये दाखवलंय तसं एखाद्या गुह्याचा भाग बनतं.
आजचं पालकत्व खूप कठीण आहे का? ज्या काळात घरात दोन-तीन किंवा त्याहूनही अधिक मुलं होती, तेव्हा पालकत्वाचं ओझं नव्हतं? तेव्हा मुलं आपोआप वाढत? शहाणी निपजत? त्यांना मानसिक आधाराची वगैरे गरज नसे. घरात खूप माणसं, भावंडं असल्याने इतका फरक पडत होता? सगळं काही कुटुंब लहान झाल्यानेच कठीण होऊन बसलंय की आजूबाजूचं अवघं बदललेलं जगणं याला कारणीभूत आहे?
मुलाने मोठं शैक्षणिक यश मिळवलं की, पालकांचं कौतुक. तसंच मूल अपयशी ठरलं की, पालकच जबाबदार! पण पालकत्वाचं प्रशिक्षण कुणी देतं का? आपल्या पालकांच्या आठवणींतून काही गोष्टी उण्याअधिक करत बहुतेक जण आपली पालकत्वाची जबाबदारी निभावतात.
`अॅडोलसन्स’ मालिकेतला बाप एके ठिकाणी म्हणतो, “माझे वडील खूप रागीट होते. खूप बदडून काढत चुकल्यावर. म्हणून मी माझ्या मुलाला कधीही मारलं नाही…”
तरीही हा मुलगा खून करण्यापर्यंत कसा पोहोचला? एवढा टोकाचा राग कशामुळे उफाळून आला त्याच्यात? त्यामागची कारणं थबकवणारी आहेत.
मुलांचं जग बऱयापैकी क्रूर असतं असं म्हटलं जातं याची जाणीव त्यात डोकावणाऱया पालकांना असतेच. तिथला स्वीकार बहुतेक मुलांसाठी आत्यंतिक महत्त्वाचा असतो. काही `सॉफ्ट टार्गेट’ असलेली मुलं इतरांच्या छळाचा सामना करतात. यात नवीन काहीच नाही, पण छळाचं स्वरूप आता आणखी गडद झालं आहे का?
काही मुलं सोपी असतात. काहींच्या मानसिकतेत मोठा गुंता असतो. यात जन्मजात वैशिष्टय़ं आणि जडणघडण या दोहोंचं योगदान असतं, पण पुढे जरासं कुठे काही चुकलं तर दोष पालकांवरच येतो.
`अॅडोलसन्स’ मालिकेत गुन्हा घडल्यानंतर आठएक महिन्यांनंतरची पालकांची अवस्थाही दाखवली आहे. गोंधळून गेलेले, आपलं कुठे काय चुकलं याच्या ताणात जगणारे, जगाकडून होणाऱया वा कल्पित अवहेलनेला तोंड देणारे, दुसऱया अपत्यासाठी कुटुंब हसतं खेळतं ठेवण्याकरिता धडपडणारे पालक दिसतात.
पालक होणं सोपं नसतं हे अधोरेखित करतात.