लेख – वन्य जीव संवर्धनासाठी स्वतंत्र यंत्रणा हवी!

>> डॉ. प्रीतम भि. गेडाम, [email protected]

आपण बारकाईने निरीक्षण केले तर मानवाचे संपूर्ण जीवन वन्य जिवांवर आधारित असल्याचे दिसून येते. मानव सतत निसर्गाचा नाश करत आहे. परंतु वन्य जिवांमुळेच मानवी जीवनाचे अस्तित्व टिकून आहे. कारण वन्य जीव हे जंगले आणि निसर्गाचे मुख्य रक्षक आहेत. या 2025 वर्षीच्या जागतिक वन्य जीव दिनाची थीमवन्य जीव संवर्धन वित्तः लोक आणि ग्रहात गुंतवणूकआहे. वन्य जीव संवर्धन प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी शाश्वत आर्थिक उपायांची तातडीची गरज यावर ही थीम लक्ष पेंद्रित करते. वन्य जीव संवर्धनाला चालना देण्यासाठी नावीन्यपूर्ण आर्थिक यंत्रणांची आवश्यकता आहे

वन्य जीव हे पृथ्वीवरील संपूर्ण जीवसृष्टीचा आधार आहेत. जेव्हा पृथ्वीवरून वन्य जिवांचे अस्तित्व पूर्णपणे नष्ट होईल, तेव्हा मानवी जीवनाचा अंत अतिशय वेदनादायक पद्धतीने होणार. वन्य जिवांमुळे जंगले समृद्ध होतात. जंगलांमुळे पाण्याचे स्रोत समृद्ध होतात. झाडे मातीची धूप रोखतात आणि सुपीक जमिनीचे संरक्षण करतात. सर्वांना शुद्ध पाणी आणि शुद्ध ऑक्सिजन मिळते. ऋतूचक्र व्यवस्थित चालते. वेळेवर पुरेसा पाऊस पडतो. हवामान आणि निसर्ग यांच्यात संतुलन राखले जाते. सर्व प्राण्यांची अन्नसाखळी सुरळीत चालते. मानव आणि वन्य जीव यांच्यातील संघर्ष कमी होतो. नैसर्गिक आपत्ती कमी होतात. पिके फुलतात. समाजातील प्रत्येक घटकाला पोषकतत्त्वांनी समृद्ध असलेले निरोगी अन्न मिळते. आजार कमी होतात. देश स्वावलंबी होतो. नैसर्गिक संसाधने समृद्ध होतात.

देशाच्या वाढत्या लोकसंख्येला सुखसोयी पुरविण्यासाठी मर्यादित नैसर्गिक संसाधनांवर अमर्याद दबाव आहे. आपण शहरांमधून सुंदर किलबिलाट करणारे पक्षी आधीच हाकलून लावले आहेत. शहरे आता महानगरांचे रूप धारण करीत आहेत. शहरांभोवतीची गावे, जंगले, शेतजमीन, पाण्याचे स्रोत, नैसर्गिक संसाधने झपाट्याने कमी होत आहेत. शहरे आणि महानगरांमधून वाहणाऱ्या नद्यांनी आता नाल्यांचे रूप धारण केले आहे. विषारी कचरा, ई-कचरा आणि जैव वैद्यकीय कचऱ्याचे प्रचंड डोंगर सतत वाढत आहेत. मानवी जीवनासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक उत्पादनाचा कच्चा माल निसर्गाकडून मिळतो. नैसर्गिक संसाधनांच्या अतिरेकी वापरामुळे आपत्ती आणि प्राणघातक आजार सतत वाढत आहेत. लोकसंख्येनुसार शहरांमध्ये नवीन वस्त्या तयार होत आहेत. जंगलातील वन्य जिवांना अन्न आणि पाण्यासाठी मानवी वस्तीत यावे लागते. त्यामुळे मानव आणि वन्य जिवांमधील संघर्ष वाढत आहे. आपण भावी पिढ्यांसाठी असलेल्या संसाधनांचाही वापर केला आहे. आपण निसर्गाकडून जे काही घेतो ते आपल्याला परत द्यावे लागते, पण आजच्या युगात स्वार्थी माणूस निसर्गाला पिळून त्याच्याकडून हिसकावून घेत आहे. माणूस निसर्गाच्या प्रत्येक भागात आपला वाटा निर्माण करत आहे.

वन्य जीव नेहमी मानवी हस्तक्षेपापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात, परंतु मानवच सतत स्वतःची व्याप्ती वाढवत आहे. वन्य जिवांना अन्न शोधणे आणि जगण्यासाठी स्पर्धा करणे कठीण बनवत आहे. मानवी चुकांचे परिणाम वन्य प्राण्यांना भोगावे लागतात. वन्य जिवांना त्यांच्या प्राणांचे बलिदान देऊन हवामान बदलाच्या परिणामांची सर्वात मोठी किंमत मोजावी लागते. मानवी प्रगतीमुळे वन्य जिवांचे थेट नुकसान होते. त्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होतात आणि प्रदूषणामुळे मृत्यू होतात. अनेक वेळा रस्ते अपघात, वीज कोसळणे, उघड्या खड्ड्यात किंवा शेताच्या विहिरीत बुडून वन्य प्राण्यांचा मृत्यू होतो. रस्त्यांचा विकास वाढत असताना, वेगवान वाहनांमुळे वन्य प्राण्यांच्या मृत्यूचा धोका वाढतो. वन्य प्राण्यांसाठी शिकार हा आणखी एक धोका आहे. वन्य जिवांमध्ये मृत्यूची इतर कारणे म्हणजे रोग, दुखापत, परजीवीवाद, उपासमार, कुपोषण, निर्जलीकरण, हवामान परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती आणि इतर प्राण्यांकडून होणारी शिकार. वाढत्या मानवी क्रियाकलापांमुळे तलाव, गवताळ प्रदेश आणि जंगले यांसारख्या अधिवासांचे नुकसान होते, ज्यामुळे वन्य जिवांना सहज वावरणे कठीण होते. परिसंस्थेत सतत बदल होत असतात, ज्यामुळे वन्य जिवांना अन्न, पाणी आणि त्यांच्या पिल्लांना वाढविण्यासाठी चांगल्या नैसर्गिक जागांपासून वंचित ठेवले जाते. प्रदूषणामुळे हवा, माती आणि पाणी दूषित होऊन जंगलांपर्यंत पोहोचते. वर्ल्ड वाइल्डलाइफ फंडच्या लिव्हिंग प्लॅनेट रिपोर्ट 2024 नुसार, गेल्या 50 वर्षांत (1970-2020) वन्य जिवांच्या लोकसंख्येचा सरासरी आकार विनाशकारीरीत्या 73 टक्क्यांनी कमी झाला आहे. अहवालात असा इशारा देण्यात आला आहे की, नैसर्गिक विनाश आणि हवामान बदलामुळे पृथ्वीच्या काही भागांमध्ये धोकादायक पातळीला पोहोचत आहे, ज्यामुळे मानवतेसाठी गंभीर धोका निर्माण झाला आहे.

गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात 41 वाघ आणि 55 बिबटय़ांची शिकार करण्यात आली. आरटीआय अर्जाद्वारे मिळवलेल्या माहितीनुसार, 2020 ते जानेवारी 2025 दरम्यान राज्यात 168 वाघ व 808 बिबटय़ांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, बहुतेक मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे आणि अपघातांमुळे झाले आहेत, तरी शिकारीमुळे वाघांच्या मृत्यूची संख्या चिंतेचा विषय आहे. एका शिकारविरोधी तज्ञाचे म्हणणे आहे की, स्थानिक शिकारी या हत्यांमध्ये मोठी भूमिका बजावतात आणि ते पुढे म्हणतात की, क्रूर टोळ्यांकडून होणाऱ्या संघटित शिकारीच्या 90 टक्क्यांहून अधिक घटनांची नोंदच केली जात नाही. 2002 ते 2023 पर्यंत महाराष्ट्राने 867 हेक्टर ओलसर प्राथमिक जंगल गमावले, जे 1.28 मेट्रिक टन कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनाच्या समतुल्य आहे. आदर्शपणे राज्यात 33 टक्के वनक्षेत्र असायला हवे, परंतु सध्या ते फक्त 16.53 टक्के आहे. इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2023 नुसार, गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रातील वनक्षेत्र सुमारे 54.5 चौरस किलोमीटरने कमी झाले आहे.

अधिकृतपणे मान्यताप्राप्त स्रोतांकडून संकलित केलेल्या जागतिक बँकेच्या विकास निर्देशकांच्या संग्रहानुसार, 2022 मध्ये भारतातील एकूण वनक्षेत्र 726928 चौरस किमी नोंदवले गेले. रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट डेटा आणि फील्ड-बेस्ड इन्व्हेंटरीच्या व्याख्येवर आधारित फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाने तयार केलेल्या द्वैवार्षिक अहवालानुसार, 2023 पर्यंत भारतातील एकूण वन आणि वृक्षाच्छादन 8,27,357 चौरस किमी होते, जे देशाच्या भौगोलिक क्षेत्राच्या सुमारे 25 टक्के व्यापते. भारताच्या राष्ट्रीय वन धोरणानुसार, पर्यावरणीय स्थिरता राखण्यासाठी जंगलाखालील एकूण भौगोलिक क्षेत्राचा आदर्श टक्केवारी किमान 33 टक्के असणे आवश्यक आहे. 2010 ते 2018 दरम्यान, काही भागांत 50 टक्क्यांपर्यंत मोठी झाडे नष्ट झाली. 2010 ते 2022 पर्यंतच्या उपग्रह प्रतिमांचा वापर करून संशोधकांना असे आढळून आले की, 2018 ते 2022 दरम्यान अंदाजे 56 लाख मोठी झाडे नाहीशी झाली. 2030 पर्यंत भारतातील 45-64 टक्के जंगले हवामान बदल आणि वाढत्या तापमानाच्या परिणामांना सामोरे जातील. आजच्या आधुनिक सुविधा, साधनसंपन्न समाज आणि सरकार असूनही बुद्धिमान माणूस अनेक प्रसंगी कमकुवत व निराश होतो, आत्महत्या किंवा गुन्हा करतो. मग अशा परिस्थितीत जर वन्य जिवांना अन्न आणि पाण्याची गरज भागवण्यासाठीही संघर्ष करावा लागत असेल, तर त्यांची अवस्था किती वाईट असेल याची कल्पना आपण करू शकतो. अशा परिस्थितीत त्यांनी कुठे जावे, कसे जगावे?