नाटय़रंग – मानसरंग

>> हिमांशू भूषण स्मार्त

मानसिक आरोग्यात काम करणाऱ्या ‘परिवर्तन’ संस्थेमार्फत दिल्या जाणाऱ्या मानसरंग नाटय़ शिष्यवृत्तीच्या माध्यमातून असा संशोधन, सर्जन यांचा योग गेली तीन वर्षे साधला जातो आहे. डॉ. हमीद दाभोळकर आणि प्रख्यात नाटय़ अभिनेते, दिग्दर्शक अतुल पेठे यांच्या अथक प्रयत्नांमधून ही शिष्यवृत्ती मराठी नाटकाला मूलभूत योगदान देते आहे.

नाटक शिकण्याचे अनेक औपचारिक, अनौपचारिक मार्ग असतात. नाटय़ शिक्षण औपचारिक शिक्षण प्रणालीचा भाग नव्हते तेव्हा नाटक करता-करता शिकण्याची प्रक्रिया घडत असे. त्यानंतर एनएसडी, विद्यापीठांमधील नाटय़ विभाग, प्रशिक्षण सत्रे, कार्यशाळा यांमधून औपचारिक, प्रणालीबद्ध नाटय़ शिक्षण आरंभले. गेल्या काही दशकांमध्ये प्रशिक्षित रंगकर्मींची संख्या, योगदान लक्षणीयरीत्या वाढलेले आहे. अद्यापही अनौपचारिक शिक्षण अस्तित्वात आहेच. औपचारिक शिक्षण प्रणालीमध्ये नाटकाची केवळ कौशल्ये शिकवण्यावर भर नसतो (किंबहुना नसावा). आपण नाटक का करू इच्छितो? आणि नाटकच का करू इच्छितो? या महत्त्वाच्या प्रश्नांना शिकणाऱ्यांनी सामोरे जावे अशी योजना प्रशिक्षणामध्ये जाणीवपूर्वक केलेली असते. हे शिक्षण, अध्ययन आणि प्रशिक्षणही असते. जाणत्या शिक्षकांच्या सहाय्याने घेतलेला आत्मशोधही असतो. ज्याचे माध्यम असते नाटक. आपण जगतो ते जीवन परिभाषित करण्यासाठी आपले कलामाध्यम कसे आधाराला येते याचाही हा शोध असतो. स्वतला, स्वतच्या भवतालाला आणि त्याचवेळी कलारूपाला कसे उन्नत करावे याची सूत्रे शिक्षणातून आपल्या हाती लागू शकतात. या शिक्षणादरम्यान काही एक आंतरविद्याशाखीय आदान-प्रदानही घडू शकते. याने आपल्या आकलनामधली, उमजेमधली एकरेषीयता लोपू शकते.

मराठी नाटक आजवर समाजवास्तव, राजकीयता, धर्मकारण, ऐतिहासिक वास्तव, मानसिक वास्तव इत्यादी परिप्रेक्षांमध्ये लिहिले, खेळले गेले आहे. अनेकदा ते प्रतिक्रियावादी राहिले आहे. अनेकदा आंतरक्रियात्मकही झालेले आहे. असे असले तरी एखाद्या विद्याक्षेत्रामधील गंभीर आणि प्रणालीबद्ध संशोधन आधाराला घेऊन त्या संशोधनातील तथ्यांचे नीट परिशीलन करून, ती तथ्ये नीट मुरू देऊन, त्याच्या कलात्मक विकल्पनाची प्रतीक्षा करून नाटक लिहिले, केले गेलेले आहे असे मराठीत अभावानेच घडले असावे. नाटक हा वैज्ञानिक प्रकल्प नसतो पण तो उपयोजित रंगभूमीचा प्रकल्प होऊ शकतो हेही खरेच. परंतु संशोधनजनित आकलनाचा आधार नाटकाची प्रत बदलू शकतो हेही तितकेच खरे. संशोधन आणि सर्जन यांचा संगम दोन्ही क्षेत्रांना लाभाचा ठरू शकतो.

मानसिक आरोग्यात काम करणाऱ्या ‘परिवर्तन’ संस्थेमार्फत दिल्या जाणाऱ्या मानसरंग नाटय़ शिष्यवृत्तीच्या माध्यमातून असा संशोधन, सर्जन यांचा योग गेली तीन वर्षे साधला जातो आहे. डॉ. हमीद दाभोळकर आणि प्रख्यात नाटय़ अभिनेते, दिग्दर्शक अतुल पेठे यांच्या अथक प्रयत्नांमधून ही शिष्यवृत्ती मराठी नाटकाला मूलभूत योगदान देते आहे. ‘परिवर्तन’सोबत ‘नाटकघर’ या प्रकल्पामध्ये सहभागी असल्याने संशोधन, सर्जन यांचा हा योग फलदायी ठरतो आहे. या प्रकल्पाची रचना अत्यंत कल्पक आणि अभ्यासपूर्ण असल्याने हे साधणे शक्य झालेले आहे. डॉ. दाभोळकर, अतुल पेठे आणि डॉ. राजीव नाईक यांच्या समितीने शिष्यवृत्तीसाठीचे दिग्दर्शक निवडले जाण्यापासून हा प्रकल्प आरंभ होतो. प्रकल्पाची प्रत्यक्ष सुरुवात सिंहगड पायथ्याशी असणाऱ्या निसर्गसंपन्न ‘गप्पांगण’मधल्या कार्यशाळेने होते. या कार्यशाळेचा भर मानसिक आरोग्याची संकल्पना समजून सांगण्यावर आणि मनोप्रक्रियांविषयी शास्त्राrय भान देण्यावर असतो. कार्यशाळेची सर्वात लक्षणीय बाब अशी की, शिष्यवृत्तीप्राप्त दिग्दर्शकासोबत त्याचा नाटय़ चमूही सहभागी असतो, लेखकासह. ज्यांना पुढे जाऊन नाटक करायचे आहे. त्यांची मानसिक आरोग्याविषयीची, मनोव्यापारांविषयीची चिंतन व समजप्रक्रिया एकत्रच आरंभते. कार्यशाळेत चर्चा घडत असतात, संवाद घडत असतो, हळूहळू नाटक हाताला लागत असते. मागील वर्षीचे लेखक, दिग्दर्शक, चमू त्यांची प्रक्रिया उलगडून सांगत असतात. कार्यशाळेत आपल्या संभाव्य नाटकाचा अत्यंत प्राथमिक आराखडाही सांगायचा असतो. एवढेच नव्हे तर नाटय़ चमू म्हणून आपल्या नाटक करण्याच्या शक्ती कोणत्या हेही सांगायचे असते. उदाहरणार्थ; एखाद्या चमूकडे लोकधाटीची सामग्री असेल, एखाद्या चमूकडे विशिष्ट नाटय़शैलीचा नियमित रियाज असेल. डॉ. राजीव नाईक, डॉ. मोहन आगाशे, डॉ. चंद्रशेखर फणसळकर, डॉ. अंजली जोशी, डॉ. हमीद दाभोळकर आणि अतुल पेठे यांची कार्यशाळेत होणारी अभ्यास सत्रे हे या कार्यशाळेचे खरे संचित असते, जे नाटक करणारे स्वतबरोबर नेत असतात. पुढे जाऊन त्यांच्या नाटकांमधून त्याच्या खुणा दिसत असतात.

ही मानसिक आरोग्यासंदर्भातली शिष्यवृत्ती असली तरी मानसिक आरोग्याविषयीचे प्रबोधन, प्रचार हा नाटकाचा हेतू नसावा आणि नाटकाने अकारण स्पष्टीकरणपर होऊ नये ही धारणा प्रकल्पामध्ये गृहीत आहे. नाटकाने आधी उत्तम नाटक असावे आणि त्याने मानसिक आरोग्य व मनोवास्तवाविषयी बोलावे. नाटक म्हणून त्यात कोणतीही अशास्त्राrयता राहू नये, व्याजआलंकारिकता व भाबडेपणा राहू नये या कार्यशाळेतून धारणा रुजवल्या जातात. म्हणूनच आपण मागे पाहिले तसे संशोधन, सर्जन यांचा समसमा योग या प्रकल्पात घडून येतो. ‘मानसरंग’ने मराठी नाटकाला दिलेले हे नवे, निर्णायक वळण आहे. या बिजारोपणाची फळे नजीकच्या आणि सुदूर भविष्यात मराठी रंगभूमीवर निश्चितच पाहायला मिळतील. या शिष्यवृत्तीअंतर्गत आजवर क्षितिश दाते, अभिजीत झुंजारराव, सचिन शिंदे, अनिल कोष्टी, अजित साबळे आणि हिमांशू स्मार्त यांची नाटके सादर झाली. पुढील वर्षी जानेवारीत रसिका आगाशे, विभावरी देशपांडे, केतन जाधव आणि जमीर कांबळे यांची नाटके सादर होतील. यासाठी पुणे येथे ‘मानसरंग’ नाटय़ महोत्सव आयोजित केला जाईल. ‘मानसरंग’ने जसे मनोविज्ञान आणि नाटक कवेत घेतलेले आहे तशीच महाराष्ट्रामधली विविधताही कवेत घेतलेली आहे. या वर्षी त्यात गोवाही समाविष्ट झाला. या भौगोलिक, सांस्कृतिक वैविध्यामुळे नाटकांमधून अभिव्यक्त होणारे जीवनही विस्तीर्ण आवाका असणारे असणार आहे. कार्यशाळेत लाभलेल्या चिंतनाचे संचित प्रत्येक नाटय़ चमूच्या नाटय़धारणेत मिसळून घडणारे नाटय़, सर्जन मराठी रंगभूमीचा लक्षणीय ठेवा असेल.

[email protected]

(लेखक नाटय़क्षेत्राचे अभ्यासक आहेत)