ठसा – विजय खरे 

>> दिलीप ठाकूर

मुंबईतील चित्रपटसृष्टीत आपली लहानमोठी स्वप्ने घेऊन देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक जण येतात. कोणाला नशिबाची साथ मिळते आणि तो आपली गुणवत्ता व मेहनत या गुणांवर यशस्वी ठरतो. कोणी चित्रपट निर्माता व दिग्दर्शकांच्या कार्यालयांतून सतत चकरा मारत राहतो आणि हताश होऊन पुन्हा आपल्या गावी वा शहरात जाऊन नवीन मार्ग शोधतो. याशिवायही अनेक जण असतात. त्यातील एक अशाच सतत  ‘एका अथवा पहिल्या संधी’साठी निर्माता व दिग्दर्शकांच्या भेटी घेत राहतो. त्यातून तो या क्षेत्राचे निरीक्षण करत राहतो, हे माध्यम व व्यवसाय शक्य तितक्या प्रमाणात समजून घेतो आणि मग बदलत्या काळानुसार संधी शोधून यशस्वी ठरतो. विजय खरे हे असेच एक कलाकार होते. वयाच्या बाहत्तराव्या वर्षी त्यांचे बंगळुरू येथील इस्पितळात मूत्रपिंडाच्या विकाराने निधन झाले.

विजय खरे मूळचे बिहारमधील मुजफ्फर नगर येथील रहिवासी. कृष्णधवल अर्थात ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटांचे निस्सीम चाहते. त्याच वेडात ते 1962 साली मुंबईत आले आणि आपले फोटो घेऊन चित्रपट निर्माते व दिग्दर्शकांच्या कार्यालयांतून चकरा मारत राहिले. चित्रपटसृष्टीत वावर असावा आणि घरखर्च म्हणून अनेक चित्रपट स्टुडिओतून पडेल ती कामेही करत राहिले. तब्बल बारा वर्षे हे काम केल्यावर त्यांना राजा ठाकूर दिग्दर्शित ‘रईसजादा’ ( 1976) या चित्रपटात छोटीशी भूमिका मिळाली, पण हा चित्रपट पूर्ण होण्यापूर्वीच राजा ठाकूर यांचे निधन झाल्याने विजय खरे यांची भूमिका छोटी झाली. हिंदी चित्रपटांतून अशाच छोट्या छोट्या भूमिका साकारत असतानाच भोजपुरी भाषेतील चित्रपटसृष्टीत निर्मितीचे प्रमाण वाढत होते. आपल्याला हीच योग्य संधी आहे असे लक्षात येताच विजय खरे बिहारला परतले आणि भोजपुरी भाषेतील चित्रपटांतून भूमिका साकारण्यास सुरुवात केली. त्यांनी खलनायक साकारलेल्या ‘गंगा किनारे मोरा गांव’ या चित्रपटाला उत्तम व्यावसायिक यश प्राप्त झाल्याने आपला निर्णय योग्य असल्याचे विजय खरे यांना वाटले.

देशभरात ‘शोले’च्या यशाचे वातावरण निर्माण झाल्यानंतरचे हे दिवस होते आणि अमजद खानचा गब्बरसिंग बराच चर्चेत होता. विजय खरे यांनी भोजपुरी भाषेतील चित्रपटांत खलनायक साकारताना गब्बरसिंगला आपला आदर्श मानले आणि त्यात ते यशस्वी ठरले. भोजपुरी चित्रपटांतील गब्बर अशी त्यांना ओळख प्राप्त झाली. त्यानंतर हिंदी चित्रपटांत अमरीश पुरीच्या खलनायकीला महत्त्व आले तेव्हा त्यांनी अमरीश पुरींचा आदर्श ठेवला.  नव्वदच्या दशकातील भोजपुरी चित्रपटांत ते विलक्षण कार्यरत राहिले. तेव्हाच्या भोजपुरी चित्रपटांत ग्रामीण भागातील काwटुंबिक, सामाजिक, गुन्हेगारीच्या गोष्टी असत. विजय खरे यांनी कालांतराने रवी किशन, मनोज तिवारी अशा भोजपुरी सुपरस्टारसोबतही अनेक चित्रपटांतून भूमिका साकारल्या.  ‘एक रजाई तीन लुगाई’, ‘हमरा से बिराह कर ना’, ‘माई’ वगैरे मिळून तब्बल अडीचशे भोजपुरी चित्रपटांतून त्यांनी लहानमोठ्या भूमिका साकारल्या.  त्याबद्दल 2019 साली भोजपुरी समाजाद्वारे त्यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले तेव्हा त्यांनी मागील दशकापासून भोजपुरी चित्रपटांत वाह्यातपणा, ओंगळवाणेपणा, अश्लीलता वाढल्याबद्दल चिंता व्यक्त केली. भोजपुरी चित्रपट असा का घसरला? असाच त्यांचा प्रश्न होता. तसेच बिहारमधील मुशहरी येथील मणिका मनचे सौंदर्यीकरण केल्यास तेथे भोजपुरी तसेच हिंदी चित्रपटांचे चांगल्या प्रमाणात चित्रीकरण वाढेल, अशीही आशा व्यक्त केली. अलीकडेच त्यांनी चित्रपटातून काम करणे बरेच कमी केले आणि बंगलोर येथील आपल्या मुलाकडे राहू लागले. तेथेच त्यांचे निधन झाले. त्यांचा एक मुलगा दिल्लीत असतो, तर त्यांचा आणखी एक मुलगा आशुतोष मुंबईतील चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे. संघर्षाच्या काळात योग्य निर्णय घेण्यात तत्परता दाखवली म्हणून विजय खरे भोजपुरी चित्रपटांत यशस्वी ठरले.

[email protected]