साहित्य जगत- जन्मशताब्दीनिमित्त…

>> रविप्रकाश कुलकर्णी

हे चित्र पाहिलंत का? तुम्ही म्हणाल पत्यातल्या खेळातला हा बदाम राजा आहे, पण अधिक निरखून पहा जरा. एका बाजूने सगळ्या पत्त्यांत असतो तसा हा राजा आहे, पण त्याच्या उलटय़ा बाजूने पाहिलं तर तुम्हाला गोसाव्याचं चित्र दिसेल. आहे की नाही हा वेगळ्या प्रकारचा पत्ता? पण हा पत्ता नाहीच आहे! ही आहे एका व्हिझिटिंग कार्डची एक बाजू. हे व्हिझिटिंग कार्ड आहे विनोदाचा बादशहा राजा गोसावी यांचं.

एकदा पुण्यात माधव पोतदार यांनी एका गृहस्थांची ओळख करून दिली, “हे रमेश पाटील.’’ तेव्हा मी म्हटलं, “चैत्राली दिवाळी अंकाचे संपादक का?’’ तेव्हा पोतदार म्हणाले, “म्हणजे तुम्हाला आता त्यांची अधिक ओळख करून द्यायला नको. तुम्हाला सगळं माहीत आहेच.’’ त्या गप्पांत कळलं की, पाटील हे राजा गोसावी यांचं चरित्र लिहीत आहेत. तेव्हा त्यांना मी म्हटलं, “त्यांचं एक वेगळं व्हिजिटिंग कार्ड आहे. ते कुणी केलंय, कसं केलंय याची माहिती घ्या.’’

पुढे कित्येक वर्षांनी त्यांचं राजा गोसावी यांची माहिती देणारं एक पुस्तक आलं (प्रकाशक अनुबंध प्रकाशन, पुणे). त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर राजा गोसावींचा फोटो होता आणि मागच्या बाजूला व्हिजिटिंग कार्डचा फोटो होता. मात्र हे  व्हिजिटिंग कार्ड आहे वगैरे कसलीही माहिती दिलेली नव्हती.

त्यामुळे त्या व्हिजिटिंग कार्डवरील गंमत किती वाचकांपर्यंत पोहोचली असेल कुणास ठाऊक? यामागची हकिगत अशी की, लेखक, नाटककार मधुसूदन कालेलकर यांनी राजा गोसावी यांच्यावर लेख लिहिला होता. त्यात त्यांनी म्हटलं होतं, “असला तर राजा नाहीतर गोसावी.’’ त्या लेखाचं शीर्षकदेखील हेच असावं. एका मुलाखतीत राजा गोसावी म्हणाले होते की, “लाखालाखाने पैसे मिळवले आणि भोगाभोगाने घालवले.’’ त्यावर कालेलकरांनी म्हटलं होतं, “असेल तर राजा नाहीतर गोसावी.’’

मराठी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात उत्तम कामगिरी करणारे कलावंत खूप होते, खूप आहेत. या मंडळींनी आमच्या आयुष्यात आनंदाचे मळे फुलवले हे खरंच. अशा या साक्षीदारांनी आपल्या कारकीर्दीबद्दल लिहायला हवं की नाही? हे सगळं पुन्हा एकदा आठवायचं कारण अभिनेते राजा गोसावी यांची जन्मशताब्दी. (जन्म ः 28 मार्च 1925, मृत्यू ः 28 फेब्रुवारी 1998)

राजा गोसावी म्हटलं की, एकेकाळी रसिकांनी त्याला उत्स्फूर्तपणे ‘विनोदाचा बादशहा’ असा किताब देऊन टाकला होता. ते आणि शरद तळवलकर ही जोडी अफाट लोकप्रिय होती. दिग्दर्शक दत्ता केशव हे चित्रपट करत होते. थोडं चित्रीकरण झालं, पण राजा गोसावी आणि शरद तळवलकर कुठे गायब झाले त्याचा पत्ताच लागेना. शेवटी दत्ता केशव यांनी वृत्तपत्रात दोघांचे फोटो देऊन जाहिरात केली, ‘जिथे असाल तिथून निघून या’ वगैरे, पण त्याबरोबर आणखी एक अपील होतं, जे कोणी या दोघांचा पत्ता घेऊन येतील त्याला सिनेमाचे चार पास फ्री देण्यात येतील. ही जाहिरात पुढे ‘सुगंध’ दिवाळी अंकाचे संपादक म्हणून गाजलेल्या एकबोटे यांनी केलेली होती. पुढे एकबोटे यांना गाठलं, पण तोपर्यंत एकबोटे यांनी आपल्याकडचं होतं नव्हतं ते रद्दीत देऊन टाकलं होतं.

मग राजा गोसावींना गाठलं. त्यांना ही गोष्ट विचारताच ते म्हणाले, “अरे, हे काहीच नाही! माझ्या आयुष्यात एकापेक्षा एक गोष्टी घडल्यात.’’ अर्थात राजा गोसावींकडेही जाहिरात नव्हती हे स्पष्ट होतं. तेव्हा मी म्हटलं, “राजाभाऊ, हा सगळा आठवणींचा खजिना रिता करा ना एकदा.’’ तेव्हा राजाभाऊ म्हणाले, “माझ्या आयुष्यासंदर्भात काही टिपणं मी माझ्या डायरीत टिपून ठेवली आहेत, पण अजून बरंच काही मला करायचं आहे. आताशी कुठे माझ्या जीवनाची पहाट सुरू झाली आहे. ही पहाट का ते तुम्हाला सांगतो, माझे आजोबा 135 वर्षे जगले. माझी आजी 120 वर्षांची होऊन गेली. माझी आई हे तिचे 22 वे अपत्य. शेंडेफळ. तिलादेखील 92 वर्षांचं आयुष्य लाभलं. अशी दीर्घायुषी परंपरा पाहिली तर मला अजून बरंच आयुष्य असणार आहे. तेव्हा आताच आत्मचरित्र वगैरेच्या फंदात मी पडणार नाही.’’ पण माणसाला आपलं भविष्य कधी कळलं आहे का?

27 फेब्रुवारी 1998 या दिवशी पार्ले येथील दीनानाथ नाटय़गृहात ‘भ्रमाचा भोपळा’ नाटकाचा प्रयोग होता. राजाभाऊ रंगपटात रंगभूषेला बसले होते. तेथेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. धावाधाव झाली. प्रयत्न व्यर्थ गेले. 28 फेब्रुवारीला हा गुणी कलावंत अनंतात विलीन झाला. वय वर्षे फक्त 73. काळाच्या रेटय़ात होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. राजा गोसावी हे नाव जवळ जवळ विस्मृतीतच गेलं. ‘दास्तान’ चित्रपटात ट्रिपल रोल केला म्हणून दिलीप कुमारचं बरंवाईट कौतुक आम्ही करतो, पण त्याच्याही कितीतरी वर्षांअगोदर ‘राजा गोसावीची गोष्ट’ या नावाच्याच चित्रपटात राजा गोसावी यांची तिहेरी भूमिका होती हे सांगूनदेखील कोणाचा विश्वास बसत नाही.