निमित्त – माझी एकादशी…

>> गुरुनाथ तेंडुलकर

आषाढी एकादशी या विषयावर लेख लिहिताना माझ्या मनात विचारांची एक भलीमोठी दिंडी सुरू झाली आहे. मन कधीचंच पंढरपूरला पोहोचलंय. पंढरपुरात आषाढी एकादशीला येणाऱ्या दिंडय़ा आणि भक्तीचा महापूर याबद्दल लिहावे तेवढे थोडेच आहे.

महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून अनेक दिंडय़ा पंढरपुरात येतात आणि भक्तिसागरात विसर्जित होतात. त्यात प्रामुख्याने नावे सांगायची तर त्र्यंबकेश्वरमधून निवृत्तीनाथांची पालखी, आळंदीहून येणारी माऊली ज्ञानेश्वरांची पालखी, सासवडहून सोपानदेवांची पालखी आणि मेहूणवरून पंढरपूरला येणारी मुक्ताबाईंची पालखी अशा चार भावंडांच्या दिंडय़ा पालख्या आषाढी एकादशीला एकत्र येतात. जणू चारही भावंडे एकमेकांना भेटतात.

तसेच देहूतून संत तुकारामांची, पैठणहून संत एकनाथांची, पंजाबातून संत नामदेवांची, उत्तर प्रदेशातून संत कबिरांची पालखी पंढरपूरला येते. अनेक संत…अनेक पालख्या…नागनाथवरून आलेली विसोबा खेचरांची पालखी घेऊन निघालेली दिंडी, तेरहून आलेल्या संत गोरा कुंभारांच्या दिंडीत इथे सहजच मिसळून जाते. उच्च-नीच भेदभाव इथे नाही. लहान-थोर नाही. जात-पात तर नाहीच नाही. इथे प्रत्येक जण ‘एकमेकां लागती पायी रे’ अशी अवस्था असते. प्रत्येक जण एकमेकांना हाक मारताना ‘माऊली’ अशी हाक मारतो. इथे सगळेच भक्त आणि सगळेच भगवंत असतात.

पंढरपुरात आषाढी एकादशीला येणाऱ्या दिंडय़ा आणि भक्तीचा महापूर याबद्दल लिहावे तेवढे थोडेच आहे. तो एका स्वतंत्र प्रबंधाचा विषय होईल. म्हणूनच आज केवळ एकादशीबद्दल. एकादशीच का? हा प्रश्न माझ्या मनाला अनेक काळापासून छळत होता. त्याचे उत्तर मला सापडले ते कठोपनिषदाच्या पहिल्या अध्यायात.

आपण माणूस म्हणून जन्माला आलो आहोत. निसर्गाने आपल्याला पाच ज्ञानेंद्रिये आणि पाच कर्मेंद्रिये दिली आहेत. डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा ही पाच ज्ञानेंद्रिये आपल्याला आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींची जाणीव करून देतात. डोळ्यांनी आपण पाहतो, कानांनी ऐकतो, नाकाने आपल्याला आजूबाजूच्या गंधाची जाणीव होते, जिभेने चव समजते आणि त्वचेमुळे स्पर्शज्ञान होते. या पाच ज्ञानेंद्रियांकडून मिळणाऱ्या चेतना मेंदूपर्यंत पोहोचतात आणि त्यानंतर मेंदू कर्मेंद्रियांना आवश्यक त्या सूचना देतो. माणसाला लाभलेली पाच कर्मेंद्रिये म्हणजे हात, पाय, तोंड, गुदद्वार आणि जननेंद्रिय. ज्ञानेंद्रियांकडून मिळणाऱ्या संवेदना आणि कर्मेंद्रियांकडून होणारी त्या सूचनांची अंमलबजावणी केली जाते व माणसाचे आयुष्य निर्धोक, सुस्थितीत पार पडते.

उदाहरणच द्यायचे झाले तर रानातल्या वाटेने जाताना अचानक बाजूच्या झुडुपातून काहीतरी खुसफूस ऐकू आली, डोळ्यांना भलामोठा अजगर दिसला तर लागलीच मेंदूकडून पायांना सूचना मिळते, ‘दूर हो… पळ…’ पाय ती सूचना अमलात आणतात. आपण पळतो. थोडय़ा वेळाने आपल्याला दम लागतो. घशाला कोरड पडते. अशा वेळी डोळ्यांना जवळच एक ओढा दिसतो. आपले पाय त्या ओढय़ाच्या दिशेने वळतात. आपण पाण्यात हात घालतो. पाण्याचा थंडगार, पण गिळगिळीत स्पर्श हातांना जाणवतो. काहीतरी गडबड आहे हे जाणवते. आपण पाणी ओंजळीत घेतो. त्या पाण्याचा तांबूस काळपट रंग आपल्या डोळ्यांना दिसतो. नाकाला त्या पाण्यातून येणारा दुर्गंध जाणवतो. इतके करून आपण ते पाणी पिण्यासाठी ओंजळ तोंडाला लावली तर तर जिभेला त्याची घाणेरडी चव लागलीच जाणवते आणि तोंडाला ताबडतोब ते पाणी थूंकून टाकण्याची आज्ञा दिली जाते. कोणत्या तरी घातक रसायनाने दूषित झालेले पाणी पिऊन होणाऱ्या संभाव्य अपायापासून आपण सुरक्षित राहतो.  अशी ही पाच ज्ञानेंद्रियं आणि त्यांच्या जोडीची पाच कर्मेंद्रियं. एकमेकांच्या सहाय्याने कार्य करणारी, पण या दहा इंद्रियांच्या जोडीने आणखी एक इंद्रिय माणसाच्या बाबतीत विकसित झाले आहे, ते इंद्रिय म्हणजे मन!

मनाला उपनिषदामध्ये अकरावं इंद्रिय असे म्हटले आहे. या मनामुळेच तर आपल्या आयुष्यात अनेक बऱ्या-वाईट घटना घडत असतात. मनात उत्पन्न होणारे विचार आणि त्या विचारांच्या जोडीने इतर दहा इंद्रियांकडून होणारे आचार. या विचार-आचारावरच तर आपल्या आयुष्याची दिशा आणि दशा ठरते. विकारी मनामुळे आयुष्याची माती करायची की, विचारी मनाच्या सहाय्याने त्याच आयुष्याचे सोने करायचे हे सर्वस्वी आपल्यावरच अवलंबून असते. अभ्यासू आणि जिज्ञासू वाचकांसाठी कठोपनिषदातील मंत्र सांगतो.

आत्मानं रथिनं विद्धि शरीरं रथमेव तु ।

बुद्धिं तु सारथिं विद्धि मन प्रग्रहमेव च ।।

भावार्थ – शरीर हा आपला रथ आहे. जीव हा त्यातील रथी म्हणजेच प्रवासी आहे. हा प्रवास कुठे करायचा हे ठरवणारी बुद्धी हा सारथी आहे आणि त्या सारथ्याच्या हातातील लगाम म्हणजे आपले मन आहे, असे उपनिषदकार ऋषी सांगतात. भगवद्गीतेमध्येदेखील ‘मन एव मनुष्याणां कारणं बंध मोक्षयोः’ म्हणजेच माणसाच्या बंधनाचे किंवा मुक्ततेचे कारण केवळ त्याचे मन आहे असे भगवान श्रीकृष्णांनी स्पष्ट सांगितले आहे.  हे मन जरी दिसत नसले तरी ते असते. ते पाच ज्ञानेंद्रियं आणि पाच कर्मेंद्रियांवर नियंत्रण करणारे अकरावे इंद्रिय आहे. या अकराव्या इंद्रियाचं प्रतीक म्हणून एकादशीचं व्रत आचरण केले जाते.

एकादशीच का? याचे उत्तर मला इथे सापडले. अनेक जण आषाढी एकादशीला उपवास करतात. काहीजण पाणीदेखील पीत नाहीत, तर काही जण उपवासाचे गडगंज आणि सुस्तावणारे पिठूळ आणि तेलकट पदार्थ खाऊन उपवास करतात. हा उपवास म्हणजे एक मोठी गंमतच असते. उपवासाला बटाटा चालतो, पण कांदा चालत नाही. वरीचे तांदूळ चालतात, पण तांदळाचा भात चालत नाही. बटाटय़ाची भाजी चालते, पण बटाटय़ाची भजी मात्र चालत नाहीत. बटाटावडा चालत नाही, पण साबुदाणा वडा मात्र चालतो. अशा काहीतरी विचित्र प्रथा आपल्याकडे पूर्वापार चालत आलेल्या आहेत. वास्तविक उपवासाला काय चालते आणि काय चालत नाही हे ज्याचे त्याने ठरवायचे, पण उपवास म्हणजे अमुक खाणे आणि तमुक न खाणे एवढय़ावरच मर्यादित न राहता उपवास या शब्दाचा नेमका अर्थ समजून घ्यायला हवा. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे वस्ती करणे किंवा राहणे. भगवंताच्या सान्निध्यात राहिल्यानंतर देहाची शुद्ध उरत नाही. तहान-भूक हरपते आणि त्यामुळे जे घडते त्याला उपवास असे म्हणतात. उपवास हा करायचा नसतो. तो घडावा लागतो. एखाद्या आवडीच्या विधायक कामात स्वतला झोकून देणे, एखाद्या असहाय्य व्यक्तीची सेवा करणे, एखाद्या संस्थेसाठी निःस्पृह भावनेने काम करणे हेदेखील भगवंताच्या जवळ राहण्यासारखेच आहे की. अशी कामे करणे हाही एक प्रकारचा ‘उप वास’च असतो.

एकादशीला उपवास करायला हवा, दिंडीतून पंढरीला जायलाच हवे असे नाही. कारण ज्या पंढरपूरला लाखो भाविक जातात तो पांडुरंग स्वतः पुंडलिकाच्या भेटीसाठी आला होता. आई-बापाची सेवा करण्यात धन्यता मानणारा पुंडलिक हा भगवंताचा सर्वोत्तम भक्त होता. भक्ती म्हणजे केवळ जपमाळ ओढणे नव्हे. भक्ती म्हणजे केवळ नाचत नाचत दिंडीतून यात्रा करणे नव्हे. भक्ती म्हणजे झाडावरची जिवंत फुले ओरबाडून दगडाच्या निर्जीव मूर्तीवर वाहणे नव्हे. भक्ती ही संकल्पना या सगळ्यांना सामावून घेणारी तरीही या सगळ्याहून भिन्न आहे. व्रत ही संकल्पना स्वयं शिस्तीवर आधारलेली आहे. म्हणूनच या आषाढी एकादशीचा मुहूर्त साधून आपणही एक व्रत आचरूया.

या उपवासाला लोभ, दंभ, मत्सर, द्वेष चालत नाही. खोटेपणा चालत नाही. क्रोध चालत नाही. माणसाला माणसापासून दुरावणारे, माणुसकीचे मारेकरी असणारे आणि सर्वांगीण विकासाच्या आड येणारे हे मानवतेचे शत्रू आहेत. ते केवळ एक दिवस नव्हे तर उर्वरित आयुष्यभरासाठी वर्ज्य करायचे. कुणाचा पैसा खायचा नाही. कुणाचा वेळ खायचा नाही. अनैतिक मार्गाने सत्ता-संपत्ती मिळवायची अभिलाषा नको. हव्या हव्याचा हव्यास नको. आळस नको, कामात दिरंगाई नको, चालढकल नको आणि तो ज्यामुळे निर्माण होतो त्या-त्या गोष्टी कटाक्षाने टाळायच्या. दिवसभरातील अशा कितीतरी गोष्टी आपण केल्या नाहीत तरी काही बिघडत नसतं. व्हॉटस्अॅपवर येणारा प्रत्येक व्हिडीओ व फेसबुकवरची भरकट भटकंती नाही केली तरी काही बिघडत नाही. नाही पाहिल्या सिरीअल्स तर काही बिघडतं का? त्याऐवजी थोडा व्यायाम, प्राणायाम, योगासने केली तर… चांगल्या पुस्तकाचे वाचन केले तर… एखादा सकारात्मक छंद जोपासला तर…

ज्या-ज्या गोष्टींमुळे आपल्या सर्वांगीण विकासात बाधा निर्माण होते, ज्याच्यामुळे आपल्या प्रगतीच्या मार्गात अडथळे निर्माण होतात त्या गोष्टी निग्रहपूर्वक टाळायच्या. त्यासाठी मनाचा निग्रह महत्त्वाचा. म्हणूनच या मनाला म्हणजेच अकराव्या इंद्रियाला लगाम घातला की, इतर दहाही इंद्रिये व्यवस्थित काम करतील आणि एकादशी ही केवळ एक तिथी न राहता, आयुष्याची इति होईपर्यंतचा प्रत्येक दिवस एक सुवर्णसण होईल. पंढरपूरला न जाता आयुष्याची पंढरी होईल, विठ्ठल स्वतहून आपल्याला भेटायला येईल. पटतेय का? कळवा…

[email protected]