­­­­­नाट्यरंग- दुहेरी नागरिकत्वाचा पेच

 >> हिमांशू भूषण स्मार्त

अनेक महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या नाटकांचे प्रयोग थांबल्यावर त्यांच्या संहिताच आस्वादक, अभ्यासकांसाठी उपलब्ध असतात. अशा वेळी नाटक हा अपरिहार्यपणे वाचनानुभव ठरणार असतो. त्याची भाषिक सामग्री हीच अनुभवाची निर्णायक माध्यम बनते. भाषा निर्णायक बनते त्या वेळी तिची आवाहन क्षमतादेखील निर्णायक बनते. नाट्य प्रयोगामध्ये बोलीभाषा ही अन्य प्रयोगनिष्ठ चिन्ह व्यवस्थांचा एक भाग असते.

एक कलारूप म्हणून नाटकाला दुहेरी नागरिकत्व प्राप्त आहे. ते बोलीभाषेत व्यवहार करत असल्याने त्याला साहित्यप्रकार मानले जाते आणि त्याचा प्रयोग होत असल्याने ते प्रयोगरूप कलाही मानले जाते. साहित्याच्या वर्गात जेव्हा नाटक शिकवले जाते, तेव्हा नाटकाची साहित्यशास्त्राrय मीमांसा करावी असा शिकवणाऱयाचा कल असतो, तर नाटकाच्या वर्गामध्ये नाटकाचा प्रयोग हा अध्यापनाच्या केंद्रस्थानी असतो. नाटकाचे जसे प्रयोग होतात तशी त्याची नाटय़ वाचनेही होत असतात. नाटय़ वाचनांमध्ये नाटकाचे भाषिक अंग अनुभवाचा आधार असते. अर्थात हादेखील एका मर्यादित अर्थाने नाटय़ प्रयोगच असतो. सतीश आळेकर त्यांच्या ‘ठकीशी संवाद’ या नाटकाचे आरंभी प्रकट वाचनच करीत असत. आता हे नाटक प्रयोगरूपाने आलेले असले तरी आळेकरांनी केलेली वाचने अतिशय परिणामकारक आणि प्रत्ययकारक होत असत. अर्थात या वाचनासाठीही आळेकर दृश्य प्रतिमांच्या प्रोजेक्शनचा वापर करत असत. नाटकाच्या या दुहेरी नागरिकत्वामुळे नाटकाच्या अभ्यासकांमध्ये स्वाभाविकपणे दोन पक्ष पडलेले आहेत. एक नाटकाच्या संहितेचा आणि दुसरा प्रयोगाचा. नाटक प्रयोगाशिवाय पूर्ण होत नाही. नाटक प्रयोगासाठीच लिहिले जाते. अपवादाने पूर्वरचित संहिता नसणारी नाटके मराठी रंगभूमीवर होत असली तरी आजही संहिता हाच मराठी नाटकाचा मूलाधार आहे. नाटकाच्या या दुहेरीमुळे नाटकाचा शैलीशास्त्राrय अभ्यासही दोन अंगाने होतो. एक अंग असते नाटकाच्या संवाद रचनेच्या शैलीशास्त्राrय अभ्यासाचे आणि दुसरे नाटय़ प्रयोगाच्या शैलीशास्त्राrय अभ्यासाचे.

नाटय़ाभ्यासामध्ये पेच निर्माण होतो तो त्याचा साहित्यकृती म्हणून अभ्यास करीत असताना, नाटकाचे साहित्य मूल्य ठरवत असताना. कवितेच्या साहित्यपणाचा किंवा कथेच्या कादंबरीच्या साहित्यपणाचा निर्णय घेणे तुलनेने सोपे असते. कारण हे तीनही वाङ्मय प्रकार पूर्णत भाषावलंबी आहेत. नाटकात संवादांची आणि रंग सूचनांची भाषा हा नाटकाच्या प्रवासाचा आरंभबिंदू असतो व नाटकाचे बोलणे हे बऱयाच वेळेला रोजच्या जगण्यातले बोलणेच असल्यामुळे त्याचे साहित्य मूल्य कसे ठरवायचे? असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. नाटकाच्या रंग सूचनाही नाटकाच्या संकल्पित प्रयोगाच्या सूचना असल्याने त्याही बहुधा तपशीलप्रधान असतात. त्या देताना अथवा रचताना शैलीचा विचार, अंतर्भाव झालेला नसतो. मग नाटकाच्या भाषिक अंगाचे साहित्यशास्त्राrय मूल्यमापन विश्लेषण कसे करायचे? नाटकाचे साहित्य मूल्य नेमके असते कशात?

अनेकदा आपण असे पाहतो की, अनेक महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या नाटकांचे प्रयोग थांबल्यावर त्यांच्या संहिताच आस्वादक, अभ्यासकांसाठी उपलब्ध असतात. अशा वेळी नाटक हा अपरिहार्यपणे वाचनानुभव ठरणार असतो. त्याची भाषिक सामग्री हीच अनुभवाची निर्णायक माध्यम बनते. भाषा निर्णायक बनते त्या वेळी तिची आवाहन क्षमतादेखील निर्णायक बनते. नाटय़ प्रयोगामध्ये बोलीभाषा ही अन्य प्रयोगनिष्ठ चिन्ह व्यवस्थांचा एक भाग असते. नाटय़ संहितेच्या वाचनानुभवात मात्र ती त्याच प्रयोगानिष्ठ चिन्ह व्यवस्थांची एकमेव वाहक बनते. प्रयोगात ती आधी श्राव्य अनुभव असते, मग अर्थानुभव, आशयानुभव असते. संहितेत तिचे श्राव्य कल्पावे लागते. प्रयोगातदेखील संवादांच्या श्राव्याला एक मूल्ययुक्तता असावी लागते. जगण्यातली भाषादेखील आपल्याला ऐकू येते. तिच्यातही दैनंदिन जगण्याला सापेक्ष अशी मूल्ययुक्तता असावी लागते. परंतु नाटकाच्या श्राव्यात या मूल्ययुक्ततेचा विस्तार झालेला असतो. नाटकाच्या भाषेचे श्राव्य केवळ अर्थकारक किंवा व्यावहारिक अर्थ निर्माण करणारे नसते; तर ते सहजाणिवा छेडणारे, पात्रस्वभाव सूचित करणारे, नाटय़सौंदर्याला सहाय्यकारी ठरणारे, नाटय़ानुभव संवेद्य करणारे आणि पृष्ठस्तरीय अर्थाचे स्तर उलगडून सूक्ष्म भान उलगडणारे असते. यासाठी नाटय़ लेखक संवादांच्या प्रमाणावर, त्यांच्या रचनेवर, क्रमावर काम करत असतो. दोन पात्रांच्या संवादात दोन्ही पात्रे अलटून-पालटून क्रमाक्रमाने बोलत राहिली, तर कालांतराने त्यांच्या बोलण्याला तपशीलाचे आणि स्पष्टीकरणाचे स्वरूप येईल. अशा वेळी बोलणे आणि शांतता यांचा समसमान योग घडावा लागतो. संवादांमध्ये विरामांच्या, ठेहरावाच्या, शांततेच्या जागा निर्माण कराव्या लागतात. पात्राचे दृश्यवर्तन, मंचावर निर्माण होणारी दृश्य अवस्था, छायाप्रकाशाची अवस्था यांचा संवादांवर कोणता परिणाम होऊ शकणार आहे, याचाही विचार संवाद रचताना करावा लागतो. नाटकाचे संवाद एकाच वेळी पात्रपूरक, दृश्यपूरक, नाटय़स्थितीपूरक आणि अनेकार्थसूचक असावे लागतात. हे सारे आले तर नाटकाची स्वतची म्हणून भाषा उत्पन्न होते. ती दैनंदिनाच्या सामग्रीजवळ जाणारी असली तरी तिने सामान्य दैनंदिनत्व ओलांडलेले असते.

एलकुंचवारांच्या रंगसूचनांमध्ये आपल्याला अनेकदा लघुकथेत असावी तशी कथनपरता दिसते. लेखकाला हे नक्की माहीत असणार की, कथनपर रंगसूचनांमधले सगळेच नाटय़रूपाला पूरक नाही, पण या रंगसूचना, नाटय़संहिता वाचताना एक शैलीभान देतात आणि दिग्दर्शक, अभिनेते, रंगतंत्रज्ञ यांना त्यांच्या-त्यांच्या कामाच्या शैली निवडण्याचेही भान देतात. एलकुंचवारांची एखादी रंगसूचना अभिनेत्याला अभिनयाची प्रक्रिया काय स्वीकारावी याचेही भान देऊ शकते. नाटकाच्या संहितेचे साहित्य मूल्य असे स्वायत्त आणि केवळ नाटकाचे असू शकेल असे अनन्य असते.

[email protected]

(लेखक नाटय़क्षेत्राचे अभ्यासक आहेत)