>> डॉ. अभय जेरे, शब्दांकनः हेमचंद्र फडके
आर्टिफिशल इंटेलिजन्ससह बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे बदलणाऱ्या काळात पुढील 25 वर्षांतील जगाचा विचार करून शैक्षणिक क्षेत्राची रचना करणे आवश्यक आहे. नव्या काळात आवश्यक असणारे मनुष्यबळ हे पारंपरिक व्यवस्थेपेक्षा भिन्न असणार आहे. त्यामुळे विद्यापीठांना नव्या काळातील आव्हानानुसार विद्यार्थ्यांची मानसिकता निर्माण करावी लागेल आणि त्यादृष्टीने अभ्यासक्रमातही बदल करावा लागेल. विद्यापीठातील विद्यार्थी येत्या काळातील आपले सहयोगी असतील असा विचारही विद्यापीठ व्यवस्थापनाने करायला हवा आणि त्या पद्धतीचे वातावरणही निर्माण करायला हवे.
एआय, मल्टिव्हर्स, एआर-व्हीआर, रोबोटिक्स, होलोग्राफिक टेक्नॉलॉजीज यांचा खूप मोठा प्रभाव शिक्षणावर पडणार आहे. दुसरीकडे इंटरनेटच्या माध्यमातून होणारा इन्फर्मेशनचा, डेटाचा, कंटेंटचा भडिमार अव्याहतपणाने सुरूच आहे. या सर्वांमुळे पाल्याने शाळेत जावे कशासाठी? असा प्रश्न बरेचदा उपस्थित होताना दिसतो. अशा परिस्थितीत मुलांना शाळा-महाविद्यालयांमध्ये येण्यास प्रवृत्त करणारी रचना कशी निर्माण करता येईल याचा विचार शैक्षणिक संस्थांनी करायला हवा. एआय हा आधुनिक तंत्रांतीतील एक भाग आहे. फक्त एआय म्हणून नव्हे, तर संपूर्ण जग बदलते आहे, सगळ्या टेक्नॉलॉजी बदलत आहेत. अशा वेळी शिक्षण संस्थांना बदलणे क्रमप्राप्त आहे. थोडक्यात, सर्वंकष विचार केला जात नाही तोपर्यंत 10 किंवा 20 वर्षांनंतरचे शिक्षण आणि त्यासाठी लागणाऱ्या शिक्षण संस्था या गोष्टींचे आकलन करता येणे अवघड आहे.
आजच्या अनुषंगाने विचार करता आपल्या शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे ही ‘एक्सपीरियन्स सेंटर्स’ म्हणून विकसित झाली पाहिजेत. विद्यार्थ्यांना ऑनलाइन माध्यमातून घरामध्ये राहून जो अनुभव मिळणार नाही तो आपल्या वास्तूमध्ये मिळायला हवा, अशा पद्धतीने विचार करून शिक्षण संस्थांमध्ये सुधारणा घडवून आणाव्या लागतील. यामध्ये शिक्षणाची प्रक्रिया आनंददायी करण्यासाठी शिकवण्याच्या पद्धतीतील बदलांबरोबरच शिक्षण संस्थांमधील वातावरणही सुखमय बनवणे आवश्यक आहे. तरच उद्याच्या भविष्यात विद्यार्थी शाळा-महाविद्यालयांमध्ये जाण्याचा विचार करतील. अन्यथा डिजिटलायझेशनच्या युगात त्यांना घरबसल्या सर्व काही उपलब्ध होतच आहे.
आज आपला देश गिग इकॉनॉमीकडे जात आहे. या बदलत्या काळात पदवीच्या कागदापेक्षा स्किल्स किंवा कौशल्यांना महत्त्व असणार आहे. गिग इकॉनॉमीमध्ये केवळ ‘डिलिव्हर करता येण्याची, समस्या सोडवण्याची क्षमता’ असणे गरजेचे असेल. ती क्षमता असणाऱ्या उमेदवाराचे शिक्षण, पदवी यांपेक्षा कौशल्य हा निकष प्राधान्याने गणला जाईल. येणाऱ्या काळात जॉब कायमस्वरूपी राहणार नाहीत. विविध प्रोजेक्टवर काम करण्याचा काळ येणार आहे. उमेदवार एकाच वेळी दोन-तीन कंपन्यांसोबतही काम करू शकेल. यासाठी कौशल्यांची गरज असेल. ती कौशल्ये महाविद्यालयांमधूनच मिळवलेली असणे गरजेचे राहणार नाही. अॅप्रेंटिसशिपच्या माध्यमातून किंवा एखाद्या टीमबरोबर काम करूनही विविध प्रकारची स्किल्स मिळवली असतील तरी त्यामुळे फरक पडणार नाही. साहजिकच, पदवीच्या कागदाची गरजच नसेल तर शिक्षण संस्थांमध्ये मुलांनी का यावे, हा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी शिक्षण संस्थांना तयार राहावे लागेल. यासाठी विद्यार्थ्यांना, तरुण-तरुणींना नावीन्यपूर्ण शिक्षण देण्याबरोबरच आनंददायी शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न शैक्षणिक संस्थांना करावे लागतील. जेणेकरून तिथे जाण्याची ओढ मुलांमध्ये निर्माण होईल.
लक्षात घ्या, एआय हा एक छोटा घटक आहे. येणाऱ्या काळातील शिक्षण पद्धती कशी असावी याकडे सर्वांगीण आणि सर्वंकषरीत्या पाहण्याची गरज आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या परिघाबाहेर जाऊन त्याबाबतचा विचार करावा लागेल.
आज भारत जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. येणाऱ्या काळात आपल्याला तिसऱ्या स्थानावर जायचे आहे. यासाठी आपल्या शैक्षणिक संस्थांना इनोव्हेशन हब म्हणून विकसित व्हावे लागणार आहे. कारण आपल्याला ज्ञानाधिष्ठत अर्थव्यवस्थेकडे जायचे आहे. जागतिक पटलावर प्रभावी ठरतील अशा आयडियाज किंवा नवसंकल्पना आपल्याला विकसित कराव्या लागणार आहेत. सद्यस्थितीत आपण केवळ ग्राहक आहोत. आता आपल्या मातीत विकसित झालेल्या, उगवलेल्या संकल्पना आपण जगाला विकण्याचा विचार करणे गरजेचे आहे. यासाठी आपल्याला आयडिया जनरेटर्स किंवा आयडिया क्रिएटर्स गरजेचे आहेत. त्याला नॉलेज बेस्ड इकॉनॉमी म्हणतात, ज्यामध्ये आपण ज्ञान विकसित करतो आणि त्या ज्ञानाच्या आधारावर संपत्ती निर्मिती होते. नॉलेज बेस्ड इकॉनॉमी बनणे ही भारताची, समाजाची गरज असेल तर त्यासाठी आपण तयार आहोत का? शैक्षणिक संस्थांचे इनोव्हेशन हबमध्ये रूपांतर होणे, त्यामधून निर्माण होणाऱ्या नवसंकल्पना इनक्युबेट करणे आणि त्यातून नवीन उद्योगधंदे निर्माण होणे या सर्व प्राक्रियेबाबत आपल्या शैक्षणिक संस्था विचार तरी करताहेत का? तसे होताना फारसे दिसत नाही.
आज स्टार्टअप व इनोव्हेशन क्षेत्रात सर्वोच्च स्थान प्राप्त करण्यासाठी देश शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करत आहे. देशातील वाढत्या बेरोजगारीला लगाम घालण्याचे आणि विद्यार्थ्यांमधील कौशल्य विकासाला चालना देण्याचे काम नवीन शैक्षणिक धोरण करणार आहे. नवीन शिक्षण धोरणात केवळ एआयचा वापर करा असे म्हटलेले नसून सर्व प्रकारच्या नव तंत्रज्ञानाचा वापर करावा लागणार आहे हे सूचित करते. क्रिएटिव्हिटी, लाईफलाँग लार्निंग यावर भर देण्यास सुचवत आहे. सातत्याने आधुनिक तंत्रज्ञानाला अवगत करत सृजनशील कल्पनेच्या माध्यमातून स्वतःची प्रगती घडवून आणण्यासाठी पूरक शिक्षण नव्या धोरणाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. यादरम्यान येणाऱ्या रोबोटिक्स, थ्रीडी प्रिंटिंग यांसारख्या सर्व नव्या टेक्नॉलॉजी वापराव्या लागणार आहेत. एआयमुळे कमी कौशल्य असणाऱ्या नोकऱ्या हद्दपार होणार आहेत, पण केवळ नोकऱ्या जाणार म्हणून हाकाटी पिटून चालणार नाही. पूर्वी संगणक आले तेव्हाही अशीच ओरड झाली. त्यापूर्वी पहिली औद्योगिक क्रांती झाली तेव्हाही ‘नोकऱ्या जाणार’ असा टाहो फोडला गेला, पण दुसरीकडे नवनवीन नोकऱ्या तयारही होत गेल्या. जसा एआयचा वापर वाढत जाईल तसतसे नवीन जॉब तयार होतील. त्यासाठी येणाऱ्या पिढीला प्रशिक्षित करावे लागणार आहे. लाईफलाँग लार्निंगसाठीची मानसिकता मुलांमध्ये विकसित करावी लागणार आहे. नवनवीन कौशल्ये सातत्याने शिकत राहण्यावाचून गत्यंतर नाही, हे मुलांच्या मनावर बिंबवण्याची गरज आहे. हा विचार नवीन शैक्षणिक धोरणातून देण्यात येत आहे. तो समजून घेण्यासाठी आणि ‘विकसित भारता’चे उद्दिष्ट गाठण्यासाठी शिक्षण आणि शैक्षणिक संस्था कशा असाव्यात याबाबत मंथन होणे गरजेचे आहे.
आर्टिफिशल इंटेलिजन्ससह बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे बदलणाऱ्या काळात पुढील 25 वर्षांतील जगाचा विचार करून शैक्षणिक क्षेत्राची रचना करणे आवश्यक आहे. नव्या काळात आवश्यक असणारे मनुष्यबळ हे पारंपरिक व्यवस्थेपेक्षा भिन्न असणार आहे. त्यामुळे विद्यापीठांना नव्या काळातील आव्हानानुसार विद्यार्थ्यांची मानसिकता निर्माण करावी लागेल आणि त्यादृष्टीने अभ्यासक्रमातही बदल करावा लागेल.
(लेखक अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे उपाध्यक्ष आहेत.)